Reading Time: 6 minutes

बाजार अचानकपणाने कोसळल्यास माझ्यासारखा सामान्य गुंतवणुकदार हतबुद्ध होतो. ‘आलाss मंदीबाईचा फेरा आलाss’ अशा  हाकाट्यांच्या  गदारोळात जेव्हा बाजार  परत  वर  जाऊ लागतो तेव्हा  तो पुन्हा अधिक खाली जाणार या भीतीपोटी आपण  आपले  उत्तम  दर्जाचे  शेअर्स (अगदी  नुकसान सोसूनही) विकून  मोकळे होतो. तेव्हा ‘दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही’ टाईपचे,  आपल्या  प्राथमिक शाळेतील फळ्यावर लिहिलेले सुविचार आठवा. खरे सांगतो, बाजारातील दैनंदिन उलथापालथीच्या दुष्ट्चक्राला  भेदून पलीकडे  पहाणाऱ्यालाच आर्थिक फायदा होतो. कोणा महान दबंगाने सांगितलेच आहे ‘डर के आगे (ही) जीत है’. निदान बाजाराबाबत ते खरे आहे !!!

गेल्याच वर्षीचा 20 जुलै. माझ्या भाचीच्या वाढदिवसनिमित्ताने कुटुंबातील बच्चेमंडळींना घेवून आमच्या सौ. खोपोलीजवळच्या ‘इमॅजिका थीम पार्क’ येथे पोहोचल्या. सर्वांनी धमाल करायला सुरवात केली असेल नसेल, तोच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड कोसळून मोठा अपघात झाला असून प्राणहानी झाल्याची बातमी समजली. सगळे पोहोचले होते सुखरुप, ती चिंता नव्हती, मात्र परतीचा मुंबई-पुणे प्रवास मात्र खूपच जिकरीचा होऊन मंडळी ब-याच उशीरा घरी पोहोचली.

दुस-या दिवशी कन्यकेने केलेली फोटोग्राफी व शुटींग पहाणे नशिबी होतेच. तेथील रोलर कोस्टर राईडचा आनंद घेतानाचा त्यांचा फोटो बघून मी
” काय गं, भीती नाही वाटली??” असे विचारले, तेंव्हा
“छे, भीती कसली?? इट्स ट्रू, की खूप स्पीड असतो, व्होलॅटीलिटी पण असते, पण बाकी everything is well designed, we know, it’s just for a few moments and then we are going to land safely ..”
कन्यका उद्गारली आणि पुढे “…बाबा, उलट मला एक गोष्ट नोट झाली ती ही, की आपण जो रस्ता straight, Clear, Safe समजतो, तेथेही असे horrible mishaps होऊच शकतात.”
असा खुलासा (thanks to ईंग्रजी माध्यम) करत  ‘Volatility & Risk’ या विषयावरचा जणू वास्तुपाठच तिने अभावितपणे मला शिकवला होता.

बाजाराचे हे सततचे वर-खाली जाणे, हेलकावे खाणे, तीव्र उलथापालथ हा अनेकांच्या कुतूहलाचा, त्याहीपेक्षा भीतीचा विषय आहे. बाजारांतील असे तीव्र चढ उतार पाहूनच बरेचसे लोक त्याला धोकादायक समजतात आणि त्यापासून दूर रहातात. जेथे अशी व्होलॅटीलिटी नाही अशा निश्चित उत्पन्न देणा-या पर्यायांवर सुरक्षितपणाचा सरसकट शिक्का मारतात पण खरेतर वस्तुस्थिती तशी नसते. महाभारतातील मयसभेत जेथे जमीन असल्याचे वाटे, तेथे प्रत्यक्षांत पाणी असे आणि पाण्याजागी जमीन. जेथे व्दार भासमान होई तेथे भिंत असे आणि भिंत दिसे ते प्रत्यक्षात दार असे. आपले जग हे ही खरेतर एक प्रकारची मयसभाच नाही का ??

प्रख्यात गुंतवणूक तज्ञ जे.पी, मॉर्गन यांना एकदा विचारण्यांत आले की येत्या काळांत बाजार कसा राहील ?? तेंव्हा त्यांनी मोठे मासलेवाईक पण अजरामर उत्तर दिले. ते म्हणाले “It will fluctuate.” गंमत म्हणजे अलिकडेच समर्थ रामदासांनी गणपतीचे केलेले “स्थिरताही नाही एक क्षण.. चपळ विषई अग्रगण” असे वर्णन वाचले, आणि बाजाराचे हे स्वभाववैशिष्ट्य आपल्या १४ विद्या ६४ कलांच्या स्वामींकडूनच तर मिळाले नसावे ना?? असे वाटून गेले.

प्रख्यात नाटककार स्व.राम गणेश गडकरी नाटकांत लिहावयाच्या एखाद्या प्रवेशाबाबत आधी खूप वेळ चिंतन करीत असत, मग एखादी कल्पना सुचली व निश्चित झाली की गडबडीने ते ती कागदावर उतरवीत. या सवयीबद्दल ते म्हणाले होते की “मी जेंव्हा कामांत नसतो असे वाटते, तेव्हाच मी खरा कामांत असतो, आणि जेंव्हा मी काम करतो आहे असे दिसते तेव्हा मी कामांतून मोकळा होत असतो.” हा सुप्रसिद्ध ‘दिसते तसे नसते’ फंडा एकदा माझ्या एका मुन्नाभाई प्रवर्गातील मित्राला समजावून सांगायला गेलो, तेंव्हा त्यानेच “मामू ये तो वैसा ही है के सबसे जादा बार सच बोला जाता है बार मे, जब हाथ मे व्हीस्की का ग्लास हो, और जादा से जादा झूठा बोला जाता है अदालत मे,जब हाथ मे भगवद्गीता हो.” असे माझेच प्रबोधन केले होते. कुठे वरवर सरळमार्गी  दिसणारी व्यक्ती आपला अपेक्षाभंग  करते, कधी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणाहून विश्वास  घात होतो.  गुंतवणुकीबाबतही  थोड्या  फार  फरकाने असेच आहे. थोडक्यात काय, व्होलॅटीलिटी ही धोकादायक असेलच असे नाही उलट एखादी अतिशय सरळसोट, साधी सोपी दिसणारी गुंतवणूकच कदाचित धोकादायक असू शकेल.

जगांत, देशांत, कोठेही नैसर्गिक, राजकीय, आर्थिक वा सामजिक, कसलीही मोठी घडामोड होवो, ‘सर्व घटनाक्रम परिणाममं बाजारं प्रति गच्छति‘ ही स्थिती असल्याने बाजार स्थिर रहाणे तसे कठीणच असते. वर्ल्ड ट्रेड सेंटर वरचा हल्ला असो की सत्यमचा घोटाळा- बाजार पडला आणि एखाद्या निवडणुकांचा अपेक्षित निकाल वा अर्थसंकल्पासारखी सकारात्मक घटना- बाजार चढला, हे काल आज नव्हे तर वर्षानुवर्षे होतच आहे.१५ सप्टेंबर २००८ मध्ये कुप्रसिद्ध लेहमन ब्रदर्स यांनी दिवाळखोरी जाहिर केली होती व जगातील सर्वच शेअर बाजार अक्षरशः कोसळले होते. २००६ पासूनचा इतिहास पाहिला तर बाजारात आदल्या दिवशीच्या तुलनेने एका दिवसांत २ टक्क्यांहून अधिक हालचाल (वाढ/ घट) होण्याचे तब्बल ३५०+ प्रसंग नोंदले गेले आहेत. एका दिवसातील हालचाली एवढा रिटर्न, म्हणजे २%, एखाद्या सामान्य मुदतठेव गुंतवणुकीवर आजच्या दराने मिळावयास साधारणतः तीन महिने लागतील हे लक्षात घेतल्यास बाजारांतील तीव्र हालचालींची आपल्याला कल्पना येऊ शकेल. थोडक्यात काय, शेअर बाजार व्होलाटाईल आहेत हे वाक्य हे ‘श्रीमंत दगडूशेठ वा लालबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांची गर्दी उसळली आहे’ या वाक्याइतकेच सत्य पण नाविन्यशून्य आहे.

अनेकदा ‘धोका’ म्हणजे काय’  याविषयीच्या आपल्या कल्पनाच अस्पष्ट आणि विपर्यस्त असतात. ब्लूमबर्ग चे स्तंभलेखक बॅरी रिथॉल्ट्झ यांनी या बाबत सुरेख विवेचन केले आहे. त्यांच्या मते एखाद्या घटने वा प्रक्रिये मागील धोका निश्चित करताना नेहमीच वस्तुस्थितीपेक्षा अशा प्रसंगातील नाट्यमयता, ग्लॅमर अशा गोष्टींना महत्व असते.  रिथॉल्ट्झ यांनी विचारलेल्या ‘मानवी मृत्यूस सर्वाधिक कारणीभूत ठरणारा जीव कोणता??’ या प्रश्नाचे उत्तर देतांना बहुतेकांनी वाघ, सिंह, शार्क अशी उत्तरे दिली. पण या प्रश्नाचे खरे उत्तर असलेला ‘डास’  कोणालाही आठवला नाही. त्यांनी ह्या सगळ्याचा संबंध गुंतवणुकीशी फार सोप्या पद्धतीने लावला आहे. ते म्हणतात- ‘We fear the things that happen relatively rare. Market crash is such a thing!!!

आपण छोटेखानी आउटींगचा प्लॅन बनवून घरातून निघतो आणि का कोण जाणे थोड्याच वेळात पनवतीला सुरवात होते. टायर पंक्चर होणे, काहीतरी महत्वाची वस्तू घरीच राहिल्याचा साक्षात्कार होणे, गाडीतील एखाद्या सदस्याला गाडी लागणे, रस्त्यांची भयावह स्थिती. एक ना दोन. ह्या गोष्टी नक्कीच आपल्याला नवीन नाहीत. अशा वेळी आपण काय करतो?? कार्यक्रम रद्द करुन परत मागे फिरतो ?? बहुतेकदा नाही, आपण परिस्थितीला दुषणे देत, पण तिच्यावर मात करीत उशीरा का होईना आपल्या नियोजित स्थळी पोहोचतो आणि मग मात्र आपल्या कष्टाचे चीज होते. मस्त जेवण-खाण (आमची मजल एवढीच! आपल्याला काही वाढवायचे असेल तर हरकत नाही), साईट सीईंग, फोटोग्राफी, गाणी, जोक्स, मस्ती.. खूप धमाल येते, आपली ट्रीप संस्मरणीय होते. तद्वत सुरवातीचे अडथळे, आशा-निराशेच्या लाटांतून निभावल्यावर बाजारांतील चांगली गुंतवणूक आपल्याला असेच समाधान मिळवून देते.

गुंतवणुकीच्या बाबतीत  चांगले वाईट, योग्य-अयोग्य ठरवताना  आपण बहुतेकदा चुकीचे निकष लावतो. बाजारातील रोजचे चढ-उतार, त्यातील तीव्र व्होलॅटीलिटी,  क्वचित प्रसंगी होणारा ‘क्रॅश’  आपल्या नशिबी  येऊन आपली अर्थिक वाताहत झाली तर??  या  भीतीने  आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र  नेमक्या त्याचवेळी ‘उगीच भानगड नको, धोका न घेतलेलाच बरा’ या  भावनेने  आपण  अपारदर्शी, नियमबाह्य, भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्‍या, अधिक परतावा  देणार्‍या,  पण मुळात मुद्दलच जोखिमीत टाकणार्‍या  गुंतवणूक योजना, अनावश्यक  महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा वरवर सरळमार्गी पण अंतिमतः नुकसानकारक अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लाऊन घेतलेले असते. बॅरी साहेब यांचा उल्लेख ‘गुंतवणुकीतील कोलेस्ट्रॉल’ असा  करतात, ज्याचा  सततच्या धोक्यामुळे झालेले सर्वसामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान हे  प्रत्यक्ष बाजाराने दिलेल्या  धोक्यामुळे झालेल्या  हानीपेक्षा जास्त असते.

मी बाजारांत अगदी नव्याने रस घेऊ लागलो होतो तेंव्हाची गोष्ट. बहुधा १९९२ असावे. दुपारी लेक्चर्स संपल्यानंतर बहुतेकदा जीजीभॉय टोवर्सकडे (शेअर बाजाराची इमारत) चक्कर असायची, तेव्हा बाजार स्व.हर्षद भाईंच्या आशिर्वादाने तेजीत होता. वडिलांचे रिटायरमेंटमधील काही पैसे (अर्थातच काही तज्ञ लोकांच्या सल्ल्यानेच) बाजारात गुंतवल्यास त्यावर कसे भरभरुन रिटर्न्स मिळतील आणि मी कसा कौतुकास पात्र होईन याचा अनेकदा विचार करुन मी शेखचिल्लीला कधीच मागे टाकले होते.  अचानक इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसैन आणि प्रे. बुश (Sr) यांच्यात कुवैतवरुन ठिणगी पडली. प्रश्न इतका चिघळला की आता तिसरे महायुद्ध होते की काय असे वाटावे. खोटं नाही, माझ्या गावी तळ्याला, कधी नव्हे ती दुकानांत (रेशनच्या नव्हे) सामानासाठी रांग लागलेली मी पाहिली. एवढे दिवस तेजींत असलेला बाजार प्रचंड अस्थिर झाला, एखाद्या खवळलेल्या समुद्राप्रमाणे त्यात तेजी/मंदीच्या लाटा उसळू लागल्या. काही दिवसांतच त्याने चांगलीच घसरण नोंदविली. अगदीच नवशिका मी, मला बाजाराची ही रौद्र, व्होलाटाईल रुपं नवीन होती. मी कमालीचा उदास झालो. शेवटी ज्यांच्या सल्ल्याने मी व्यवहार करीत होतो अशा जाणत्या ब्रोकरला विचारले-

“सर आता काय होणार?? अणि जर हे युद्ध खरोखरच नाही थांबले तर??”

“…कूल. रिलॅक्स, इथे आपण टेंन्शन घेऊन ते थांबेल काय?? ते म्हणाले. 

“पण मग युद्धामुळे सगळ्याच कंपन्यावर वाईट परिणाम होणार…आपण गुंतवणुक कुठे करायची??”- बाबांच्या रिटायर्मेंटचे पैसे गुंतवायला उतावळा झालेला मी.

“Don’t worry my boy. Volatility is not a threat, it’s an opportunity, even if it happens as you are thinking, if the war lasts for year, .still it’s simple. Then you have to choose a company that makes ‘coffins’… बस्स”.

माझ्याकडे पहात ते शांतपणे म्हणाले.
पुढच्याच आठवड्यात श्री. बाबांच्या फोलियोसाठी आम्ही Cadbury(I) चे शेअर्स घेतले आणि पुढे भरपूर नफ्यात विकलेही.

मी नेहमीच निवडक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पुरस्कार करीत आलो आहे. येथेही गुंतवणूक म्हणजे उत्तम ब्ल्यु-चीप् समभागांतील दीर्घकालीन गुंतवणूक हे अध्याहृत आहे. बाजारात अशा प्रकारची नियमित केलेली गुंतवणूक काळाबरोबरच परिपक्व होते, बाजारातील धोक्याची(Market Risk) शक्यता जवळजवळ शुन्यवत होते आणि मिळणारा परतावा हा गुंतवणुकीच्या अन्य पर्यांयांच्या तुलनेत सरस असतो हे सिद्ध करणारी खूप आकडेवारी उपलब्ध आहे, जागेअभावी येथे ती देत नाही, मात्र कोणास रस असल्यास माझ्याशी जरुर संपर्क साधावा.

बाजार अचानकपणाने कोसळल्यास (अर्थात तो काय २१ दिवसांची  जाहिर नोटिस  देऊन  थोडीच कोसळणार?) माझ्यासारखा सामान्य गुंतवणुकदार हतबुद्ध होतो. ‘आलाss मंदीबाईचा फेरा आलाss’ अशा हाकाट्यांच्या गदारोळात जेव्हा बाजार  परत  वर  जाऊ लागतो तेव्हा  तो पुन्हा अधिक खाली जाणार या भीतीपोटी  आपण आपले  उत्तम  दर्जाचे  शेअर्स (अगदी  नुकसान  सोसूनही) विकून  मोकळे होतो.

तेव्हा ‘दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही’ टाईपचे,  आपल्या  प्राथमिक शाळेतील फळ्यावर लिहिलेले सुविचार आठवा. खरे सांगतो, बाजारातील दैनंदिन उलथापालथीच्या दुष्ट्चक्राला भेदून पलीकडे पहाणाऱ्यालाच आर्थिक फायदा होतो. कोणा महान दबंगाने सांगितलेच आहे ‘डर के आगे (ही) जीत है’. निदान बाजाराबाबत ते खरे आहे !!!

प्रसाद भागवत

(चित्र सौजन्य- गुगल इमेजेस)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…