Reading Time: 6 minutes

इक्विटीवाला डॉट कॉम ही वडोदरा येथे असलेली एक आर्थिक क्षेत्राशी निगडित कंपनी आहे. गुंतवणूकदार आणि गुंतवणूकीतील विविध मध्यस्थ उदाहरणार्थ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, सबब्रोकर, इन्शुरन्स एजंट यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य ही कंपनी करते. हितेश माळी हे त्याचे संचालक असून त्यांचा या क्षेत्रातील 30 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. गुंतवणूकदार, मध्यस्थ आणि वित्तिय संस्था यांची वाढ अबाधित ठेवून धोरणात्मक व्यवसाय दिशा दिग्दर्शनाचे काम त्यांच्यामार्फत केले जाते. त्यांच्या व्यवसाय भागीदारांसाठी वर्षभरात 12 व्यवसाय विकास कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाचे शीर्षक “दि नेक्स्ट बिग थिंग” हे आहे. मध्यस्थ आणि त्यांच्याशी  संबंधित गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतात. ही एक अर्थसाक्षरतेची मोहीम आहे. त्यात बाजाराचा कल, गुंतवणूकदारांची मानसिकता, गुंतवणूक धोरण यासंबंधात मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या अनेक ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मला मिळत असते. खुसखुशीत पद्धतीने माळीसर त्या दिवशी निवडलेला विषय अतिशय सोपा करून सांगतात. या कार्यक्रमांचे व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. 19 नोव्हेंबरला माळी सरांनी गुंतवणूकदारांचे विविध प्रकार उलगडून दाखवले. त्यांची मानसिकता त्याचे गुंतवणूकीवर होणारे परिणाम समजावून सांगितले. आपण यातील कोणत्या गुंतवणूकदार प्रकारात मोडतो ते समजून घेतले तर गुंतवणूक निर्णय योग्य प्रकारे घेण्यास त्याची मदत होऊ शकेल. आपली आर्थिक धेय्ये, गुंतवणूकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्राधान्यक्रम, जोखीम घेण्याची क्षमता जाणणारा आपला गुंतवणूक सल्लागार असेल तर आपल्याला योग्य होतील अशा गुंतवणूक योजना तो सुचवू शकेल.

         19 नोव्हेंबरला वर्ड कप फायनल मॅच होती आणि भारत वर्ड कप जिंकणारच अशी वातावरण निर्मिती झाली होती. माळीसर हाच धागा पकडून म्हणाले आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी काल चिंतन करीत होतो. या काळात त्यांनी अनेकांना फोन करून उद्या काय होईल? याची चाचपणी केली. भारत जिंकणार यावर सर्वांचं एकमत होतं. त्यांनी लोकांना पुढे प्रश्न विचारला भारत कुणामुळे जिंकेल? याची उत्तरं मात्र वेगवेगळी होती. कोणी म्हणालं कॅप्टनमुळे आपण जिंकू, कुणी  म्हणालं शुभम गिलमुळे, कोणी म्हणालं श्रेयस अय्यर काहीतरी करू शकेल, एकटा विराट बास आहे, कुलदीप यादवचे हे नेहमीचं मैदान आहे, जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे आपला विजय होईल अशी उत्तर आली.  त्यांनी विचारलेल्या 11 पैकी 11 लोकांना भारत जिंकेल असं वाटत होतं पण कुणामुळे जिंकेल याची 11 पैकी 11 वेगवेगळी उत्तरं होती. हे कशामुळे झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असलेल्या खेळाडूंमुळे, आपल्या गुंतवणुकीचे तसंच आहे. येती 10 ते 25 वर्षे आपला देश खुप प्रगती करणार आहे. आपली अर्थव्यवस्था बचत करणाऱ्या पासून खर्च करण्याकडे वाटचाल करीत आहे. पूर्वी आपण बचत करत होतो आता गुंतवणूक करत आहोत. लोक पूर्वी पैसे फक्त मुदत ठेवीत ठेवत असत, आता जोखीम क्षमतेनुसार शेअर्स, म्युच्युअल फंड, पीएमएस, युलीप यात गुंतवणूक केली जात आहे. सन 2023 हे शेअरबाजाराच्या दृष्टीने अतिशय चांगलं वर्ष म्हणता येईल. बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला असून स्मॉलकॅप शेअर्सनी 37% मिडकॅप शेअर्सनी 32% लार्जकॅप शेअर्सनी 7% तर मिडकॅप स्मॉलकॅप यांचा एकत्रित 31% परतावा दिला. ज्यांनी लार्जकॅपमध्ये पैसे गुंतवले ते निराश झाले असतील तर स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करणारे आनंदात असतील ज्यांची गुंतवणूक एनएसइ 500 किंवा बीएसइ 200 मध्ये होती त्यांनाही 14% च्या आसपास परतावा मिळाला. जेव्हा परताव्यात मोठा फरक असतो तेव्हा गुंतवणूकदार गोंधळून जातात, निराश होतात. मग ते काय करतात आपली गुंतवणूक पद्धतीच बदलून टाकतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत. आपल्याला अस वाटतं का जडेजा ज्या पद्धतीने खेळतो त्याच प्रकारे रोहित शर्मा खेळेल, शर्मासारखे यादव खेळेल. प्रत्येकाची स्वतःची खेळण्याची लकब आहे ती सोडून तो दुसरं काही करायला गेला तर लवकर आउट होईल त्याचप्रमाणे गुंतवणूकदार म्हणून आपण कुठे आणि नेमकं काय करणार? हाच आजचं हे सेशन घेण्यामागे महत्त्वाचा उद्देश आहे गेल्या दोन वर्षात निफ्टीने दर्शविलेली वाढ 9% आहे त्या तुलनेत निफ्टी पीएसयु, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसिजी, ऑटो सेक्टर यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढ दाखवली आहे अशा प्रसंगात आपण गुंतवणूक पद्धती बदलली तर खूपच फरक पडतो.

आपल्या संभाषणात हितेशजी असं म्हणाले की माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवातून मी सांगू शकतो की गुंतवणूकदारांचे 5 मुख्य प्रकार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. बाजार हा चक्राकार आहे, प्रत्येक क्षेत्राचे बरेवाईट दिवस असतात. गुंतवणूकीतील यश हे आपली मनोभूमिका आणि बाजारातील परिस्थिती यावर अवलंबून असतं त्यानुसार आपण प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराला जाणून घेऊया.

बचत करणारे गुंतवणूकदार (सेव्हर): अनेक गुंतवणूकदारांची मनोभूमिका पैसे वाचवण्याची असते याचा अर्थ असा नाही की त्याचं उत्पन्न मर्यादित असतं म्हणून ते असं वागतात. अनेकदा उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती सुध्दा त्यांच्या गुंतवणुकीतून फिक्स डिपॉझिट एवढा किंवा त्याहून थोडासा अधिक परतावा मिळाला तरी चालेल पण आपली गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे या विचाराचे असतात. माझा एक गुंतवणूकदार ग्राहक ज्याचा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक संच खूप मोठा आहे. आपल्याला माहीत आहे लोक परतावा थोडासा कमी झाला की कासावीस होतात याला त्याच्या गुंतवणूकीवर मिळालेला परतावा बरोबर आहे ना, याची शंका आल्याने खात्री करण्यासाठी त्याने मला फोन केला. त्याला याची भीती वाटते की जास्त परतावा मिळतोय तर कदाचित माझं जास्त नुकसान भविष्यात होऊ शकेल. त्यामुळे म्युच्युअल फंड योजना, पीएमएस यासारखी एकत्रित गुंतवणूक अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. कधीकधी अशा गुंतवणूकदारांनी त्यांचं गुंतवणूक घोरण बदलणं जरुरीचे असतं जर ते तरुण असतील, त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नसेल, कोणतेही कर्ज घेतलं नसेल आणि तरीही ते बचत करणारे गुंतवणूकदार असतील तर त्यांच्यासाठी ते योग्य नाही. या परीस्थितीत तुम्ही अधिक जोखीम घेऊ शकता तेव्हा याच प्रकारास चिटकून राहायची त्यांना गरज नाही.

कमी कालावधीत कमी पैशात संपत्ती निर्माण करण्याची इच्छा बाळगणारे गुंतवणूकदार (ट्रेडर): अनेकदा यांना जुगारी प्रवृत्तीचे लोक म्हटले जाते. जगभरात कॅसिनो आहेत अनेक लोक रात्रभर जागून तेथे पैसे लावत असतात. त्यांना आशा असते की एकदा तरी आपलं भाग्य उजळेल. मग जिंकतात कोण? ज्यांना अनुभव असतो, स्वतःची गणितं असतात ते. तेव्हा हे सगळं आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. जेव्हा आपल्यापुढे भांडवलवृद्धीचे वेगवेगळे पर्याय असतात तेव्हा आपल्याला कमी कालावधीत होणारी भांडवलवृद्धीची भुरळ पडते. याचा अर्थ ट्रेडिंग करू नये ते वाईट आहे असा न धरता आपण त्याच्या किती आहारी जाणार ते ठरवायला हवं. 

अंदाजेपंचे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार (प्रेडीक्टर): ही सर्व भारतीयांना जडलेली वाईट सवय आहे आपण प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधून आणि सर्वाना सांगून मोकळे होतो. ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. एक वेळ जुगारी लोक चांगले कारण आपण किती कोणता धोका स्वीकारतो आहोत याची त्यांना जाण असते. पण माझ्याकडे आतल्या गोटातील माहिती आहे, मला असं सारखं वाटतंय असे अंदाज बांधणारे कदाचित अल्पकाळात फायदा मिळवत असतील पण दिर्घकाळात ते संपत्ती निर्माण करू शकत नाहीत. 

उधळपट्टी करणारे गुंतवणूकदार (स्पेण्डर): असेही गुंतवणूकदार आहेत ते नफा मिळाला की ताबडतोब खर्च करतात. ते संपत्ती निर्माण करू शकत नाही त्यांना मिळालेले पैसे बाजूला ठेवण्याऐवजी खर्च करायला आवडतं. ते ज्या पद्धतीने फुशारक्या मारतात त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपल्याला मिळालेल्या पैशातून दिर्घकाळात संपत्ती निर्माण करता यायला हवी.  तुम्हाला वाटेल काही मौजमजा न करता फक्त गुंतवणूक करायची का तर तसं नसून मौजमजा आणि गुंतवणूक यांचा समतोल साधला गेला पाहिजे. जेव्हा संयमित पद्धतीने आपण गुंतवणूक करू तेव्हा यशाची खात्री असते. जेव्हा गुंतवणूक केल्यावर आपल्याला त्यात अति उल्हासित होऊ लागतो तर ती गुंतवणूक घोकादायक बनू लागते आणि आपलं स्वास्थ्य बिघडतं.

स्मार्ट गुंतवणूकदार (प्लॅनर): त्यांच्या गुंतवणूकीत नियोजनाला महत्व असतं त्याप्रमाणे निर्णय झाला की विविध मालमत्ता प्रकारात ते गुंतवणूक करतात आणि शांत बसतात. त्याचा दीर्घकालीन गुंतवणूकीवर विश्वास असतो. प्रचलित व्याजदर आणि महागाई यांच्या तुलनेत थोडा अधिक परतावा त्यांना मिळतो त्यावर ते आपल्या गुंतवणूकीकडे समाधानाने नजर टाकू शकतात. हे लोक आपल्या गुंतवणूकीबद्धल फारसे बोलत नाहीत, बाजार कुठे जाणार यावर चर्चा करीत नाहीत, कुणाकडे टीप्सही मागत नाहीत. आपले आयुष्य समाधानात जगत असतात. त्याची गुंतवणूक पिरॅमिडसारखी असते त्याच्याकडे संकटकाळात उपयोग होईल असा फंड असतो, आपत्कालीन योजना असते, मेडिक्लेम असते, टर्म इन्शुरन्स असतो, म्युच्युअल फंड, शेअर्स अशी त्यांची गुंतवणूक असते. निवृत्तीची योजना असते, आपली भविष्यातील नेमकी गरज काय ती पूर्ण करण्यासाठी त्यांची निश्चित योजना असते. त्याचप्रमाणे आपल्या नंतर संपत्तीचे वाटप कसे व्हावे याची निश्चित योजना असते. आपण नेमकं बरोबर त्यांच्या उलट करून प्रथम मालमत्ता निर्माण करण्याच्या नादात इएमआयच्या चक्रात अडकतो. तेव्हा प्रथम संपत्तीची निर्मिती करून त्यातून मालमत्ता निर्माण करता आली पाहिजे. गुंतवणूक करण्याच्या नादात आपल्या मनावर कोणताही तणाव येता कामा नये. सुख समाधानात जगाचा निरोप घेता यायला हवा. गुंतवणूकदारांचे जसे प्रकार आहेत तशा गुंतवणूकीच्या विविध पद्धती आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊन आपल्याला कोणती पद्धत सोयीची होईल याचाही गुंतवणूकदाराने विचार करायाला हवा. जी गुंतवणूक आपली झोप उडवेल आपल्याला सतत अस्वस्थ करेल ती गुंतवणूक आपल्यासाठी नाही.

       

आपण यातील कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहेत ते तपासून पहा. मॅनेजमेंटच्या पुस्तकात आणखी अनेक प्रकारचे गुंतवणूकदार सांगितले असले तरी मला हे पाचच महत्वाचे प्रकार वाटतात तेव्हा आता स्वतःला तपासून पाहून आवश्यकता असेल तर बदल करा नसेल तर त्या त्या प्रकारातील नियमांचे नीट पालन करा. यातील स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपल्याला निव्वळ परतावा आकर्षक वाटतो पण तो किती काळाने मिळाला याचे महत्व लक्षात घ्या आणि चक्रवाढवाढीचा वार्षिक दर किती त्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करा जर आपल्याला सातत्याने 12 ते 15% चक्रवाढवाढीने दीर्घकाळ परतावा मिळत असेल तर आपल्या संपत्तीत दिर्घकाळात प्रचंड भर पडेल. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पैसा साध्य नसून साधन आहे ज्या पद्धतीने आपण गुंतवणूक करतोय त्यांनी आपल्याला आनंद मिळतोय ना? अशी पद्धतशीर गुंतवणूक आपण करणार असाल आपल्याला भारताची हारजित महत्वाची न वाटता मॅचमधील आनंद महत्वाचा वाटेल. तेव्हा आपल्या आर्थिक सल्लागाराच्या संपर्कात रहा. तो आपल्या टीमच्या प्रशिक्षकासारखी मदत करेल. शेवटी हा खेळ असल्याने आज हारजितचा विचार न करता तुम्ही या आणि यापुढील प्रत्येक मॅचचा तन्मयतेने आनंद घ्याल, हेच या आपल्या आजच्या विषयाचे सार आहे. 

        

या मानसिकतेने गुंतवणूक कराल तेव्हा आपला गुंतवणुकीवरील विश्वास दृढ होईल त्याने देशाची प्रगती होईल ती नुसतीच प्रगती नसेल तर समाधान देणारी प्रगती असेल. पैसे वाढतील पण ते कोणत्या पद्धतीने वाढतात, गुंतवणूकदाराला समाधान देतात. तेव्हा आजच्या मॅचमध्ये कोणता खेळाडू काय करतो यापेक्षा रनरेटवर लक्ष ठेवा त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा तुकड्या तुकड्याने विचार न करता त्यातून मिळणाऱ्या चक्रवाढ वाढीकडे पहा आनंदात रहा.

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत. इक्विटीवाला डॉट कॉम या कंपनीशी लेखकाचे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत.) 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…