Reading Time: 4 minutes

सरकारने केलेली नोटाबंदीची चर्चा काही थांबण्यास तयार नाही. पैशांचे आपल्या आणि देशाच्या आयुष्यात किती महत्व आहे, हे या चर्चेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पण या चर्चेत गैरसमज अधिक आणि खरी माहिती कमी अशी स्थिती आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे बँकिंग करण्यास आम्ही शिकलो नाही आणि आर्थिक साक्षरता हा आमचा कधी प्राधान्यक्रम बनला नाही, हे त्याचे कारण आहे. त्यासाठी ७० वर्षे आम्हाला पुरली नाहीत. पैसा महत्वाचा नाही, असे एकीकडे आम्ही म्हणत राहिलो, पण त्याचा राक्षस होतो आहे, हे आमच्या लक्षात आले नाही. म्हणूनच एकेकाळी कागदी नोटांना हात न लावणाऱ्या आपल्या  समाजात घरांत नोटा ठेवण्याची जणू स्पर्धा सुरु झाली.

भारतातील आर्थिक साक्षरतेची अवस्था किती वाईट आहे, हे स्टँडर्ड अँड पुअर्स या जागतिक पतमानांकन संस्थेने काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. ते असे आहे. व्याज दर, चलनवाढ यासारख्या आर्थिक संकल्पनांबाबत ७६ टक्के भारतीय पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आशियात सर्वात जास्त आर्थिक साक्षरता ही सिंगापूरमध्ये आहे. तेथे हे प्रमाण ५९ टक्के आहे. हाँगकाँग व जपानमध्ये ते प्रत्येकी ४३ टक्के आहे. तर भारताच्या २४ टक्क्य़ांच्या तुलनेत चीनमध्ये हे प्रमाण २८ टक्के आहे. पाहणीतील निष्कर्षांनुसार ७६ टक्के भारतीय प्रौढांना आर्थिक संकल्पनांचे ज्ञान नाही. म्हणजेच २४ टक्केच भारतीय अर्थ साक्षर आहेत. जगातील ६६ टक्के लोक आर्थिक साक्षर नाहीत. जगात ६५ टक्के पुरुष तर ७० टक्के स्त्रिया आर्थिक साक्षर नाहीत. भारतात ७३ टक्के पुरुष व ८० टक्के स्त्रिया आर्थिक साक्षर नाहीत. आशियात आर्थिक उत्पादने वाढत असून अनेक ग्राहकांना कर्ज, व्याज व इतर महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती नाही. भारतातील १४ टक्के प्रौढ हे औपचारिक आर्थिक संस्थात गुंतवणूक करणे पसंत करतात. त्यांची आर्थिक कौशल्ये फार कमकुवत असल्याने त्यांना गुंतवणुकीतून योग्य तो आर्थिक मोबदला मिळवता येत नाही. आशियात ७५ टक्के प्रौढ आर्थिक साक्षर असून पैशाला पैसा जोडणाऱ्या अमेरिका व ब्रिटनमध्ये हे प्रमाण ५७ व ६७ टक्के आहे.

भारतीय समाजाचे तत्त्वज्ञान उच्चकोटीचे आहे आणि त्याचा आणि विज्ञानाचा समतोल राखला गेला तर हा समाज जगातला खरा समृद्ध समाज म्हणून ओळखला जाईल, असे आपण किमान एक शतक ऐकतो आहोत. पण दुसरीकडे याच समाजात भौतिक साधनांची इतकी कमतरता आहे की संपत्ती मिळविण्यासाठी समाजात वर्षानुवर्षे घमासान लढाई सुरु आहे. या लढाईला राजकारण, समाजकारण, आरक्षण, धर्मकारण असे काहीही नाव दिले जात असले तरी ती लढाई भौतिक साधने मिळविण्याची आहे. म्हणजेच अर्थकारणाची. म्हणूनच ‘हो’ ‘नको’ करत सुरु झालेले जागतिकीकरण गेल्या २५ वर्षांत चांगलेच स्थिरावले आहे. ते असे रोखता येणारे नाही, असे ज्यांच्या लक्षात आले, ते भारतीय पहिल्या टप्प्यातच त्यात सामील झाले आहेत. विचारा-आचाराची फारशी चर्चा न करता त्यातील अनेकांनी आपली मुले लहानपणापासूनच विकसित देशांत जाण्यासाठीच तयार केली आणि आता ती अमेरिकादी देशांत वास्तव्य करू लागली आहेत. तेथे पैसा अधिक मिळतो आणि प्रशासन, सार्वजनिक व्यवस्था चांगली आहे. त्याचा दुसरा अर्थ भारतात पैसा कमी मिळतो आणि व्यवस्था चांगली नाही. या दोन्ही गोष्टी येथे मिळत असत्या तर ही मुले कशाला गेली असती सातासमुद्रापलीकडे?  यातून एक अर्थ तर थेट निघतो, तो म्हणजे संपत्ती मिळविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विदेशात गेले पाहिजे. आता तर साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळीही तेथे जी मजा आहे, ती येथे नाही, असे म्हणू लागली आहेत आणि तेथील मान्यता मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली आहेत. त्याचे कारण उघड आहे, तेथील मान्यतेचा शिक्का मिळाला की येथे तो आपोआप मिळतो! पण आपण हे विसरतो की ही जी ‘समृद्धी’ तेथे आहे, असे आपण म्हणतो आहोत, ती ‘समृद्धी’ आधी संपत्तीच्या वाटेनेच आली आहे. संपत्ती नाही आणि समृद्धी आहे, असे आज जगात कोठेच पाहायला मिळत नाही. 

मग प्रश्न असा पडतो की ही समृद्धी भारतात का दिसत नाही? त्याचे कारण नव्या काळाची ओळख करून देणारी अशी ही सर्वव्यापी संपत्ती आपण वर्षानुवर्षे दडवून ठेवली आहे. ती आधी बाहेर काढली पाहिजे, काळ्याची पांढरी केली पाहिजे. ती प्रवाही झाली पाहिजे. तिचा श्वास मोकळा झाला पाहिजे. ती कोणत्याही भेदभावाशिवाय हवा, पाण्यासारखी प्रवाही आणि शुद्ध स्वरुपात सर्वांना उपलब्ध असली पाहिजे. त्यातून साधनांचे दारिद्र्य आधी कमी होईल. घर, गाडी, शिक्षण, आरोग्य यासाठीची जीवघेणी स्पर्धा कमी होईल. हा बदल झाला पाहिजे, याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यासाठी आर्थिक साक्षरतेची कास धरली पाहिजे, असे म्हणायला काही विचारवंत तयार नाहीत. आधुनिक काळात आपण संपत्ती कमावूनच समृद्ध आयुष्याच्या प्रवासाला निघू शकतो, हे मान्य करणे, त्यांना काहीकेल्या झेपत नाही. कारण तसे मान्य केले तर आपले आर्थिक व्यवहार उघड करावे लागतील, आपण कुठल्या मार्गाने पैसा आणि संपत्ती कमावली, हे जाहीर करावे लागेल. आपण व्यासपीठांवर काही वेगळेच सांगतो आणि घरी वेगळेच काहीतरी जगतो, हे गुपित राहणार नाही. आपल्या प्रतिष्ठेला बाधा येईल, अशी जणू त्यांना भीती वाटते आहे. काय काय विचार करतात, त्यांचे त्यांना माहीत. पण घरात आणि दारात वेगळी जीवनमुल्ये ते जगत आहेत, एवढे मात्र नक्की.

समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य खरे म्हणजे इतके व्यापक आणि सच्चे असते की ज्यात लपवाछपवीला अजिबात स्थान नसते. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य शुद्ध असले पाहिजे, याचा आग्रह त्यात धरला जातो. भेदभावमुक्त समाजजीवनाचा तेथे पुरस्कार केला जातो आणि त्या दिशेने जाणारा विचार खुल्या मनाने स्वीकारला जातो. प्रतिष्ठेने जगण्याची सर्वांना समानसंधी नसेल तर ‘निवडक’ संधीवर मिळालेले यश साजरे करण्याची तेथे लाज वाटते आणि ज्याला परिस्थितीमुळे अपयश आले, त्याला तेथे समजून घेऊन जगण्यासाठी पुन्हा उभे केले जाते. तेथे झुंडशाही नाकारली जाते. मानवी जगण्याचा व्यापक उद्देश्य तेथे शोधला जातो आणि त्या दिशेने जात राहणे, हाच जीवनप्रवास मानला जातो. सर्व समाजाशी तेथे सहजच समरस होता येते, त्यामुळे काही समूह शत्रू करून घेण्याची आणि त्यासाठी ‘जिंदाबाद मुर्दाबाद’ करत बसण्याची गरज पडत नाही. आपण बरोबर आहे, हे सिद्ध करण्यासाठी तेथे इतरांना सतत खोडण्याची गरज रहात नाही. शरीरश्रमाचा तेथे अवमान केला जात नाही आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या आत्महत्येची दहा कारणे सांगण्याच्या बौद्धिकाची गरज पडत नाही, तर थेट त्या आव्हानाला भिडण्याचे धाडस केले जाते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘मी काय करू शकतो’, यापेक्षा ‘काय केले पाहिजे’, याचा विचार करण्याची अपरिहार्यता तेथे मान्य केली जाते. लाचारी आणि मुजोरीला तेथे स्थान नसते आणि मूळ प्रश्नांना बाजूला सारून समाजकार्याचा डंका तेथे पिटविला जात नाही. व्यक्तिकेंद्री व्यवस्था नाकारून समाजातील सामूहिक शहाणपणाचा आदर तेथे केला जातो. आपले वैयक्तिक आयुष्य जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच सार्वजनिक आयुष्य महत्वाचे आहे, याची जाणीव तेथे ठेवली जाते. आपण लावलेल्या झाडांना आलेली फळे आपणच किंवा आपल्याच मुलांनीच खाल्ली पाहिजेत, अशा कुतरओढीचे आयुष्य नाकारून तेथे मानवी समाजाची आणि त्याहीपुढे जाऊन सृष्टीविषयीची संवेदना श्रेष्ठ ठरते.

मग अशा समृद्धीपासून आपल्या समाजाला कोणी रोखले आहे? ‘अर्थक्रांती’ ला वाटते की आज सर्वत्र भरून राहिलेल्या आर्थिक असुरक्षितेने आपले समृद्ध जीवन रोखून धरले आहे. ते मोकळे करण्यासाठी आधी भौतिक साधनांची मुबलकता निर्माण करावी लागेल. अशी मुबलकता इतर समाजात कशी निर्माण झाली, याचा विचार करून ती आपल्याही समाजात कशी निर्माण होईल, यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न म्हणजे भारतीय समाजात होऊ घातलेली एक अपरिहार्य अर्थक्रांती. चलन हे विनिमयाचे माध्यम आहे, ती ताब्यात ठेवण्याची, दडवून ठेवण्याची वस्तू नव्हे, असे सांगणारी अशी ही अर्थक्रांती देशात झाली तर घराघरात होण्यास वेळ लागणार नाही, अशी मांडणी ‘अर्थक्रांती’ करते आहे, त्याचे कारण मुळात आमच्या देशात संपत्ती भरपूर आहे. प्रश्न आहे- तिच्या वापराचा आणि वाटपाचा. तो मार्ग अर्थक्रांती एका डिझाईनच्या रूपाने सांगते. ज्यात कोणत्याही जातीधर्मापंथाचा, राज्याचा, भाषेचा, राजकीय पक्ष अशा भेदभावाचा संबंध येत नाही. हे डिझाईन सर्व १३० कोटी भारतीयांना मानवी प्रतिष्ठा देण्याविषयी बोलते. भारतीय समाज वृत्तीने वाईट आहे, म्हणूनच तो पुढे जात नाही, हा अपप्रचार त्यासाठी थांबवावा लागेल आणि सर्वांना लागू होणाऱ्या एका भेदभावमुक्त व्यवस्थेविषयी बोलण्याचे धाडस करावे लागेल.

(लेखक अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त, आर्थिक साक्षरता चळवळ चालविणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ मासिकाचे संपादक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…