National Bad Bank
आजच्या लेखात आपण ‘National Bad Bank’ किंवा ‘अनुत्पादक मालमत्तांची बॅड बँक’या विषयावर माहिती घेणार आहोत. बॅड बँक याचा शब्दशः अर्थ खराब किंवा कलंकित बँक. बँकांच्या वाढणाऱ्या अनुत्पादक मालमत्तेत करोना नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत 31 मार्च 2021 पर्यंत मोठी वाढ होऊन ती एकूण मालमत्तेच्या 13.5% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अर्थसंकल्पात यासाठी सरकारी बँकांना ₹20000/- कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे.
विशेष लेख: भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)
National Bad Bank: अनुत्पादक मालमत्तांची बॅड बँक
- मालमत्ता अनुत्पादक होण्यात यावर्षी करोना महामारीचा हातभार लागला असला तरी अशा खऱ्याखुऱ्या कारणाने काही मालमत्ता अनुत्पादक होऊ शकते, हे बँकिंग व्यवसायात गृहीत धरण्यात आले असून, याचे आदर्श प्रमाण अधिकतम 3% आहे.
- यात कर्ज वितरण व वसुली यासंबंधात असलेले नियम अधिक कठोर, विना राजकिय हस्तक्षेप आणि अस्तित्वात असलेल्या कायद्याची कठोर अंबालबजावणी हे यावर खरेखुरे उपाय आहेत. त्याऐवजी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची भांडवली तरतूद करून अशा प्रकारे कर्ज बुडावणाऱ्यांना एकप्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे. किंबहुना अशी कर्जे बुडावण्यासाठीच द्यायची असतात अशा पद्धतीने व्यवहार होत आहेत.
- आजपर्यंत मदत म्हणून जेवढी भांडवली तरतूद करण्यात आली त्याच्या 5% रक्कम कर्ज वितरण आणि वसुली यासाठी वापरली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात अनुत्पादक मालमत्ता वाढली नसती.
- याशिवाय बँकांनी आपली कोट्यवधी रुपयांची कर्जे निर्लेखीत करून आपले ताळेबंद चकाचक केल्यावरही परिस्थिती फरक पडला नाही.
- कर्ज अनुत्पादक झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कुणाची? आणि त्यावर नेमकी काय कार्यवाही करायची? याची नेमकी पद्धत निश्चित करण्याची गरज आहे.
National Bad Bank: अर्थसंकल्पीय तरतूद
- सन 2021-2022 च्या अर्थसंकल्पात यावर उपाय म्हणून नॅशनल बॅड बँक स्थापन करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.
- ही एक कंपनी कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली कंपनी असून ही कंपनी बँकांची अनुत्पादक कर्ज कमी किमतीत खरेदी करेल आणि त्याची अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी प्रयत्न करेल.
- यामुळे बँका सुस्थितीत राहतील, अर्थव्यवस्था बळकट होईल. अन्यथा बेसिल 3 नियमानुसार बँकेस आपल्या नफ्यातून तरतूद करावी लागल्याने त्यास खेळत्या भांडवलाची कमतरता पडेल.
- या बँकेने कर्ज खरेदी केल्याने बँकांना आपल्या व्यवसायाकडे अधिक कार्यक्षमतेने लक्ष देणे शक्य होईल. भांडवल उभारणी करणे शक्य होईल आणि सर्वसाधारण गुंतवणूकदारांचा विश्वास प्राप्त करणे शक्य होईल.
- यापूर्वी आर्थिक वाढीचे अंदाज अपेक्षित झाले नाहीत त्यामुले उद्योग अडचणीत आले. त्यासाठी बँकांनी दिलेली कर्जे पुनरर्चित केली. यातील अनेक कर्जे थकल्याने आणि काही घोटाळेबाजांमुळे अनेक बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
- ही बाब जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आली तेव्हा सर्व बँकांना अनुत्पादक मालमत्ता ठरवणे व त्यासाठी तरतूद करणे सक्तीचे केले गेले. यानंतर हे प्रमाण किंचित कमी येण्यास मदत झाली होती ते चालू आर्थिक वर्षात वर उल्लेख केल्याप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.
- मे 2020 मध्ये इंडियन बँक असोसिएशनने अशा प्रकारच्या बँकेची स्थापना करण्याची सूचना सरकार व रिझर्व बँकेस करून, अशा बँकेकडे सुरुवातीस 75000 कोटी रुपयांची अनुत्पादक मालमत्ता हसत्तांतरीत करण्याची शिफारस केली होती.
- याची रचना कंपनी सारखी असून त्याची मालकी सरकार, पर्यायी गुंतवणूक योजनाकार (AIF) आणि मालमत्ता नियोजनकारांकडे (AMC) असावी व कार्यपद्धती मालमत्ता पुनर्बांधणी (ARC) प्रकारची असावी अशी सूचना केली होती.
- यात सरकार आणि लोकांचा भांडवली सहभाग (PPP) असून प्राथमिक भागभांडवल 100 कोटी रुपये असावे नंतर सरकारने 10000 कोटी रुपये भांडवली सहभाग द्यावा.
- या योजनेस अनेक बँका, व्यापारी संस्था,आर्थिक विश्लेषक यांनी पाठिंबा दिला. याप्रमाणे त्यांची मुख्य मागणी मान्य झाली असून, येत्या दोन महिन्यात अशी मालमता व्यवस्थापन कंपनीची स्थापना होईल ज्यात सरकारी बँकांचा भांडवली सहभाग असेल.
- यानंतर प्रस्तावित नॅशनल बॅड बँक कशी असेल ते यथावकाश जाहीर होईल. याचे शेअरबाजारात प्रचंड स्वागत झाले असून बँक निफ्टी निर्देशांक व बँकांमुळे प्रभावित होऊ शकणारे निफ्टी आणि सेंसेक्स हे निर्देशांक रोज नवनवीन उच्चांक करीत आहेत.
विशेष लेख: अर्थसंकल्प २०२१: सात प्रश्नांच्या उत्तरांसाठी घालावा लागेल नवा चष्मा !
National Bad Bank: सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये वाढ?
- अनेकांच्या मते अशी बँक स्थापन करणे ही वरवरची उपयायोजना असून ही तात्पुरती मलमपट्टी आहे.
- सध्याच्या परिस्थितीत अनुत्पादित मालमत्तेस खरेदीदार शोधणे अवघड आहे. यातून मूळ बँकेस होणाऱ्या तोट्याची सर्वाधिक झळ मध्यमवर्गास बसणार असून, त्यांच्या समस्यांत अधिक भर पडणार आहे.
- याशिवाय अशा सर्व व्यवहारातून अपेक्षित परतावा न मिळाल्याने अंतिमतः नुकसान वाढण्याची शक्यता अधिक आहे.
- हे म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. यामुळे सरकारी बँकांत कर्ज देण्यात आणि वसुली करण्यात दाखवण्यात येणारा निष्काळजीपणा वाढण्याची शक्यता अधिक आहे त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सर्वाना भोगावे लागतील.
माझे शेजारी श्री सावंत हे जेष्ठ नागरिक असून, त्यांच्या तोंडात कायम कोकणातील ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार असतात आणि त्याचा ते सहज वापर करतात. या विषयावर सहज बोलतांना त्यांनी ‘आजार शेंडीला व उपचार मांडीला’ अशा आशयाची समर्पक अशी, कोकणातील ग्रामीण म्हण वापरली. या कठीण काळात इतकी प्रचंड तरतूद सरकार कशी करणार आणि त्यासाठी पैसे कुठून आणणार? आणि अंतिमतः त्याचा किती उपयोग होणार? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: National Bad Bank Marathi Mahiti, National Bad Bank in Marathi, National Bad Bank Marathi