वेदांत डिलिस्टिंग
वेदांत या कंपनीस शेअर बाजारातून आपल्या शेअर्सची नोंदणी रद्द करायची आहे (डीलीस्टिंग). असे करताना 90% मालकी प्रमोटर्सकडे असावी लागते. ती मिळवण्यासाठी कंपनीने सर्वाना भागधारकांना उलट लिलाव करण्याच्या पद्धतीने आपल्या शेअर्सची विक्री किंमतीचा देकार मागवला असून सर्व धारकांचे समभाग ₹ 87.25/- ने या भावाने (floor price) खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
हे नक्की वाचा:Delisting – समभाग नोंदणी रद्द करणे म्हणजे काय?
गटातील उपकंपन्या विचारात घेऊन येणारी पुस्तकी किंमत किंचित जास्त असल्याचे विश्लेषकांचे मत असून बाजारातील किंमत ₹135 च्या आसपास आहे. त्यामुळे शेअर बाजारात शेअर विक्री करायची सोडून, कंपनीने मागणी केलेल्या भावाने कोणी भागधारक देण्याची शक्यता बिलकुल नाही.
कंपनीच्या शेअर्सचा बाजारभाव हा पुस्तकी किंमत (Book value) आणि कंपनीचा देकार, यापेक्षाही कितीतरी अधिक आहे. याहून कमी भावात शेअर कोणीही देणार नसल्याने या भावास तसा काही अर्थ नाही.
वेदांत डिलिस्टिंग:
- भागधारक बाजारभाव किंवा त्याहून अधिक किमतीने कंपनीस आपल्याकडील पूर्ण /अंशतः शेअर याचा देकार त्यांना मान्य अशा कोणत्याही किंमतीने देऊ शकतात.
- वेदांतकडे 65% मालकी असलेल्या हिंदुस्थान झिंक ली च्या शेअर्सचे प्रति शेअर मूल्य ₹145/- हून अधिक आहे. याच हिंदुस्थान झिंकने मे 2020 मध्ये 4500 कोटी रुपये डिव्हिडंड म्हणून वेदांतला दिले आहेत.
- अजून वेदांतने आपल्या भागधारकांना त्याचा वाटा दिलेला नाही. याशिवाय हा डिलिस्टिंग देकार देण्यापूर्वी कायदेशीर तरतुदींनाचा आधार घेऊन तेल आणि पेट्रोलियम व्यवसायातील होऊ शकणारा संभाव्य तोटा म्हणून दोनदा पुस्तकी मूल्य (Book value) दोन टप्यात ₹190/- वरून ₹89/-एवढे कमी केले आहे.
- अलीकडे कंपनीच्या मालमत्तेत कोणताही बदल झालेला नसून खनिज उत्पादनाचे भाव वाढले असून कच्या तेलाची मागणी व भाव वाढले आहेत. तेव्हा भागधारकानी कंपनीचे हे अंत्यस्थ मूल्य ओळखून कंपनीस या उलट लिलाव प्रक्रियेत आपले शेअर्स देताना त्यांना योग्य वाटणाऱ्या व बाजारभावाहून अधिक असणाऱ्या कोणत्याही किमतीस आपला देकार देण्यास हरकत नाही.
- आलेले सर्व देकार किमान किमतीपासून कमाल किमतीपर्यंत चढत्या क्रमाने लावले जातील ज्या भावाने लिलावकर्त्यास 90% मालकी मिळेल ती किंमत ही लिलावातून शोधलेली किंमत (Cut-off) असेल.
- ही बरोबर प्राथमिक भाव विक्रीच्या उलट पद्धत आहे. या शोधलेल्या किमतीत शेअर घ्यायचे की नाही ते कंपनी ठरवेल. याशिवाय एखाद्या विशिष्ठ भावाने शेअर खरेदी करण्याचा वेगळा प्रस्ताव ते भागधारकांना देऊ शकतील.
- हा भाव योग्य न वाटल्यास लिलाव प्रक्रिया नामंजूर करून भागधारकांना शेअर्स परत केले जातील. जर ही किंमत कंपनीस मान्य असेल तर त्या भावापर्यंत देकार दिलेल्याना (Exit price) पैसे दिले जातील. त्याहून अधिक भावाने किंमत मागणाऱ्या धारकांचे शेअर्स परत केले जातील त्यांना व शेअर न देणाऱ्या सर्वाना मान्य केलेल्या भावाने खरेदीचा नंतर वेगळा प्रस्ताव देता येईल.
- ही किंमत मंजूर असल्यास भागधारक आपले शेअर्स वर्षभरात कधीही कंपनीस देऊ शकतील.
- तेव्हा अशी ऑफर स्वीकारताना आपल्या अपेक्षेहून अधिक भावाची मागणी करावी यामुळे सर्वानाच अधिक भाव मिळू शकण्याची जास्त शक्यता असते.
हे नक्की वाचा: शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?
- याशिवाय लिलावात भाग न घेता किती किंमत ठरते याची वाट पाहून ती मंजूर असल्यास नंतर ही आपले शेअर्स देता येतील. किंवा मधल्या काळात बाजारभाव वाढल्यास आपले शेअर विकता येतील.
- जर ही किंमत कमी वाटत असेल तर शेअर्स देण्याची सक्ती नाही फक्त डिलिस्ट झाल्यावर बाजारात ते विकता येत नाहीत.
- कंपनीचे भागधारक म्हणून मिळणारे हक्क अबाधित राहतात. दोन व्यक्तीच्या संमतीने त्यांचे शेअर खरेदी विक्री व्यवहार होऊ शकतात.
- वेदांतच्या बाबतीत अनेक ब्रोकिंग कंपन्यांनी त्यांच्या खातेदारांना ₹ 236 ते ₹ 310 ने शेअर्स देण्याचा प्रस्ताव द्यावा असा सल्ला दिला आहे.
- कंपनीचा इतिहास पाहता भागधारकांना फायदा होईल प्रकारचे कंपनीचे व्यवस्थापन नसल्याने, सर्वांनी शोधलेली कट ऑफ किंमत हीच एक्सझिट किंमत असेल असे वाटत नाही त्या मुळे या व्यवहारात कंपनीस अपयश येण्याची शक्यता जास्त वाटते.
- त्यामुळे बाजारातून शेअर खरेदी करून फायदा मिळवता येईल या भ्रमात राहून या भावाने अधिक शेअर खरेदी करणे धोकादायक आहे.
- हा प्रस्ताव नामंजूर झाल्यास भाव ताबडतोब खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून यासंबंधीचा अंतिम निर्णय गुणवत्तेनुसार घ्यावा.
- अशा ऑफरमधून शेअर्स दिले तरी ते एक्सचेंजच्या माध्यमातून गेल्याने त्यावर रोखे व्यवहार कर (STT) कापून घेण्यात येतो त्यामुळे भागधारकांना आयकर नियमानुसार असलेल्या तरतुदीनुसार कर आकारणी अथवा करसवलत याचा लाभ घेता येतो.
- कंपनीने दिलेल्या प्रस्तावानुसार आपले देकार 5 ते 9 ऑक्टोबर 2020 रोजी शेअरबाजाराचे व्यवहार बंद होईपर्यंत (दुपारी 3:30पर्यंत) देता येतील. यापूर्वी आपला देकार दिला असल्यास 8 ऑक्टोबर 2020 पर्यंत त्यात वाढीव भाव मागणी करण्याचा बदल करता येईल किंवा देकार मागे घेता येईल.
- 13 ते 16 ऑक्टोबर 2020 मध्ये सुधारित प्रस्ताव कंपनीकडून भागधारकांना मिळून अपेक्षित शेअर्स आल्यास धारकांना पैसे किंवा प्रतिसाद न मिळाल्यास शेअर्स 23 ऑक्टोबर 2020 पर्यंत परत मिळतील.
- यात भाग घेताना शेअर्स डी मॅट मध्ये असल्यास ब्रोकरला शेअर्सची संख्या व मागणी किंमत सांगावी.
- ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनी तेथे निर्माण केलेल्या खास भागातून आपला प्रस्ताव सादर करावा. ज्यांच्याकडे कागदी प्रमाणपत्र असेल त्यांनी प्रमाणपत्र, सर्वांनी सही केलेला हस्तातरण अर्ज, आपली ओळख व निवास याची खात्री करणारी कागदपत्रे आणि बँक डिटेल्स नजीकच्या मान्यता प्राप्त दलालांच्या कार्यालयात द्यावीत.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies