Reading Time: 2 minutes

आपल्या पूर्वजांची रोटी, कपडा और मकान अशी जगण्याची पद्धत २७ वर्षांपूर्वी भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्विकारल्यानंतर हळूहळू बदलत गेली. होणाऱ्या आधुनिक बदलांचे स्वागत आपण आपल्या जीवनशैलीत केले.परंतु गुंतवणुकीच्या नवनवीन पर्यायांबद्दल आपण माहिती करून घेण्यात फारशी उत्सूकता दाखविली नाही.परिणामी बचत खात्यातील शिल्लक,मुदत ठेव,आवर्ती ठेव योजना,पोस्ट व विमा योजना,सोने तसेच जमीन-जुमला यापलीकडे गुंतवणूकदार म्हणून आपण लक्षच दिले नाही.

मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्यापूर्वी बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर १२% ते १५% दरम्यान होते तर घाऊक महागाई निर्देशांक ४% ते ६% दरम्यान होता.त्यावेळी सरकारी/निमसरकारीनोकरदारांना निवृत्ती वेतन योजना लागू असायच्या.त्यामुळे भविष्यातील आर्थिक नियोजनाची फारशी चिंता त्यांना भेडसावत नसे.परंतु औदयोगिक खाजगीकरण वाढू लागल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होणे,परदेशी भांडवलदार आल्यामुळे बँकांचे मुदत ठेवींचे व्याजदर कमी होणे अशा घटनांमुळे अर्थसाक्षरतेची गरज वाढू लागली.

२५ वर्षांपूर्वी १,०००/- रुपयात मिळणाऱ्या वस्तूचे मूल्य आज ५,०००/- रुपये झाले आहे.याचे कारण रुपयाचे होणारे अवमूल्यन. माझे १ली ते १०वीचे संपूर्ण शिक्षण १०,०००/- रुपयात झाले.आज बालवाडीसाठी १५,०००/- रुपये फी भरावी लागते.परंतु एवढी फी भरून देखील शाळा,कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन कसे करावे?याचे शिक्षण दिले जात नाही. ही गोष्ट लक्षात आल्याने यंदा १०वीच्या अभ्यासक्रमात SIP बद्दलच्या शिक्षणाचा समावेश केला आहे.

आजच्या स्पर्धायुगात पैशांचे महत्व सांगण्याची वेगळी गरज नाही. आपल्यापैकी बरेच जण पैसे/उत्पन्न मिळवण्यासाठी तणावपूर्ण जीवन जगत असतात. परंतु मिळालेल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन कसे करावे?याबाबत चांगल्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेत नाही. कारण आपण आपल्या आई-वडिलांकडून शिकलेल्या पारंपारिक “बचतीच्या सवयी” म्हणजेच “गुंतवणूक” हा समज बदलायला तयार नाही आहोत.त्यांच्या काळात आजसारखी महागाई नव्हती तसेच त्यांनी केलेल्या सोन्यातील अथवा जमिनीतील गुंतवणूकीने योग्य दराने परतावा दिल्याने त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या त्यांना सहज पार पाडता आल्या.सध्या आपण करीत असलेली बचत सोने व जमीन-जुमला सोडून काळानुसार वाढत जाणाऱ्या गुंतवणूक साधनात करणे क्रमप्राप्त आहे.

“पैशाने सर्वच गोष्टी विकत घेता येत नाही….” अशा आशयाची एक प्रचलित म्हण आहे.परंतु पैशाशिवाय इच्छित खर्च देखील करता येत नाही, हे वास्तव विसरता येत नाही.घरात लहान बाळ जन्मल्यापासून त्याचे शिक्षण,उच्च शिक्षण, नोकरी/व्यवसायातील स्थैर्य,लग्न,राहाण्यासाठी जागा यासोबत येणारे आकस्मिक आजारपण,तुमच्या निवृत्तीनंतरची तरतूद अशा सर्वच गोष्टींसाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे.

“मोकळा पैसा” जिभेवर ठेवलेल्या साखरेसारखा असतो,इच्छा नसतानाही कधी विरघळेल याचा नेम नाही.तसेच बचत रोख रकमेत ठेवून चालत नाही तर तिला सांभाळण्यासाठी इतर अनेक घटकांची जोड लागते.जसे कि उत्पन्नाची विभागणी, खर्चाची आखणी,कुटुंबाची मानसिकता आणि सहभाग,बचतीचे सोपे पर्याय,वित्तीय ध्येयांचे प्राधान्य,कर नियोजन,जोखीम व विमा नियोजन,गुंतवणूक नियोजन इत्यादिसाठी आर्थिक नियोजन कसे करावे?याबाबत या स्तंभातून चर्चा करू.

गुंतवणूक करतांना “माझे सर्व पैसे बुडाले तर….” या काल्पनिक भीतीचा आपल्या मनावर खूप मोठा पगडा असतो. कारण पूर्वी कधीतरी मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या सल्ल्यानुसार कुठल्यातरी असुरक्षित गुंतवणूक योजनेमध्ये आपले पैसे गुंतलेले असतात.सध्या आपल्या परिसरात अडीच लाख रुपये भरा व महिना ५०,०००/- रुपये कमवा अशा योजनेचे लोण आले आहे.अशा योजनांमधील आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता न बघता जास्तीचा परतावा मिळेल या हव्यासापोटी आपलीच फसगत करून घेत असतो.अशा कटू अनुभवांमुळे गुंतवणूकदार छोट्या गुंतवणुकीतून दिर्घ कालावधीत उत्तम परतावा देणाऱ्या पर्यायांकडे दुर्लक्ष करतात.

आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७१ वर्षे पूर्ण झाली,तर UTI ने पहिली म्युच्युअल फंड योजना सुरु करून ५४ वर्षे झाली.UTI च्या Mastershare Unit Scheme मधे १९८६ साली गुंतविलेल्या १०,०००/- रुपयांचे सध्याचे बाजार मूल्य ८,४८,६६५/- रुपये झाले आहे.म्हणजेच ३२ वर्षात अंदाजे ८५ पट भांडवल वृद्धी झाली आहे.

सामान्यपणे कमवती व्यक्ती भविष्यातील माहित असलेले नियोजित आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्यास तत्परता दाखवितात परंतु नियोजनबद्ध गुंतवणूक करण्यास तयार होत नाही.कर्जाच्या हप्त्याची तारीख मोबाईलच्या अलर्टवर ठेवणारे आपण गुंतवणुकीची तारीख का विसरतो?गुंतवणुकीच्या पारंपारिक पद्धती सोडून थोडी जोखीम घेऊन अधिक परतावा देणाऱ्या सुरक्षित गुंतवणूक साधनांची निवड का करत नाही?

चला तर मग श्रावण मासानिमित्त आपले आर्थिक नियोजन करून “अर्थसाक्षर” होण्याचा संकल्प करू या.

अतुल कोतकर

(चित्रसौजन्य- https://bit.ly/2CCGq9P )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.