पेनी स्टॉकची माहिती

Reading Time: 2 minutes

दर्शनी मूल्यापेक्षा (Face Value) कमी बाजारभाव (Market Value) असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक असे म्हटले जाते.अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 100 कोटीहून कमी असते. अमेरिकेत 5 $ पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक असे संबोधले जाते. जरी अशा शेअर्समधून प्रचंड नफा होण्याची शक्यता असली तरी अचानक डिलिस्ट होऊन त्यात मोठया प्रमाणात पैसे अडकून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळेच गुंतवणूक तज्ञ सर्वांना त्यापासून लांब राहण्यास सांगतात. असे असले तरीही पैशांची फारशी फिकीर नसलेले, आणि फक्त पैसे टाकण्याशिवाय कोणतेही ज्ञान मिळवण्याची इच्छा नसलेले अनेक गुंतवणूकदार झटपट फायद्याचे आशेने यात गुंतवणूक करीत असतात. तर काही गुंतवणूकदार असे आहेत की ते फक्त पेनी स्टॉक मधेच गुंतवणूक करतात.

मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदवण्यात आलेले अनेक शेअर्स पेनी स्टॉक म्हणता येतील असे आहेत. या शेअर्सचे भाव खूपच कमी असल्याने ते आणि त्याची मागणी कृत्रिमरीत्या वाढवणे सहज शक्य आहे. अनेक लोक मोठया प्रमाणात यांची खरेदी अथवा विक्री करून त्यांना अपेक्षित असलेली दिशा देऊ शकतात. अशा कंपन्या बहुतांशी शेअरबाजार नियमावली पाळत नाहीत. वेळेवर अहवाल प्रसिद्ध करीत नाहीत त्यामुळे त्यांच्या व्यवहारावर बंदी आणता येऊ शकते. परंतू केवळ छोट्या गुंतवणूकदाराना यातून बाहेर पडण्याची संधी असावी या हेतूनेच बाजार नियामक मंडळ त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करीत नाही. त्यामुळेच बाजारात कार्यरत असे काही विशिष्ठ घटक आक्रमक होतात. यापूर्वी असे शेअर ट्रेड टू ट्रेड या पद्धतीने केले जात असत याचीच अलीकडील सुधारित आवृत्ती म्हणजे ए एस एम द्वारे विशेष निगराणीखाली आणले जातात. यात एका विशिष्ठ मर्यादेवर किंमत किंवा उलाढाल वाढली तर तर कोणत्याही शेअर्सची वाढ थोपवण्यासाठी विविध उपाय योजले जातात. जे टी टू टी पद्धतीशी मिळतेजुळते आहेत. त्याचा दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येतो.

असे असले तरी या शेअर्समध्ये अल्पावधीत होऊ शकणारी जबरदस्त वाढ अनेकांना आपल्या मोहात पाडते. यात अल्पावधीत सहज होऊ शकणारी 10 पट वाढ वर्षानुवर्षे चांगले शेअर्सही 10 वर्षातही दाखवू शकत नाहीत. त्यामुळे बाजारातील अनेकांचे सहज लक्ष वेधून देऊ शकतात. या काळात फायदा मिळवण्याची आशा असलेले अनेक लोक यासंबंधी अनुकूल बातम्या पसरवून आपले समभाग विकून टाकतात. याच काळात अनेक छोटे गुंतवणूकदार त्यांनी शेअर्स खरेदी केलेले असल्याने आणि त्याच वेळेस भाव खाली आणि कोणी खरेदीदार नसल्याने मोठया प्रमाणात अडकतात. त्यांना थोडा तोटा सहन करून बाहेर पडायची इच्छा असेल तरीही ते तसे करू शकत नाहीत. या काळात शेअर्सचे लिस्टिंग रद्द झाले तर पैसे गमावून बसतात.

काही पेनी स्टॉक हे मल्टीबार्गर झाल्याची उदाहरणे आहेत परंतू केवळ यामुळे ते खरेदी करणे अत्यंत धोकादायक आहे. याशिवाय त्यांच्याबद्धल ठाम निष्कर्ष काढता येऊ शकेल अशी माहिती उपलब्ध नसल्याने रिसर्च हाऊसना त्यांचा अभ्यास करता येऊ शकत नाही. सावध गुंतवणूकदारांनी पेनी स्टॉक खरेदी संबधी विचार करण्यापूर्वी खालील गोष्टीचा शोध घेणे गरजेचे आहे.

१. हा शेअर्स पेनी स्टॉक होण्यामागची कारणे कोणती ? याची किंमत कमी असली तरी आंतरिक मूल्य यापेक्षा अधिक आहे का?

२. यांचा व्यवसाय कोणता आणि व्यवस्थापन कोणाचे आहे ? भविष्यकाळ कसा असेल ?

३. प्रमोटर्सची भागभांडवलात टक्केवारी किती?

४.ही एखाद्या मोठया कंपनीने प्रवर्तित केलेली आहे का? कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्याची त्यांची काय योजना आहे.

५.यांच्या काही उपकंपन्या आहेत का ? त्यांचे इनस्टिट्यूटल भागीदार जसे, देशी / परदेशी वित्तसंस्था आहेत का?

६.कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसे आहेत?

अशी माहिती मिळवून तसही हे खूपच कठीण आहे, जर आपली खरोखर खात्री झाली की या शेअर्सचा भाव कमी आहे पण त्यात आंतरिक मूल्य दडलेले आहे आणि भाव कमी राहणे हे कंपनी व्यवस्थापनाच्या नियंत्रणापलीकडचे आहे तरच यात गुंतवणूक करण्याचा थोडाफार विचार करता येईल नाहीतर हमखास परतावा देऊ शकतील अशा कितीतरी कंपन्याचे शेअर्स त्यांच्या मूल्याहून कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत, म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांचे युनिट आहेत. तेव्हा हातचे सोडून पाळत्याच्यामागे न धावणे कधीही श्रेयस्करच !

©उदय पिंगळे

विशेष सूचना : पेनी स्टॉक म्हणजे काय ? याची सर्वसाधारण माहिती होण्याच्या दृष्टीने वरील लेख लिहिला असून हा लेख पेनी स्टॉकची कोणत्याही प्रकारे शिफारस करीत नाही.

(पूर्वप्रसिद्धी- मनाचेटॉक्स)

(चित्रसौजन्य- https://bit.ly/2PTDxE1 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.