शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?

Reading Time: 3 minutes

शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार? 

तुम्ही शेअर्स ट्रेडिंग करता की त्यात गुंतवणूक करता?

जर ट्रेडिंग करत असाल, तर तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही आधीच विकलेल्या शेअर्सच्या भावावर तुमचे लक्ष असलेच पाहीजे.

जर गुंतवणूकदार असाल आणि त्यातून दिर्घकाळात मोठी भांडवल निर्मिती करायची असे आपले उद्दिष्ट असल्यास आपल्याकडे असलेल्या शेअर्स भावावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक नाही. वेळोवेळी आपल्याला अपेक्षित असलेला फायदा मिळाल्यास त्याचा फायदा करून घेणे हे अधिक फायदेशीर ठरते. 

गुंतवणूकसंच व्यवस्थापन (Portfolio Management) योजना…

 • जेव्हा आपल्याकडील असलेला समभाग संचाचे (Portfoilo) मूल्य  वाढत असते तेव्हा (खरेतर हे त्याचे आभासी मूल्य) आपल्याला अभिमानास्पद वाटत असते आपले निर्णय कसे योग्य असतात ते आपल्याला सुखावत असते. 
 • आपल्याला सर्व समजते आणि आता अशाच चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक मूल्य वाढल्यास आपल्या सर्वं इच्छा लवकरच पूर्ण होतील याची नुसती कल्पना आपल्याला दिलखुश बनवते. खरंतर शेअरबाजाराच्या इतिहासात बाजार सातत्याने वाढत राहील असा फार कमी काळ असतो.  
 • मंदीच्या काळात कितीही गुंतवणूकदार हुशार असला तरी बाजार त्याच्या मनोबलाची आत्यंतिक परीक्षा पाहतो. याचा अनुभव आपल्याला अलीकडेच आला असेल, यामुळेच एका क्षणी गुंतवणूकदार निराश होतो आणि चुकीचा निर्णय घेऊन एवढे वर्ष घेतलेली मेहनत वाया घालवतो. 
 • सर्वच क्षेत्रात एका वेळी तेजी /मंदी नसल्याने बाजार सातत्याने वरखाली होत असतो. 
 • या सर्वच काळात अगदी मंदीचा कालखंड असेल तरीही होत असलेल्या प्रचंड उलाढालीवरून कोणाचा ना कोणाचा फायदा होत असतोच. किंबहुना वैयक्तिक गुंतवणूकदारांपेक्षा संस्थात्मक गुंतवणूकदार यात असलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेत असतात, तसेच नफाही मिळवत असतात म्हणूनच बाजार एका मर्यादेच्या खाली किंवा वर सहसा जात नाही. 

शेअर्स खरेदीचं सूत्र…

या सर्व परिस्थितीवर मात करणारा असा एक चांगला गुंतवणूक संच आपल्याकडे असावा असे सर्वानाच वाटत असते असा संच बनवताना काय करावे आणि काय करू नये यावर एक दृष्टिक्षेप-

 • यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे आपल्याकडील शेअर्सच्या बाजारभावावर, तुम्ही डे ट्रेडर किंवा शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर लक्ष ठेवायची आवश्यकता आहे अन्यथा नाही.
 • अनेकांना दररोज आपल्या गुंतवणुकीतून मिळत असलेला नफा तोटा किती आहे हे काढण्याची सवय असते. बहुतेक वेळा भाव सातत्याने वर खाली होत असल्याने आपल्या आभासी नफ्यातोट्यात सातत्याने फरक पडत असतो. खरा नफा किंवा तोटा तेव्हाच होईल जेव्हा खरोखरच विक्री केली जाईल. तेव्हा असा नफा तोटा काढणे म्हणजे आपल्या मनस्तापात वाढ करणे होय.
 • ज्याप्रमाणे सातत्याने दररोज नफा- तोटा पाहणे चूक आहे त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणूक संचाकडे अजिबात न पाहणे हे ही चुकीचे आहे.  यापूर्वी अनेक गुंतवणूक सल्लागार दीर्घकालीन गुंतवणूकदारांना असा सल्ला देत होते. ३०/४० वर्षांपूर्वी हा  सल्ला सर्वमान्य होता आता त्याच्या कित्येक पट उलाढाल वाढल्याने अनेक फायदेशीर गुंतवणूक संधी आहेत त्याचा उपयोग आपल्याला करून घेता यायला हवा.
 • आपल्याकडे असलेल्या काही समभागाच्या भावात कधीकधी अपवादात्मक प्रमाणात चढ / उतार दिसून येतात. एक जागृत गुंतवणूकदार म्हणून यामागचे कारण जाणून घेणे जरुरीचे आहे.

पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणजे काय?…

तेव्हा आपल्या समभाग संचावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे त्याच्या योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने एका क्षेत्रातील एकच शक्यतो प्रमुख कंपनी असू द्यावी, आपल्या गुंतवणूक संचात एकूण १० हून अधिक कंपन्या नसाव्यात म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे शक्य होते. यासाठी उपयुक्त गोष्टी-

 • समभाग बाजारभावात जी चढ उतार होते त्याच्या टक्केवारीनुसार भाव वाढले तर आपल्याकडील काही समभाग विकावेत व कमी झाले, तर खरेदी करावेत यामुळे सतत थोडे थोडे पैसे मिळत राहतात व भाव ज्याप्रमाणे वरखाली होतात त्याप्रमाणे जीव खालीवर न होता त्यातील चढ अथवा उतार ही खरेदी विक्रीची संधी वाटेल. त्यामुळे मानसिक समाधानही लाभेल.
 • आपल्याकडे असलेल्या शेअर्स संदर्भातील महत्वाच्या बातम्या वाचाव्यात या बाबतीत आपली माहिती कायम अद्ययावत ठेवावी. यातील अनेक गोष्टीं या शेअर्सच्या भावावर परिणाम घडवून आणतात. 
 • गुगल अलर्ट चालू करून त्यात आपण लक्ष ठेवत असलेल्या कंपन्या नोंदवाव्यात या कंपनी संबंधीची  माहिती आपल्या मेलवर मिळत राहील. मनिकंट्रोल, स्क्रिनर यांच्या संकेतस्थळावर आपले शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवल्यास या कंपनी संबंधीच्या बातम्या आपणास नियमितपणे मिळत रहातात.
 • प्रत्येक कंपन्या एक्सचेंजच्या नियमावलीनुसार वर्षातून ४  वेळा  तिमाही अहवाल जारी करतात तो नियमितपणे नजरेखालून घालावा. 
 • कंपनी तोट्यात असेल तर कारणे शोधावीत. दर तिमाहिस सातत्याने तोटाच होत असेल तर गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय गुणवत्तेनुसार घ्यावा.
 • कंपन्या दरवर्षी वार्षिक अहवाल मेलवर पाठवतात, तो नजरेखालून घालावा. यातून कंपनीची प्रगती, भविष्यातील योजना त्यांच्या उपकंपन्या या सर्वांची माहिती मिळते. जर आपल्याला वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असेल तर तशी विनंती केल्यास ती मिळू शकते.

भांडवल बाजार : समभाग आणि रोखे…

 • कंपनी संकेतस्थळावर, मनिकंट्रोलवर कॉर्पोरेट अनौन्समेंट जाहीर केल्या जातात यावरून डिव्हिडंड, बोनस, समभाग विभागणी, नवीन व्यवसाय अधिग्रहण, अन्य कंपनीत विलीनीकरण यासारख्या महत्वाच्या घडामोडींची माहिती असते. ती नियमित अंतराने पहावी. 
 • कंपनीतील प्रवर्तकांच्या हिश्याची माहिती मिळवावी ती वाढत असेल किंवा तेवढीच राहात असेल तरी त्यातून कंपनीच्या प्रवर्तकांचा कंपनीच्या कामगिरीवर असलेला विश्वास दिसून येतो.
 • प्रवर्तकांनी आपल्याकडील समभाग तारण ठेवून कर्ज घेतलंय का? जर घेतले असेल तर त्याचे कारण काय? कर्ज फेडण्याची योजना यांची माहिती मिळवावी प्रमोटर्स कंपनीचे मूळ मालक असल्याने कंपनीच्या परिस्थितीबद्धल अधिक विश्वासार्ह माहिती त्यांच्याकडे असते. 
 • जर मोठ्या प्रमाणात शेअर गहाण ठेवून कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर फेडले जात नसेल तर भागधारकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

अशी आवश्यक ती सर्व माहिती आपण कंपनीचे संकेतस्थळ, स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ, मनीकंट्रोल यावरून मिळऊ शकतो. यावरून कंपनी भवितव्याचा अंदाज घ्यावा आणि वेळोवेळी गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार करावा.

उदय पिंगळे

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!