उद्योग व्यवसायाच्या संदर्भात एकाधिकार, व्यापारचिन्ह, स्वामित्वहक्क शब्द प्रचलित आहेत. ते प्रामुख्याने बौद्धिक संपदेशी संबंधित आहेत. यात वैज्ञानिक शोध, साहित्य, सर्जनशील कार्ये, रचना यांचा त्यात समावेश होतो. एकाधिकार, व्यापारचिन्ह, स्वामित्व हक्क हे तीन शब्द म्हणजेच पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट हे त्याचे ज्ञात प्रकार आहेत. ते त्याच्या निर्मात्यांना नवनिर्मितीसाठी कायदेशीर संरक्षण आणि प्रोत्साहन देतात.
- नवनिर्मितीसाठी त्यात सातत्याने वाढ होणे अपेक्षित आहे, यातील निर्मात्याची मेहनत, त्यासाठी होणारा खर्च,त्याला लागणारा कालावधी आणि सोसावे लागणारे कष्ट त्यामुळेच त्याला एकरकमी अथवा नियमित स्वरूपात काही प्राप्ती व्हावी या उद्देशाने आपोआपच प्राप्त होणारे अधिकार बौद्धिक संपदा कायद्याने मिळतात.
- सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी हळदीच्या पेटंट विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर जो लढा दिला त्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली. बौद्धिक संपदेविषयी असलेल्या आपल्या या अज्ञानामुळे ते पेटंट रद्द करण्यासाठी दहा हजार डॉलर्स खर्चावे लागले.
- दार्जिलिंग चहा या नावाखाली युरोप अमेरिकेतील चहाचा व्यावसायिक वापर थांबवण्यासाठी आपल्याला बारा न्यायालयीन लढे द्यावे लागले.
- सरकारने त्यात लक्ष घालून आणि आपल्याकडील या संदर्भातील कायद्यात देशहिताला प्राधान्य देऊन आवश्यक सुधारणा केल्या.
- आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पेटंट मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने हा विषय कायम चर्चेत राहिला आहे.
हे तिन्ही शब्द बौद्धिक संपदेच्या संदर्भात असले तरी त्यात मूलभूत फरक आहे ,म्हणजे-
★एकाधिकार (पेटंट)
- हा सरकारने उत्पादन किंवा कल्पनेला दिलेला मालकीचा हक्क आहे.
- हा अभिनव शोध, तांत्रिक आविष्कार किंवा संकल्पना संरक्षित करण्याचा मार्ग आहे.
- तुमच्या शोध/ संकल्पनेचे पेटंट घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय त्याचा वापर कोणीही करू शकत नाही.
- तुमच्या शोध/ संकल्पनेचा व्यावसायिक वापर करण्याचे अधिकार तुम्ही विकून त्याबद्दल पैसे मिळवू शकता.
- जेथे नोंदणी करणार तेथे शोध निर्मितीची पूर्ण प्रक्रिया जाहीर करावी लागते.
- एकाधिकार नोंदणी केल्यापासून वीस वर्षांसाठी असतो त्यानंतर यासंदर्भात उपलब्ध माहिती सार्वजनिक रित्या जाहीर केली जाते नंतर तिचा व्यावसायिक वापर कोणीही विनामूल्य करू शकतो.
- अपवादात्मक परिस्थितीत देशहितासाठी आवश्यक असल्यास वीस वर्षाच्या मर्यादेत बदल करण्याचा हक्क या कायद्याने सरकारला प्राप्त झाला आहे.
हे ही वाचा – क्राऊड फंडिंग – वित्त पुरवठा निधी
सध्या दिल्या जाणाऱ्या पेटंटची चार प्रकारात विभागणी करता येईल.
*उपयुक्तता पेटंट : शोध नवीन आणि उपयुक्त असणे आवश्यक आहे तो प्रक्रिया, मशीन, उत्पादन, पदार्थाची रचना आहे.
*डिजाईन पेटंट : मूळ उत्पादन कार्यात बदल न करता त्याच्या निर्मिती रचनेत बदल केला जातो.
*जैवतंत्रज्ञान पेटंट : असे पेटंट कृषी संशोधकांना दिले जाते.
*सुधारित पेटंट : मूळ प्रक्रियेत चूक आढळून आल्यास ती दुरुस्त करून त्याबद्दल ते मिळवता येते.
★व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क)
- आपले उत्पादन सेवा याची माहिती देणारी मार्केटिंग संकल्पना आहे.
- हे चिन्ह विशिष्ट नाव अथवा व्यवसाय सूचित करते. ते एखादा शब्द, वाक्प्रचार, रचना किंवा तुमच्या वस्तूचा परिचय करून देणारे संयोजन असू शकते. जे तुमचे वेगळेपण ठळकपणे सूचित करते.
- हे चिन्ह / नाव अन्य कुणालाही परवानगी शिवाय वापरता येत नाही त्याशिवाय त्याच्याशी साधर्म्य असलेले चिन्ह / नाव याच्या वापरास प्रतिबंधित करते.
- हे चिन्ह / नाव निर्मात्याची हमी ग्राहकांना देत असते
- ट्रेडमार्क नोंदणी केल्यावर 10 वर्षासाठी देण्यात येतो त्यानंतर वेळोवेळी त्याची मुदत पाच वर्षांनी वाढवता येऊन ते आपल्याकडेच ठेवता येते किंवा अन्य कुणास विकताही येते.
- नोंदणी केलेला ट्रेडमार्क ® ने दर्शविला जातो तर न केलेला ™ या चिन्हा द्वारे दर्शविला जातो.
★स्वामित्व हक्क (कॉपीराईट)
- हे कोणत्याही कॉपी केल्या जाऊ शकणाऱ्या गोष्टींचे संरक्षण करते उदा पुस्तक, गाणे, चित्रपट, जाहिराती
यासाठी ती रचना निर्दोष असावी, ती मौलिक असावी आणि महत्वाची असावी.
- जेव्हा तुम्ही असे काही निर्माण करता तेव्हा तो तुम्हाला आपोआपच प्राप्त होतो.
- तुमच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांची कॉपी करू शकत नाही.
- तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्याचा वापर करत असल्यास तुम्ही त्यास तसा वापर करण्यापासून रोखू शकता त्याचप्रमाणे त्याच्याकडून भरपाई मिळवू शकता.
- निर्माता जिवंत असेपर्यंत त्याच प्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर साठ वर्ष हा अधिकार त्यांच्या वारसांकडे राहतो.
- अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत बदलण्याचा अधिकार सरकारला आहे.
- © ,copyright, all right reserved कॉपीराईट या चिन्हाने आणि शब्दांनी दर्शवली जाते.
महत्वाचे: आयकर कायद्यातील फॉर्म 10 A आणि फॉर्म 10 AB
यासंबंधात असलेले कायदे नियम देश प्रदेशानुसार बदलू शकतात. यातील सॉफ्टवेअर संबंधित शोध हे प्रामुख्याने बदल आणि वादविवादांच्या अधीन आहेत. बौद्धिक संपदांचे अधिकार आणि त्याचे महत्व आता सर्वच देशांनी ओळखले आहे. त्याचे उल्लंघन एक सर्वांचीच समस्या आहे.
भारतातील बौद्धिक संपदा चे अर्जाची स्वीकृती, पुनरावलोकन मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून केली जाते. युरोपियन देशांसाठी स्वतंत्र यंत्रणा असून त्यास त्यात असलेल्या सर्व संबंधित देशाची मान्यता आहे.
तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक बौद्धिक संपदा संस्था (WIPO) ही संस्था आहे येथे केलेली नोंदणी केल्यास सदस्य देशात बौद्धिक संपदा कायद्याखाली नोंदणी करण्यास त्याची मदत होते.
कायदेशीर लढाईतून याचा गैरवापर करणाऱ्याना शिक्षा झाल्या आहेत. त्याच्याकडून भरपाई मिळवण्यात आली आहे. आपल्या देशात किंवा अन्य देशात किंवा जागतिक पातळीवरील बौद्धिक संपदा हक्क जतन करण्याची सर्व कार्ये आता ऑनलाइन पद्धतीने होतात यात अनेक बारकावे असल्याने तसेच देशोदेशीचे यासंबंधातील कायदे भिन्न असल्याने जाणकारांचे मत घेऊन आपले हक्क सुरक्षित करावेत.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणी चे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)