Radhakishan Damani
फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये डी मार्टचे संचालक ‘राधाकिशन दमानी (Radhakishan Damani)’ यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. जगातील १०० कोटी संपत्ती असलेल्या श्रीमंत लोकांमध्ये ‘राधाकिशन दमानी’ यांचं नाव ९८ व्या क्रमांकावर आहे. १९.२ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या वैयक्तिक संपत्तीची नोंद करून दमानी यांनी हे स्थान पटकावलं आहे. मुंबईत पूर्वी एका खोलीत राहणाऱ्या व्यक्तीने मिळवलेलं हे यश भारतीयांसाठी खूप प्रेरणादायी आहे. ‘शंभर कोटी क्लब’ ही सर्वांसाठीच उत्सुकतेची गोष्ट आहे. एखाद्या सिनेमाची कमाई असो किंवा एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती शंभर कोटीच्या वर गेली की चर्चा ही होतेच. फोर्ब्स मासिक हे दरवर्षी जगातील १०० अशा लोकांची यादी जाहीर करत असते ज्यांची संपत्ती ही शंभर कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
एका मध्यमवर्गीय मारवाडी कुटुंबात जन्म झालेल्या, एकच वर्ष फक्त माहाविद्यालयात गेलेल्या ‘राधाकिशन दमानी’ यांनी वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर बेअरिंग चा व्यवसाय सोडून स्टॉक मार्केटमध्ये ‘ब्रोकर’ होणे, २ वर्षात ते काम सोडून मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आणि तो इतक्या मोठ्या पातळीवर नेऊन ठेवणे हा प्रवास थक्क करणारा आहे. राकेश झुनझुनवाला हे सुद्धा ‘राधाकिशन दमानी’ कडून स्टॉक मार्केटच्या गोष्टी शिकले आहेत असं सांगितलं जातं.
हे नक्की वाचा: शिव नाडार यांच्या यशाचा थक्क करणारा प्रवास
डी मार्टच्या संचालकांनी हा वैयक्तिक शंभर कोटी संपत्तीचा पल्ला कसा पार केला असेल ? ज्या यादीमध्ये मुकेश अंबानी, अदानी, अझीम प्रेमजी , शिव नाडार आणि लक्ष्मी मित्तल सारखे उद्योजक व्यक्ती आहेत त्या यादीत ‘राधाकिशन दमानी’ कसे पोहोचले असतील ? त्यांनी रिटेल क्षेत्रातील इतर व्यवसायिकांपेक्षा काय वेगळं केलं असेल ? या दहा मुद्द्यातून जाणून घेऊयात :
Radhakishan Damani: राधाकिशन दमानी यांच्या यशाची १० रहस्ये
१. नेहमी पैसे गुंतवत रहाणे :
‘राधाकिशन दमानी’ हे नेहमीच १०, १५ किंवा २० वर्षांच्या काळासाठी विविध उद्योगांमध्ये पैसे गुंतवत असतात, पैसे खेळते ठेवत असतात. सर्वाधिक गुंतवणूक ही त्यांनी ‘अव्हेन्यू सुपरमार्ट्स’ मध्ये करून ठेवली आहे. पण, ते त्यावरच फक्त अवलंबून नाहीयेत हेसुद्धा यावरून लक्षात येतं.
२. डी मार्टच्या संचालकांची इतर गुंतवणूक:
इंडिया सिमेंट्स, सुंदरम फायनान्स, व्हीएसटी इंडस्ट्रीज या कंपनीच्या यशामध्येही ‘राधाकिशन दमानी’ यांच्या कुशल नेतृत्व आणि स्मार्ट गुंतवणूक या गोष्टींचा सिंहाचा वाटा आहे.
३. अव्हेन्यू सुपरमार्ट्सची योग्य वेळी केलेली लिस्टिंग:
मार्च २०१७ मध्ये राधाकिशन दमानी यांनी आपल्या कंपनीचे समभाग मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आणण्याचं ठरवलं. दमानी आणि डि मार्टसाठी ही गोष्ट ‘गेम चेंजर’ ठरली.
४. स्टॉक मार्केट मधील प्रगती:
मार्च २०१७ मध्ये स्टॉक मार्केट मध्ये डि मार्टची सुरुवात झाल्यापासून मार्च २०२१ पर्यंतच्या या चार आर्थिक वर्षात या उद्योग समूहाने ६ पट वाढ करून दाखवली आहे. ३९,८१३ कोटी रुपये इतके बाजारमूल्य असलेल्या या उद्योग समूहाने आज २ लाख कोटींचा पल्ला पार केला आहे. मागच्या एका वर्षात डी मार्ट च्या शेअर्सने ६२% इतकी वाढ दर्शवली आहे.
विशेष लेख: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह
५. सरकारी नियमांची काटेकोर पालन:
‘राधाकिशन दमानी’ यांनी नेहमीच कायद्यातील बारकाव्यांचा काटेकोरपणे अभ्यास आणि त्यावर त्वरित आंमल केला आहे. ‘सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ च्या नवीन नियमानुसार ‘राधाकिशन दमानी’ यांनी आपल्या कुटुंबाचा शेअर्स मधील वाटा हा ८२% वरून ७५% वरून आणून ठेवला आहे. नियम पाळणे आणि आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा कमावून देणे हाच उद्देश दमानी सरांनी डि मार्ट सुरू केल्यापासून डोळ्यासमोर ठेवला आहे.
६. विक्री आणि नफा यांची योग्य सांगड:
रिटेल क्षेत्रातील तीव्र स्पर्धा लक्षात घेऊन कित्येक विक्रेते हे आपल्याकडील वस्तू कमीत कमी नफ्यात विकतात आणि झटपट नफ्याला जास्त प्राधान्य देतात. ‘राधाकिशन दमानी’ यांनी विक्री आणि नफा या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली आणि विक्री वाढवण्यात नफा कमी होऊ दिला नाही. हेच कारण आहे की डी मार्टचा CAGR म्हणजेच कंपाउंड वार्षिक प्रगतीचा दर हा २००२ पासून ५६% इतका आहे. विक्री दर हा २००८-२००९ पासून सातत्याने ३६% इतका आहे.
७. साधी राहणी:
‘राधाकिशन दमानी’ हे नेहमीच साधी राहणी पसंत करतात. प्रसार माध्यमांसमोर ते फार कमी येत असतात. आपलं घर सुद्धा त्यांनी इतके वर्ष साधं ठेवलं होतं. २० वर्ष ‘डी मार्ट’ हा ब्रँड उभा केल्यानंतर त्यांनी आता मलबार हिल्स या भागात घर घेतलं आहे. आपल्या प्रत्येक स्टोअरमध्ये कमीतकमी खर्च आणि ग्राहकांना अधिकाधिक सूट यावर त्यांचा नेहमीच भर असतो. कदाचित, यामुळेच ज्या काळात बिग बझार, स्पेन्सर्स, मोर सारखे रिटेल उद्योग हे नुकसान सहन करत होते त्याच काळात डी मार्ट प्रगतीपथावर होतं.
८. स्वतःची वास्तू:
रिटेल क्षेत्रातील इतर सर्व स्पर्धक हे नेहमी एका भाडेतत्वावर घेलेल्या वास्तूमध्ये आपलं स्टोअर सुरू करत असतात. पण, कोणतंही डी मार्ट हे मात्र नेहमीच स्वतःच्या वास्तूमध्येच सुरू होत असतं. दरवर्षी होणारी भाडेवाढ, पत्ता बदलल्यावर ग्राहकांना आणि त्यांच्या विक्रेत्यांना होणारी गैरसौय टाळण्यासाठी डी मार्टने हे धोरण सुरुवातीपासून ठेवलं आहे.
९. प्रत्येक जागेत डी मार्ट:
२००२ ते २०२१ या काळात डी मार्टने एकूण २३८ स्टोर सुरू केले आहेत. चालू आर्थिक वर्षात डी मार्टचं नवीन ५९ स्टोर सुरू करण्याचं नियोजन आहे. भारतातील प्रमुख शहरात डी मार्टचे जसे स्टोर बघायला मिळू लागले तसा लोकांमध्ये डी मार्ट बद्दल एक विश्वास निर्माण झाला.
१०. काळाची पावलं ओळखणे:
ई-कॉमर्सची वाढती मागणी बघता डी मार्टने सुद्धा ‘डी मार्ट रेडी’ नावाने ऑनलाईन स्टोर सुरु केले आहेत. ज्या शहरात डी मार्टने स्टोर सुरू केले आहेत तिथे ग्राहक ऑनलाईन ऑर्डर करून डी मार्टच्या वस्तू घरपोच मागवत असतात.
सध्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या ‘राधाकिशन दमानी’ यांच्या व्यवयसाय करण्याची पद्धत स्टार्टअप सुरू करणाऱ्यांनी शिकण्यासारखी आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Radhakishan Damani in Marathi Mahiti, Radhakishan Damani in Marathi, Radhakishan Damani mahiti