घरभाडे भत्ता- House Rent Allowance (HRA)

Reading Time: 2 minutes

आजच्या काळात नोकरीनिमित्त आपलं गाव,शहर इतकंच काय तर आपला देशही सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन रहावं लागतं. अशावेळी मुख्य प्रश्न असतो तो रहात्या जागेचा. दुसऱ्या शहरात रहायचं म्हणजे बहुतांश वेळा घर भाड्याने घेऊन रहाण्याचा पर्याय निवडला जातो. असं भाड्याच्या घरात रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना  कंपन्यांकडून घरभाडे भत्ता (HRA) दिला जातो. हा घरभाडे-भत्ता संपूर्ण अथवा अंशतः करमुक्त असू शकतो. जर कर्मचारी भाड्याच्या घरात रहात असेल, तरच घरभाडे-भत्ता करमुक्त असू शकतो. ह्यासगळ्याबद्दलची माहिती घेऊ, या.

घरभाडे भत्ता (HRA) म्हणजे काय?

घरभाडेसंबंधीत होणाऱ्या खर्चाची पगारात मिळणारी भरपाई म्हणजे घरभाडे भत्ता(HRA). हा भत्ता एम्प्लॉयरकडून म्हणजे आपण काम करतो त्या कंपनीकडून पगाराबरोबर कर्मचाऱ्यांना दिला जातो. तुम्ही भाड्याच्या घरात रहात असाल आणि तुम्हाला पगारात घरभाडे भत्ता मिळत असेल, तर हा भत्ता करमुक्त होण्यासाठी तुम्ही वजावट मागू शकता. परंतु, तुम्ही भाड्याच्या घरात रहात नसाल, तर मात्र मिळालेल्या घरभाडे भत्त्यावर कोणत्याही वजावटीचा दावा करता येत नाही. त्यासाठीचे काही नियम व अटी पाहूया.

घरभाडे वजावटीचे मोजमाप (Calculation)

घरभाडे भत्त्यावरील कर-सवलत घेताना पुढीलपैकी जी रक्कम कमीतकमी असेल, ती घरभाडे भत्त्याची वजावट म्हणून ग्राह्य धरली जाते- 

१. एका आर्थिक वर्षात प्राप्त झालेला एकूण घरभाडे-भत्ता (HRA)

२. एका आर्थिक वर्षातील एकूण पगाराच्या (बेसिक सॅलरी + महागाई भत्ता) पुढील टक्केवारीतील रक्कम-

-५०% मेट्रोसिटीत रहिवासी असल्यास

-४०% मेट्रोसिटीत रहिवासी नसल्यास

३. भरलेले एकूण घरभाडे वजा पगाराच्या (बेसिक सॅलरी + महागाई भत्ता) १०%

जर करदाता निवृत्तीवेतन (पेन्शन) घेत असेल तर वरील वजावटीसाठी पगारात बेसिक पगार तसेच महागाई भत्त्याचा (DA) समावेश होतो. जर पेन्शनविक्रीच्या निश्चित टक्केवारीवर (फिक्स्ड परसेन्टेज) कमिशन मिळत असेल, तर त्याचाही समावेश पगाराच्या व्याख्येत होतो.

घरभाडे-भत्ता आणि गृहकर्जावरील व्याज

जर करदात्याचे स्वतःचे घर असेल आणि ते घर भाड्याने दिलेले किंवा दुसऱ्या शहरात असेल, तर गृहकर्जाच्या व्याजाबरोबर ( होमलोन इन्टरेस्ट) एच.आर.ए. साठीही वजावट मागता येते.

HRA साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे व नियम- 

१. भाडेपावती (रेन्ट रिसीप्ट) किंवा भाडेकरार (रेन्ट अग्रीमेन्ट):
ही सर्वात महत्वाची कागदपत्रं आहेत. तुम्ही भाड्याने रहात असल्याचा आणि दर महिन्याला भाडे भरत असल्याचा पुरावा म्हणजे प्रत्येक महिन्याची भाडेपावती आणि भाडेकरार. त्यामुळे ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे सादर करताना संबंधित आर्थिक वर्षासाठीच्या भाडेपावत्या( १२ महिन्यांच्या) भाडेकरारासह सादर करणे आवश्यक आहे.

२. जर घरभाड्याची रक्कम वर्षाला रु. १,००,०००/- पेक्षा जास्त असेल तर घरमालकाचे पॅनकार्ड तपशील असणे आवश्यक आहे. जर घरमालकाचे पॅनकार्ड नसेल ,तर त्यासंदर्भातील त्याचा जाहिरनामा (डिक्लरेशन) आवश्यक आहे.

३. जर घरमालक अनिवासी भारतीय (NRI ) असेलतर भाडे भरण्यापूर्वी त्या रकमेच्या ३०% एवढी मुळातून करकपात (टी.डी.एस.) करणे आवश्यक आहे.

४. तुम्ही तुमच्या पालकांच्या घरी भाड्याने राहू शकता किंवा त्यांना घरभाडे देवू शकता. परंतू हा नियम पती पत्नीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. पालकांच्या घरी भाड्याने रहाताना घ्यायची सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहाराचे सर्व पुरावे, उदा. बॅंक स्टेटमेंट्स, भाडेपावती ( रेंट रिसीप्ट) इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणे बंधनकार आहे. अन्यथा तुम्ही करत असलेला वजावटीचा दावा नाकारला जाऊ शकतो.

कंपनीकडून घरभाडे-भत्ता मिळत नसल्यास-

जर तुमची कंपनी तुम्हाला घरभाडे-भत्ता देत नसेल आणि तुम्ही एकूण उत्पन्नाच्या १०% रकमेक्षा जास्त भाडे भरत असाल, तर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम ८०जीजी नुसार घरभाड्याची सूट(एच.आर.ए. क्लेम) मागू शकता. परंतु त्यासाठी खालील नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१. एकूण उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त भाडे दिली असले पाहिजे.

२. करदात्याच्या रहाण्याच्या किंवा कामाच्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या किंवा त्याच्या पत्नीच्या अथवा अज्ञान (वय वर्षे १८ अपूर्ण) मुलांच्या किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील (HUF) इतर व्यक्ती; यांपैकी कोणाच्याही नावावर रहिवासी मालमत्ता नसल्यास कलम ८०-जीजी अंतर्गत सूट मिळते.
परंतु जर वरीलपैकी कोणाचेही इतर ठिकाणी घर असेल, ज्याचा ताबा त्यांच्याकडे आहे आणि ते त्या घरासाठी कलम २३(२) (ए) किंवा २३ (४) (ए) अंतर्गत लाभ घेत असतील, तर या कलम ८०-जीजीचा लाभ घेता येणार नाही.

३. करदात्याला मिळणारी वजावट

  1. अ. दरमहा रु.५०००/-
  2. ब. एकूण उत्पन्नाच्या २५%
  3. क. या सेक्शनखाली वजावट घेण्यापूर्वी एकूण उत्पन्नाच्या १०% पेक्षा जास्त भरलेले भाडे.

वरीलपैकी कमीतकमी रकमेची वजावट मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!