Reading Time: 2 minutes
- विद्यार्थी शिक्षणासाठी राहतं घर, कुटुंब सोडून परराज्यात किंवा परदेशात जाऊन राहतात. चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर घरापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो.
- जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा नोकरदार आपल्या घरापासून दूर इतर ठिकाणी राहत असतो, तेव्हा तो शक्यतो भाड्याचं घर घेऊनच राहतो.
- जेव्हा आपण बाहेर घर भाड्याने घेतो तेव्हा एक गोष्ट हमखास सर्वानाच करावी लागते ती म्हणजे भाडे करार (Rent Agreement). आपण या लेखातून भाडेकरार हा काही विशिष्ट महिन्यांसाठीच का केला जातो याची माहिती घेऊया.
हे ही वाचा – घरभाडे भत्ता व गृहकर्ज- एकाचवेळी दोन्हींसाठी करसवलत घेता येईल का?
भाडे कराराची पद्धत –
- भाडे करार हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये सहमतीने स्वाक्षरी केलेला औपचारिक दस्तऐवज आहे.
- भाडेकरारात समाविष्ट गोष्टी –
- मालमत्तेचे स्थान,
- प्रस्तावित वापर,
- प्रस्तावित भाडे व डिपॉझिट ,
- आगाऊ रक्कम (Advance),
- घरमालकाने दिलेल्या वस्तू ,
- दोन्ही पक्षांशी संबंधित इतरही काही गोष्टींचा तपशील भाडे करारामध्ये समाविष्ट केलेला असतो.
- घर मालक आणि भाडेकरू यांच्यात अनेकदा विविध कारणांमुळे खटके उडतात. जेव्हा कधी असा संघर्ष निर्माण होतो, तेव्हा भाडे करार प्रत्यक्षात आपले काय ठरले होते हे दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न करतो.
भाडेकराराबतची सविस्तर माहिती
- भाडे कराराच्या बाबतीत १२ महिन्यांचा कालावधी धरून जर करार केला तर तो करार ‘घरमालक’ आणि ‘भाडेकरू’ दोघांच्याही खिशाला झळ पोहोचवतो. १२ महिन्यांचा भाडे करार केल्यावर नोंदणी प्रक्रिया, नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क आणि इतरही काही खर्च त्यामध्ये येतात. त्यामुळं भाडे करार हा सहसा ११ महिन्यांसाठी केला जातो.
- जर समजा एखाद्या घरमालकाने भाडेकरार ११ महिन्यांपेक्षा जास्त केला तर त्याला अतिरिक्त खर्च येतो. ११ महिन्यांपेक्षा जास्त दिवसांचा करार करायचा असल्यास नोंदणी कायदा १९०८ च्या कलम १७ नुसार भाडे कराराची नोंदणी स्थानिक प्राधिकरणाकडे करावी लागते. यामुळे भाडेकरूंना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हा जास्तीचा खर्च करावा लागतो.
- ११ महिन्यांसाठी केलेला भाडेकरार हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो. हा दस्तऐवज १०० टक्के विश्वासार्ह असतो. जर समजा एखादे भाडे कराराच्या बाबतीत न्यायालयात प्रकरण गेलं तर हा भाडेकरार एक महत्वाचा पुरावा असतो.
- भाडेकरार जबरदस्ती नसली तरी घरमालकासाठी खबरदारी नक्कीच आहे.
भाडेकरार हा ११ महिन्यांसाठी ‘या’ कारणांमुळे केला जातो
- भाडेकरू आणि घरमालक यांची सोय व्हावी आणि कर वाचावा म्हणून हा करार ११ महिन्यांसाठीच केला जातो. भाडेकरार हा १२ महिने किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी केला तर अनेक कायदे लागू होतात. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांचा खर्च वाढू शकतो.
- भाडेकरार हा एक वर्ष किंवा त्याहून जास्त केला तर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क आकारले जाते. भाडेकरूंना मुद्रांक आणि नोंदणी शुल्कामुळे अतिरिक्त खर्च होतो. एक वर्षापेक्षा जास्त काळ भाडेकरू फ्लॅट किंवा बंगल्यात राहिला तर नोंदणी न केलेला भाडेकरार न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारला जात नाही.
- भाडे कराराची नोंदणी केलेली नसल्यास मोठा दंड आकारला जातो. ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये भाडे करारासाठी २० ते १०० रुपयांपर्यंतचा स्टॅम्प पेपर सर्वसाधारणपणे वापरला जातो.
हे ही वाचा – घरभाडे भत्ता- House Rent Allowance (HRA)
Share this article on :