टोलनाक्यावरची ट्रॅफिकची भलीमोठी लाईन हा अनेकांचा नित्य अनुभव असेल. अनेकदा सुट्टे पैसे आणि सुट्ट्या पैशांच्या ऐवजी दिली जाणारी चॉकलेट्स हा वादाचा आणि विनोदाचाही मुद्दा झाला होता. पण या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे. ती म्हणजे फास्टॅग! काय आहे फास्टॅग, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे काय, या साऱ्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊ.
फास्टॅग काय आहे?
- फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. यासाठी “आरएफआयडी” (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
- फास्टॅगचे स्टिकर दुचाकी सोडून कमर्शिअल व नॉन कमर्शिअल दोन्ही प्रकारच्या वाहनांवर चिकटवणे बंधनकारक असून, ते वाहनधारकाच्या बँक खाते वा पेमेंट गेटवे खात्याशी लिंक केले जाईल.
- फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल. यामुळे वाहनचालकाला टोल नाक्यावरून जाताना भल्यामोठ्या रांगेचा सामना करावा लागणार नाही.
- सध्या रोख पैसे व कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो. पण १५ डिसेंबर २०१९ नंतर मात्र फास्टट्रॅक अनिवार्य करण्यात आला आहे. पूर्वी ही मुदत १ डिसेंबर २०१९ पर्यंतच होती. परंतु आता ती वाढवून १५ डिसेंबर २०१९ करण्यात आली आहे. नॅशनल हायवेवरून प्रवास करताना ‘फास्टॅग’ असणं आवश्यक आहे.
फास्टॅगचे फायदे:-
- फास्टॅगमुळे टोलनाक्यांवर होणारे ट्रॅफिक कमी होईल. तसेच, टोलनाक्यावर थांबावे लागणार नसल्यामुळे प्रवासाचा व प्रवाशांचा वेळ वाचेल.
- ट्रॅफिकमुळे होणारे प्रदूषण काहीसं कमी होईल.
- फास्टॅगमुळे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. त्यामुळे गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणंही यामुळे सोपं होईल.
- वाहन चालकांना रोख रक्कम किंवा सुट्टे पैसे जवळ बाळगावे लागणार नाहीत.
- नागरिकांना खर्चाचा आढावा घेणं सोपं जाईल. कारण डिजीटल पद्धतीने भरलेल्या टोलचा तपशील ‘अकाऊंट स्टेटमेंट’मध्ये तपासणे सोपे जाईल. .
राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्यात येणार आहेत. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल, तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक रांग राखीव ठेवली जाणार आहे. या रांगेला ‘हायब्रिड लेन’ असं म्हटलं जाईल.
कुठे मिळेल फास्टॅग?
- फास्टॅग ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल.
- इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बँका यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी आत्तापर्यंत एकूण २८,५०० विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत.
- आरटीओ (RTO) कार्यालय, वाहतूक केंद्र, सर्व सेवा केंद्र तसेच काही निवडक पेट्रोल पंपांवर हे फास्टॅग उपलब्ध आहेत.
- ऑनलाईन फास्टॅग खरेदीसाठी पेटीएम, ॲमेझॉन यासारखे पेमेंट वॉलेट तर, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यांच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल.
- नजीकचे फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी ॲण्ड्रॉईड फोनवर “My FASTag App” डाऊनलोड करा.
- यासाठी फास्टॅगच्या अधिकृत वेबसाइटवरून म्हणजेच http://www.fastag.org/apply-online या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा.
- इतर कोणत्याही प्री-पेड कार्डप्रमाणेच हा फास्टॅगही रिचार्ज युपीआय वॉलेट, नेटबँकिंग, क्रेडिट वा डेबिट कार्डच्या मदतीने फास्टॅग रिचार्ज करता येईल. रिचार्ज करताना किमान रु. १०० ते १ लाखांपर्यंतचा रिचार्ज करता येईल.
- एकदा फास्टॅग काढला की तो ५ वर्षांसाठी वैध असेल.
- जर तुमच्याकडे एकपेक्षा जास्त गाड्या असतील, तर तुम्हाला सर्व वाहनांसाठी वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील.
- फास्टॅग नसलेल्या गाडीला संबंधित गाडीसाठी लागू असणाऱ्या टोलच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल असं सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
फास्टॅगसाठी आवश्यक कागदपत्रे?
फास्टॅगसाठी आवश्यक कागदपत्रे –
- गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC Book)
- ड्रायव्हिंग लायसन्स /पॅन कार्ड/आधार कार्ड/पासपोर्ट/ व्होटर आयडी यापैकी कोणतेही एक ओळखपत्र
- ऑफलाईन खरेदीसाठी गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझचा फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स.
टोलनाक्यापासून १० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्यांना टोलच्या रकमेमध्ये सूट मिळेल. सूट म्हणून मिळणारी रक्कम कॅश बॅकच्या स्वरूपात खात्यात जमा केली जाईल.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/