निर्देशांक (lndex) म्हणजे काय? याची माहिती आपण यापूर्वीच करून घेतली आहे. मुंबई शेअरबाजारातील निवडक ३० शेअर्सवर आधारित सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअरबाजारातील निवडक ५० शेअर्सवर आधारित निफ्टी (Nifty) हे सर्वाधिक लोकप्रिय निर्देशांक आहेत.
- अनेक म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही या निर्देशांकात समाविष्ट शेअर्समध्ये असते. यावरून बाजाराचा सर्वसाधारण कल दिसून येतो.
- निर्देशांकातील वाढ अथवा घट हे त्यातील शेअर्सच्या भावावर अवलंबून असते. तर निर्देशांकातील स्थान निश्चित करण्यासाठी त्या शेअर्सची बाजारातील उलाढाल आणि भाव यांचा विचार केला जातो.
- अनेक प्रकारचे निर्देशांक दोन्ही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे बाजाराचा कल कळून येतो. ज्यावेळी निर्देशांक आणि बाजाराचा कल यांचा संबंध जुळत नाही त्यावेळी तो निर्देशांक हा फक्त त्यातील निवडक शेअर्सचे प्रतिनिधित्व करीत असल्याने असे होत आहे स्पष्टीकरण तज्ञांकडून दिले जाते.
- निर्देशांकाचा विचार करताना परिवर्तनीय रोखे, अपरिवर्तनीय रोखे, कर्जरोखे, वॉरंट, प्राधान्य समभाग, झेड गटातील कंपन्या यांचा विचार केला जात नाहीं.
- निर्देशांकात कोणते शेअर्स घ्यायचे त्यातून कोणते शेअर्स वगळायचे याचा निर्णय स्टॉक एक्सचेंजचे नियामक मंडळ ६ महिन्यातून एकदा घेते. यासाठी ३१ जानेवारी व ३१ जुलै रोजी उपलब्ध माहितीचा विचार केला जातो.
- यासंबंधी भांडवल बाजार नियामक सेबीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाते. शेअरबाजारात दोन प्रकारच्या कंपन्यांचे व्यवहार होतात.
- नोंदणीकृत कंपन्या (Listed Securities): या कंपन्या संबंधित बाजारात नोंदलेल्या असून त्यासाठी त्यांनी नोंदणी फी भरलेली असते.
- व्यवहारास परवानगी असलेल्या कंपन्या (Permitted Securities) : या कंपन्या संबंधित बाजारात नोंदवलेल्या नसतात, परंतू त्याची खरेदी विक्री या बाजारात होऊ शकते.
- एक धोरणात्मक तत्व म्हणून अन्य बाजारातील नोंदणीकृत कंपनीस दुसऱ्या बाजारात व्यवहार करू देण्याची परवानगी सेबीने सर्व शेअरबाजारांना दिली आहे.
- कंपनी कायद्याप्रमाणे प्रत्येक सार्वजनिक मर्यादित कंपनीस एका स्थानिक आणि एका राष्ट्रीय पातळीवर खरेदी विक्रीची सोय असलेल्या बाजारात (म्हणजे मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार पैकी एका ठिकाणी) कंपनीची नोंदणी करावी लागते.
- राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही बाजार महाराष्ट्रात असल्याचे त्याचा फायदा महाराष्ट्रात असलेल्या कंपन्यांना होतो.
- त्यांना वेगळ्या स्थानिक बाजारात कंपनीची नोंदणी करावी लागत नाही. यापैकी एका बाजारात नोंद करून वरील अट पूर्ण होते.
- कंपनी नोंदणी करताना किंवा तिचे व्यवहार करण्यास परवानगी देतांना त्याचे भागभांडवल, मालमत्ता, संभाव्य बाजारमूल्य, प्रवर्तक, त्यांचा कंपनीतील हिस्सा, त्यांचे विविध भागधारक ई अनेक गोष्टींचा विचार केला जातो.
- मान्यताप्राप्त अशा मोठया कंपन्यानी त्यांच्या शेअर्सची मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार दोन्हीकडे नोंदणी केली आहे. तरीही कंपनीस दोन्ही राष्ट्रीय पातळीवरील बाजारात नोंदवण्याची सक्ती नसल्याने अनेक कंपन्या फक्त एकाच बाजारात नोंदवलेल्या आहेत.
- दोन्हीही शेअरबाजारानी स्वतः हून काही कंपन्याना त्यांच्याकडे व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे व्यवहार करण्याची परवानगी देताना त्या कंपनीची अन्य बाजारात झालेली नोंदणी, उलाढाल, बाजारभाव यांचा विचार करून बाजाराच्या नियमावलीत बसत असल्यासच परवानगी दिली जाते.
- आतापर्यंत निर्देशांकाचा विचार करताना आजपर्यंत फक्त त्या बाजारात नोंदणी केलेल्या कंपनीचा विचार केला जात होता. ही प्रथा मोडीत काढून राष्ट्रीय शेअरबाजाराच्या NSE Indicies ltd या उपकंपनीच्या इंडेक्स मेंटेनन्स सब कमिटीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत यावेळी प्रथमच बाजारात नोंदणी ऐवजी व्यवहारास परवानगी असलेल्या नेस्ले इंडिया लिमिटेड (Nestle India ltd) या कंपनीचा निर्देशांकात समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
- यानुसार राष्ट्रीय शेअरबाजारांने २८ऑगस्ट २०१९ ला प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाप्रमाणे २७ सप्टेंबर २०१९ पासून निफ्टीमधून इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स (Indiabulls Housing Finance lid) यास वगळून नेस्ले इंडिया लिमिटेड’चा सामावेश करण्यात आला आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे, ज्याचे भविष्यात दूरगामी परिमाण निर्देशांकावर होण्याची शक्यता आहे.
- नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य रु.१.२ लाख कोटी रुपये असून, ते २० व्या स्थानी आहे. या कंपनीचा निफ्टीमध्ये सामावेश झाल्याने शेअर्सवर आधारित राष्ट्रीय शेअरबाजारातील निफ्टीसह १३ निर्देशांक आणि ११ सेक्टरल निर्देशांकातील काही निर्देशांकावर दूरगामी परिणाम होतील.
- याशिवाय या कंपनीचा अनेक म्युच्युअल फंड, इटीएफ (ETF) योजनामध्ये सामावेश होऊ शकेल. अनेक फंड मॅनेजर निफ्टीवर आधारित त्यांच्या फंडात या शेअर्सचा समावेश करू शकतील. याचा परिणाम या शेअर्सचा बाजारभाव व उलाढालीच्या वाढीत होईल.
- याशिवाय या निर्णयामुळे Abbott India, Bayer Cropscience आणि Multi Commodity exchange ltd यांचा भविष्यात निर्देशांकात सामावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- याशिवाय मुंबई शेअरबाजारही सेन्सेक्समध्ये अशा प्रकारच्या शेअर्सचा सामावेश करण्याचा निर्णय घेऊ शकेल. यामुळे आपल्या उपजत मूल्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणारे व मोठी मागणी असणाऱ्या शेअर्सचा निर्देशांकात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
– उदय पिंगळे
शेअरबाजारः DHFL चे महाभारत
राष्ट्रीय शेअरबाजार: को लोकेशन घोटाळा
भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.