चांदीमध्ये गुंतवणूक (Silver investment) ही संकल्पना अनेकांसाठी अपरिचित आहे. यासंबंधातील मागील एका लेखात आपण उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा विचार केला होता. दागिन्यांच्या बाजारात सोन्याखालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंत होते. त्यात होणारी भाववाढ किंवा घटही सोन्यापेक्षा अधिक अस्थिर आहे त्यामुळे त्यातून परतावाही कदाचित अधिक मिळू शकतो. सोन्याने गेल्या अनेक वर्षात महागाईवर मात करणारा परतावा दिला आहे. दिर्घकाळात चांदीतून चांगला परतावा मिळेल का? आपल्याला काय वाटते. मागील 10 वर्षात सोन्यामधून मिळालेला परतावा 10% तर चांदीमधून मिळालेला परतावा अर्ध्या टक्यापेक्षा कमी आहे.
Silver investment: चांदीमधील गुंतवणूक
- सोन्याखालोखाल जरी चांदीचे दागिने बनवले जात असले जगभरातील स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे.
- याशिवाय चांदीचे दागिने मोडून मिळणारी किंमत आणि यामध्ये कापली जाणारी कसर याचा विचार करता असा व्यवहार आतबट्याचा ठरतो.
- हे दोन्ही धातू उपयुक्त असले तरी सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर खूपच कमी असल्याने नाणी, वापरातील अनेक वस्तू म्हणजे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू शोभेच्या वस्तूमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
- याशिवाय चांदी सर्वाधिक विद्युतवाहक असल्याने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूत त्याचप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो, फोटोग्राफी मध्येही त्याचा वापर होतो. याच्या भावात बरेच चढउतार होत असल्याने त्यातून गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध होतात.
- 925 होलमार्क असलेले चांदीचे दागिने 92.5% शुद्धतेचे असतात, तर औद्योगिक वापरासाठी लागणारी चांदी 99.99% शुद्धतेची असते. उपलब्ध चांदीमधील अर्ध्याहून अधिक चांदी औद्योगिक वापरासाठी वापरली जाते.
Silver investment: चांदीमध्ये सध्या उपलब्ध गुंतवणूक प्रकार-
नाणी, बार स्वरूपात:
- आपण सोनाराकडून प्रत्यक्ष नाणी, बार खरेदी करून चांदीमध्ये गुंतवणूक करता येईल याची शुद्धता उत्तम असल्यास 2% प्रक्रिया शुल्क वजा करून पैसे परत मिळू शकतात.
- ज्या वित्तसंस्था चांदीची विक्री करतात त्या पुनर्खरेदी करीत नाहीत, मात्र अशी चांदी आपल्याकडे असल्यास सोनार ती खरेदी करतात.
कमोडिटी बाजारात सौदे करून:
- आपल्याला चांदीच्या भावात पडणाऱ्या फरकाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यातील भविष्यातील सौदे करता येतील. हे सौदे प्रत्यक्ष चांदी घेऊन अथवा त्यातील भावातील फरकाचा लाभ घेऊन अशा दोन्ही प्रकारे करता येतात.
- कमोडिटी मधील सर्वाधिक सौदे MCX या एक्सचेंज वरती होतात त्यातील 98% सौदे हे भावातील फरकाचा लाभ घेण्याच्या हेतूने केले जातात.
- सौंदापूर्तीच्या कालावधीपर्यंत खुले असलेले सौदे प्रत्यक्ष पैशांची देवाण घेवाण करून बंद केले जातात.
इ सिल्व्हर:
- येथील ब्रोकरेज फर्मनी परदेशी गुंतवणूक संस्थाशी करार करून, तर काही परकिय फर्मच्या भारतीय शाखांनी या योजना आपल्या खातेदारांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे नियम अटी किमान दलाली मालमत्ता व्यवस्थापन खर्च याची खात्री करूनच तिथे गुंतवणूक करावी.
- अनेक स्वदेशी आणि विदेशी कंपन्यांनी डिजिटल माध्यमातून चांदी खरेदी करण्याचा त्याचप्रमाणे पाहीजे असेल तर भावातील फरक किंवा धातुरुपात चांदीची खरेदी पर्याय दिला आहे.
- MMTC या सरकारी कंपनीने स्विझरलँड मधील कंपनीच्या सहकार्याने चांदीची नाणी आणि दागिने खरेदी करण्याचा पर्याय दिला असून ही खरेदी ऑनलाईन ऑफलाईन करता येईल.
- माईलस्टोन या कंपनीने स्थावर मालमत्ता आणि मौल्यवान धातूंत गुंतवणूक करण्याच्या विविध योजना आणल्या आहेत, परंतू त्यात मोठी किमान गुंतवणूक करावी लागत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या उपयोगाच्या नाहीत.
- जेथे धातूरूपात प्रत्यक्ष चांदीची देवाण घेवाण होईल तेथे 3% जीएसटी आकारण्यात येतो.
या उपलब्ध योजनांमध्ये आता 2 नवीन योजनांची भर पडत आहे.
सिल्वर इटीएफ:
- या योजनेत जमा होणारी रक्कम शुद्ध चांदी आणि चांदीसंबंधित उद्योगात केली जाईल.
- हा म्युच्युअल फंड योजनेसारखा प्रकार असला तरी त्याच्या युनिटची खरेदी विक्री शेअरबाजारात होईल.
- आयसीआयसीआय म्युच्युअल फंडामार्फत या युनिटची प्रारंभिक युनिट विक्री 5 जानेवारी 2022 पासून 19 जानेवारी 2022 पर्यंत चालू आहे.
- अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच योजना असून लंडन मेटल एक्सचेंज वरील भावानुसार घाऊक भारतातील चांदीच्या भावावर होणाऱ्या परिणामांचा फायदा मिळवणे हा या योजनेचा हेतू आहे. याचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी (0.4 ते 0.5%) असेल.
- यामुळे धातूस्वरूपात चांदी आपल्याकडे न ठेवता त्याचा फायदा मिळवता येईल. किमान गुंतवणूक ₹100/- त्याहून अधिक गुंतवणूक ₹1/- च्या पटीत असेल. यासाठी डी मॅट खाते असणे जरुरीचे आहे. खरेदी विक्रीच्या वेळी नियमानुसार ब्रोकरेज व इतर कर द्यावे लागतील.
- हजर भावाच्या तुलनेत एक्सचेजवरील भाव काय राहील? हे मागणी पुरवठ्यावर अवलंबून असल्याने अभ्यासावे लागेल.
- अशाच प्रकारची दुसरी योजना निप्पोन इंडिया फंडाकडून 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत येत असून यातील किमान गुंतवणूक ₹1000/- व त्याहून अधिक गुंतवणूक ₹1/- च्या पटीत असेल.
हे नक्की वाचा: Silver investment: चांदीमध्ये गुंतवणूक कशी कराल?
सिल्व्हर फंडस ऑफ फंड:
- फक्त सिल्वर इटीएफ फंडामध्ये गुंतवणूक करणारा हा फंड असून तो अन्य म्युच्युअल फंड योजनेसारखा असेल.
- अशी योजना निप्पोन इंडिया फंड 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत आणत असून यात किमान ₹100/- आणि त्याहून अधिक ₹1/- च्या पटीत रक्कम गुंतवता येईल. यासाठी डी मॅट खाते हवेच ही अट नाही.
- आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाने अशाच प्रकारची योजना लवकरच बाजारात आणण्याचे ठरवले आहे. योजना परिचालन खर्च 1% असेल ब्रोकरेज द्यावे लागणार नाही.
- सोन्याची खरेदी विक्री करण्याच्या तुलनेत चांदीची फक्त खरेदी आणि खरेदी / विक्री करण्यासाठी मोजकेच मार्ग असले ते असे व्यवहार करणे अत्यंत सोपे आहे.
- खरेदी करताना जगभरात आणि भारतात विविध ठिकाणी चालू असलेला बाजारभाव त्यातील चढ उतार तपासून खरेदी विक्री करण्याचा विचार करावा.
- उद्योग क्षेत्रात चांदीची मागणी वाढल्याने नजीकच्या भविष्यकाळात चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची जास्त शक्यता आहे असे झाल्यास त्यातून चांगला परतावा मिळू शकतो.
विशेष लेख: Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?
सोन्याचे भाव आणि शेअरबाजार यांचे नाते एकमेकांच्या विरोधात आहे म्हणजे निर्देशांक वाढत असल्यास सोन्याच्या भावात कमी वाढ होते, तर निर्देशांक कमी झाल्यास सोन्याचे भाव वाढतात. औद्योगिक प्रगती झाल्यास निर्देशांक वाढतो आणि त्याच बरोबर चांदीचे भाव वाढत असतात असे संकेत आहेत. चांदीबाबत नव्याने उपलब्ध झालेल्या इटीएफ आणि एफअँडएफ योजनांची आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या गुंतवणूक संधीची माहिती देणे हाच या लेखाचा उद्देश असून ही गुंतवणूक शिफारस नाही. याबाबत आपला निर्णय गुणवत्तेवर किंवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies