Reading Time: 3 minutes

शेअरबाजार ही एक अशी जागा आहे जेथे नोंदणी केलेल्या शेअर्ससह अन्य रोखे आणि कमोडिटी यांचे व्यवहार होऊ शकतात. शेअरबाजार भांडवल जमा करणाऱ्या कंपन्यांची नोंदणी करून व्यवसायासाठी प्रारंभिक भागविक्री करून भांडवल उभारण्यास तसेच वेळोवेळी अतिरिक्त भागभांडवल जमा करण्यास मदत करतो. अस्तीत्वात असलेल्या कंपन्यांना काही अटींची पूर्तता केल्यास गुंतवणूकदारांकडून अधिमूल्य घेता येते. भांडवल जमा करण्याचा हा सर्वात सुलभ आणि कमी खर्चाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना शेअर खरेदीविक्री करण्याची, भावातील फरकातून फायदा मिळवण्याची, तसेच नोंदलेले व्यवहार विशिष्ठ कालावधीत पूर्ण करण्याची (सध्या टी +1कामकाज दिवशी)  हमी देतो. 

          

राष्ट्रीय शेअरबाजार आणि मुंबई शेअर बाजार हे राष्ट्रीय स्तरावर व्यवहार सुविधा देणारे प्रमुख शेअरबाजार आहेत. राष्ट्रीय शेअरबाजार अस्तित्वात येण्यापूर्वी मुंबईसह इतर 23 प्रादेशिक बाजार कार्यरत होते. त्यात मुंबई शेअरबाजार म्हणेल ते पूर्व अशी परिस्थिती होती. प्रमाणपत्र कागदी स्वरूपात असल्याने त्याची हाताळणी करणे, साठवणूक करणे अतिशय जोखमीचे होते त्यास अधिक जागा लागत होती.तत्कालीन व्यवस्थापन उच्च शिक्षित नसल्याने त्यात व्यवसायिकतेचा अभाव होता. परकीय गुंतवणूकदार अभावानेच होते त्यांचा  येथील बाजारांवर विश्वास नव्हता. सरकारने मुंबई शेअर बाजाराचे कंपनीत रूपांतर करून त्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण वेगवेगळे असावे असे सुचवले त्यास दाद न दिल्याने परदेशातील शेअरबाजाराच्या धर्तीवर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कार्य करणाऱ्या राष्ट्रीय बाजार निर्मितीस प्रोत्साहन दिले. असा बाजार कार्यरत झाल्यावर तो अधिक पारदर्शक असल्याने मुंबई शेअरबाजार आणि प्रादेशिक बाजारांच्या उलाढालीत घट झाली आणि त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आता आपली दादागिरी चालणार नाही हे मुंबई शेअरबाजाराच्या व्यवस्थापनाने जाणले आणि वेळीच विचार करून आवश्यक ते बदल केले आणि 45 दिवस एवढ्या कमी कालावधीत मुंबई शेअरबाजार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कामकाज करू लागला. या दोन्ही शेअरबाजारांत व्यवहार करणारे मध्यस्थ भारतभर पसरल्याने प्रादेशिक शेअरबाजाराची गरज नाहीशी झाली. नव्याने शेअरबाजारात येऊ इच्छीणाऱ्या कंपन्यांना या दोन पैकी एका बाजारात तरी नोंदणी करण्याची कायदेशीर सक्ती सेबीने केली आहे. अलीकडे बहुतेक कंपन्या गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी दोन्ही बाजारात नोंदणी करतात.

राष्ट्रीय शेअरबाजार- 

*बाजारमूल्याचा विचार करता भारतातील सर्वात मोठा शेअरबाजार, अलीकडच्या ‘कमी कालावधीत जागतिक महत्वप्राप्त बाजार

*सन 1992 मध्ये स्थापना,

*व्यवहार सुरुवात सन 1995 पासून, *सुरुवातीपासूनच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार, *मुख्यालय मुंबई येथे

*50 विविध क्षेत्रातील शेअर्सचा निफ्टी फिफ्टी हा बाजाराची दिशा दर्शवणारा निर्देशांकद

मुंबई शेअरबाजार

*केवळ भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात जुना शेअरबाजार, महत्वाच्या जागतिक शेअरबाजारांचा घटकक्स

*सन 1956 च्या रोखे नियमन कायद्याने बाजार त्यातील व्यवहार यांना मान्यता

*सेन्सेक्स हा 30 विविध क्षेत्रातील शेअर्सचा समावेश असलेला बाजार निर्देशांक

दोन्ही बाजारातील साम्य-

●गुंतवणूकदारात दोन्ही बाजार लोकप्रिय

●दोन्हीकडे शेअर्स, म्युच्युअल फंड, इटीएफ, कमोडिटी, रिटर्स, इनविट,डिरिव्हेटिव म्हणजेच ऑप्शन आणि फ्युचर, करन्सीज संबंधित व्यवहार होतात. 

●व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण पारदर्शक

●सेबीच्या नियंत्रणाखाली

●मुख्यालय मुंबई येथे

●अन्य सर्व व्यवहारांच्या शिवाय शेअर कर्जाऊ देण्याघेण्याचे व्यवहार (SLBM) या बाजारात होतात त्यामुळे उलाढाल वाढण्यास आणि सौदापूर्ती सुरळीत होण्यास मदत होते.

●दोन्ही बाजार नवनवीन कल्पक गुंतवणूक प्रकार बाजारात आणत असल्याने गुंतवणूकदारांना विविध पर्याय उपलब्ध होत आहेत.

दोन्ही बाजारातील फरक- 

*बाजाराचे नाव, 

*स्थापना दिनांक, 

*बाजार निर्देशांक,

*बाजारमूल्य

*निर्देशांकातील शेअर्सची संख्या 

या सर्वांचा आधी उल्लेख झालाच आहे याशिवाय-

*बीएसइवर 5000 हून अधिक कंपन्यांची नोंदणी आहे. एनएसइ 2000 हून अधिक कंपन्यांची नोंदणी

*व्यवहारकर एनएसइ 0.000335% डिलिव्हरी आणि डे ट्रेंडिंग व्यवहारासाठी फ्युचर व्यवहाररांवर  0.00195% आणि ऑप्शन प्रीमियमवर 0.053% बीएसवर व्यवहारकर 0.000375% डिरिव्हेटिव व्यवहारांवर सरसकट 0.00275%

*जगातील शेअरबाजारांच्या क्रमवारीत एनएसई, बीएसई अग्रेसर आहेत. विविध अहवालात ही क्रमवारी वेगवेगळी असली ती क्रमावरीने सर्वात जगातील पहिल्या दहा बाजारात आहे.

*सर्वाधिक उलाढाल एनएसई त्या खालोखाल बीएसईवर

*देशभरात बीएसईची सेवा पुरवणाऱ्या मध्यस्थांच्या तिप्पट संख्या एनएसइची सेवा पुरवणाऱ्याची आहे 

त्यामुळेच-

राष्ट्रीय शेअरबाजार हा मुंबई शेअरबाजाराहून अधिक लोकप्रिय आहे. याशिवाय तंत्रज्ञान, विविध उत्पादने, पारदर्शकता, तरलता, कार्यक्षमता,  नियमकांकडून मिळणाऱ्या विविध मंजुऱ्या या सर्वच बाबतीत राष्ट्रीय शेअरबाजार एक पाऊल पुढे आहे.

मी व्यवहार कुठून करू? 

दोन्ही शेअरबाजारात डावे उजवे करणे अशक्य आहे मात्र एनएसईवर उलाढाल अधिक होत असल्याने शेअर्सचा मागणी आणि पुरवठा यांच्या तुलनेत नेमका आकर्षक भाव मिळवणे अधिक चांगल्या पद्धतीने शक्य आहे काही शेअर्सची नोंदणी फक्त मुंबई शेअरबाजारात असल्याने त्याचे व्यवहार राष्ट्रीय शेअरबाजारात करता येत नाहीत त्यासाठी मुंबई शेअरबाजारातच व्यवहार करावे लागतात त्यामुळे गुंतवणूकदार दोन्हीकडे व्यवहार आपल्या गरजेनुसार होतील यास प्राधान्य देतात.त्यामुळे –

या दोन्ही शेअरबाजारापैकी कोणता चांगला हा प्रश्न गैरलागू आहे. आपल्या इच्छेनुसार यातील कोणत्याही बाजारात आपण व्यवहार करू शकतो परंतु तंत्रज्ञान, विविध उत्पादने, पारदर्शकता, तरलता, कार्यक्षमता या सर्वच बाबतीत राष्ट्रीय शेअरबाजाराने आघाडी घेतल्याने डे ट्रेडर्स आणि डिरिव्हेटिवसारखे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची पहिली पसंती राष्ट्रीय शेअरबाजारास आहे. या दोन शेअरबाजारात असलेल्या शेअर्सच्या बाजारभावात असलेल्या छोट्याश्या फरकाचा लाभ मिळवणारेही अनेकजण आहेत.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…