Reading Time: 3 minutes

भांडवली बाजारात मालमत्तांचे भाव आपल्याला वरखाली होतांना दिसत असतात, त्यांची अनेक ज्ञात/अज्ञात कारणं असतात, या सर्वांची चर्चा आपण यापूर्वी केली आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील संबंधातून बाजारभाव शोधला जात असला, तरीही अंतिमतः तो कंपनीच्या कामगिरीवर कुठेतरी स्थिर होत असतो, असा अनुभव आहे. तो स्थिर होण्यापूर्वी अनेकदा ज्या मूलभूत पद्धतीला अनुसरून शोधला जावा अपेक्षित आहे, तसं न होता, त्यावर काही वैयक्तिक पूर्वग्रहांचा प्रभाव पडतो. 

  • बाजारभाव, एकतर तेजी किंवा मंदी दर्शवत असतात किंवा एका ठरावीक भावपातळी दरम्यान  वरखाली होत असतात. भावात अशा हालचाली होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा सारखाच दिसणारा भाव हा अनेकांना जसा खरेदीस योग्य वाटतो, त्याचप्रमाणे तो विक्रेत्यांना ही विकण्यासाठी योग्य वाटत असतो. असं वाटणाऱ्याची संख्या किती आहे, त्यावर भाग वर जाणार,खाली येणार की त्याच पातळीत राहणार हे ठरत असते. यामधे गुंतवणूकदारांच्या सामूहिक भावनेचा मोठा प्रभाव पडत असतो. या भाव-भावना नेमक्या कोणत्या असतील आणि त्यांचा काय प्रभाव पडेल? हा प्रभाव पडत असेल तर त्यामागे कोणते पूर्वग्रह असतील?  हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
  • गुंतवणूकदार हा बाजारात गुंतवणूक करताना त्या शेअरच्या वास्तविक मूल्याचा शोध घेऊन त्याच्या तुलनेत योग्य गुंतवणूक मूल्याच्या शोधात असतो. मूल्यांकन करत असताना, तो काही पूर्वग्रह बाळगत असेल तर त्या पूर्वग्रहांची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे.
  • “बाजारातील अस्थिरता ही गुंतवणूकदारांच्या बदलत्या मतांमुळे होते” असे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि तत्वज्ञ “जॉर्ज सोरोस” यांनी आपल्या  “अल्केमी ऑफ फायनान्स” या पुस्तकातून “रिफ्लेक्सिव्हिटी थेअरी” ही संकल्पना स्पष्ट केली आहे. 
  • सन 1987 साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यामधल्या थिअरीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या थिअरीमधे गुंतवणूकदारांच्या वर्तनाचा त्याच्या पूर्वग्रहांशी संबंध जोडला असल्यामुळे, सोयीसाठी आपण त्याला “वैयक्तिक पूर्वग्रहांचा सिद्धांत” असं म्हणू आणि थोडया विस्ताराने तो समजून घेऊयात. या सिद्धांतानुसार बाजारातील अस्थिरता गुंतवणूकदारांच्या बदलत्या मतांमुळे उद्भवते. वास्तविक घटनांपेक्षा त्यानी करून घेतलेल्या पूर्वग्रहांचा किंवा अपेक्षांचा त्यावर अधिक प्रभाव पडतो आणि तो प्रभाव भ्रमनिरास होईपर्यंत कायम टीकून राहतो.

वाचावे असे :तुमची आर्थिक प्रगती रोखणाऱ्या सवयी 

या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे-

  •  प्रतिक्षिप्तता – आपल्याला दिसणारं बाजारमूल्य हे केवळ मूलभूत गोष्टींवर अवलंबून नसून त्यावर अनेक गृहीत धरलेल्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे संदर्भ बदलतात. बाजार सातत्यानं वरखाली होत असतो. बदललेल्या किमती मूलभूत गोष्टींवर परिणाम करतात, त्यामुळे अपेक्षा बदलतात आणि त्याचा किंमतीवर परिणाम होतो. हे चक्र सातत्यानं चालू असतं.
  • एकतर्फी अंदाज – या गृहीत धरलेल्या गोष्टींमुळे अंदाज वर/खाली होत असतात. अपेक्षा अधिक वाढतात, ज्यामुळे तथ्यं आणि मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या धारणा आणि किमती समतोल मूल्यांपासून बदलतात.
  • भ्रम आणि भ्रमनिरास – गुंतवणूकदारांच्या या अपेक्षा जसजश्या पूर्ण होतात, तसे भाव वाढतात, त्यामुळे अधिक अपेक्षा निर्माण होऊन काही काळ भ्रमनिरास होइपर्यंत ते चढत्या दिशेनं राहतात आणि नंतर कोसळतात. बरोबर याविरुद्ध स्थिती, भाव खाली येत असताना होत असते.
  • सन 2008 मधे अमेरिकेतली आर्थिक मंदी आणि त्यानंतर जगभरात आलेली मंदी हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याआधी तिथल्या बँकांनी स्थावर मालमत्ता क्षेत्रामधलं, वाढत जाणारं मूल्य कायम वाढतच राहील अशी समजूत करून त्या क्षेत्रास मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं. त्यातून झटपट मिळणाऱ्या अवास्तव परताव्यामुळे,अनेक गुंतवणूकदार त्याच्याकडे आकर्षित झाले, त्यामुळे किमती अनियंत्रितरित्या वाढल्या, त्या नक्की का वाढल्या हे समजून न घेता प्रचंड प्रमाणात कर्जपुरवठा करण्यात आला. यामुळे किंमती अधिक वाढून परवडण्या पलीकडे घेल्यावर हा किंमतवाढीचा फुगा फुटला आणि झपाट्याने भाव खाली येऊ लागले. 
  • त्यामुळे ऋणकोंना कर्जफेड करणं अशक्य झालं. त्याचा परिणाम मोठमोठ्या बँकांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली. त्यातून अमेरिकन अर्थव्यवस्थेत आर्थिक आपत्ती आणि विनाशकारी मंदी निर्माण झाली. त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्यामुळे जगभरात सर्वच अर्थव्यवस्थांना कमी अधिक प्रमाणात मंदीने ग्रासले.

हा सिद्धांत भांडवल बाजारात कसं काम करतो?

  • प्राथमिक किंमत हालचाल – प्राथमिक किंमत हालचाल बाजारच्या दिशेने होत असते,पण अनेकदा एखाद्या बातमीच्या प्रभावानुसार, ती त्याच्या वास्तविक समतोलमूल्याच्या पलीकडे ढकलली जाते. त्याचा परिणाम एकूण मालमत्ता मूल्यावर होतो.
  • मालमत्तेची निर्मिती किंवा घट – कमाई, लाभांश, व्याजदर यांचा मालमत्तेवर प्रभाव पडतच असतो. अनुकूलता आणि आशावादी विचार यामुळे मागणी वाढल्याने मालमत्तेतील गुंतवणूकीत वाढ होते. त्यामुळे किंमत वाढते, त्यातून अधिक मालमत्ता निर्माण होते किंवा प्रतिकूल विचाराने भाव अधिकाधिक खाली जातात त्यामुळे मालमत्तेत अनपेक्षित घट होते.
  • घटना आणि वर्तन – यामुळे मालमत्तेच्या भावात पडलेला फरक प्रत्येक टप्यावर अधिकाधिक मजबूत होतो आणि अधिक वरच्या अथवा अधिक खालच्या पातळीवर पोहोचतो.

या सिद्धांताचे भांडवल बाजारावर होणारे परिणाम-

  • कार्यक्षम बाजार गृहितकांना तडा –  सर्व उपलब्ध माहिती, बाजार किमतीत प्रतिबिंबित करत असते, असं अर्थशास्त्राचं “कार्यक्षम बाजार- किंमत” संबंधित गृहीतक आहे. अनेक बातम्या त्यातून होणाऱ्या संभाव्य, बऱ्यावाईट शक्यता या बाजाराने आधीच स्वीकारल्या आहेत. असं मत अनेक तज्ञ, चर्चा करताना व्यक्त करतात. हा सिद्धांत त्यांच्या अश्या कल्पनेला छेद देतो.
  • तेजी मंदीचे चक्र – मालमत्ता बाजार हा कायम तेजीत अथवा मंदीत नसून तो चक्राकार आहे. प्रत्येक तेजीचा शेवट मंदीच्या सुरुवातीने आणि प्रत्येक मंदीचा शेवट तेजीने होत असतो. या प्रत्येक संक्रमण काळात भावावर पडणारा कमीअधिक प्रभाव हा मूलभूत विश्लेषणाच्या पलीकडे असतो.
  • गुंतवणूक धोरणांचा पुनर्विचार – गुंतवणूकदारांना धोरण म्हणून हा सिद्धांत गुंतवणूक करण्यापूर्वी, मूलभूत विश्लेषण, बाजार कल विचारात घेण्याबरोबरच या सिद्धांताचा विचार करण्यास प्रवृत्त करतो.

थोडक्यात-

भांडवली बाजारातल्या गुंतवणूकदारांना बाजारभाव, मूलभूत विश्लेषण आणि बाजारातली गुंतवणूकदारांची गृहीतकं यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध अधिक सूक्ष्मपणे समजण्यासाठी, हा सिद्धांत अत्यंत उपयोगी आहे. त्यादृष्टीने सुजाण गुंतवणूकदारांनी त्यांचा अभ्यास करून गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी काही गृहीत गोष्टींच्या शक्यतांचा त्या बरोबरीने अवश्य विचार करावा.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख भांडवल बाजारात गुंतवणूक करण्याची शिफारस करीत नाही.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutesमाझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutesतुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutesडिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…