- स्वतःच हक्काचं घर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र घर घेणं सध्या सोपं राहिलेले नाही. जमिनीचे वाढणारे भाव, लोकसंख्येमध्ये होणारे बदल या गोष्टींमुळे घर घेणं खर्चिक झालं आहे. असं असताना घर घ्यायचं म्हटलं की गृह कर्ज (Home Loan) हे घ्यावंच लागत किंबहुना गृह कर्ज ही घर घेण्यासाठी काळाची गरज बनली आहे.
- गृह कर्ज घेत असताना बँकेमध्ये कागदपत्रांना आणि इतर आर्थिक व्यवहारांना लक्षात घेऊन कर्ज देण्यात येते. यामध्ये सी-बिल(Credit Score), मागील कर्जाची स्थिती, बँकेचे व्यवहार या गोष्टी अतिशय बारकाईने बघितल्या जातात.
- काही प्रकरणांमध्ये चांगला क्रेडिट स्कोर असूनही बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. चांगला क्रेडिट स्कोर जरी असला तरी इतर व्यवहारांवरुन भविष्यात कर्ज मिळेल की नाही याबाबत बँक पडताळणी करत असते. आपण हीच कारणे लक्षात घेऊन त्यावर कसा मार्ग काढायचा याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी देखील या लेखात आपण बघणार आहोत.
1. सी-बिल रिपोर्ट(CIBIL)
- अनेकदा सी-बील रिपोर्टकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्ज मिळण्यास अडचण होते. याचं मुख्य कारण म्हणजे सी-बील रिपोर्ट वरून ग्राहकाला परवडणारं कर्ज मिळतं. ग्राहकाने भूतकाळात घेतलेले कर्ज नियमितपणे फेडले असेल तर त्याला कर्ज घेण्यास अडचण येत नाही.
- मात्र जर सी-बिल रिपोर्टमध्ये राइट ऑफ(written off), सेटल(settled), डीपीडी(DPD) म्हणजे मागील कर्ज भरताना कर्जदाराने किती दिवसांनी EMI किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट थकवले आहे. वरील तीन शब्द जर कर्जदाराच्या सीबिल रिपोर्टमध्ये आले तर निश्चित कर्ज घेण्यासाठी त्याला अडचणी वाढतात. वरील तीनही गोष्टी या कर्जाचे हप्ते भरणे, व्याजाचा कालावधी, कर्जाचा कालावधी यांच्याशी संबंधित आहे. बँक कर्ज देत असताना या तीनही गोष्टींचा विचार करून नंतर कर्ज देते. या कारणांमुळे सीबिल रिपोर्ट कसा उत्तम राहील हे कर्जदाराने लक्षात घ्यायला हवं.
2. अनेक कर्ज एकाचवेळी घेणे
- कधी-कधी घरासोबतच इतर गरजेच्या किंवा चैनीच्या वस्तू घेण्यासाठी देखील कर्ज घेतलं जातं. एकाच वेळी अनेक कर्ज देखील बँकांच्या नियमांनुसार घेता येत. फक्त अडचण यामध्ये अशी आहे की एकाच वेळी अनेक कर्ज घेतलेल्या कर्जदाराला काही प्रकरणांमध्ये थेट कर्ज देण्यास बँक नकार देते. जरी कर्जदार कर्जांचे हप्ते नियमित भरत असला तरी बँक कर्ज देण्यास नकार देऊ शकते.
- याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जर समजा कर्जदाराचं मासिक उत्पन्न ६०,००० रुपये आहे आणि त्याने दोन कर्जे घेतली आहेत. एक ईएमआय ३०,००० रुपये आणि दुसरा ईएमआय १८,००० रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये बँक मासिक उत्पन्न कमी शिल्लक राहत आहे हे पाहून कर्ज नाकारू शकते. यामुळे कधीही एका पेक्षा जास्त कर्ज घेत असताना उत्पन्नाचा स्रोत लक्षात घेऊनच कर्ज घ्यावं.
3. नियमित प्राप्तिकर विवरण पत्रक भरण्यास टाळाटाळ करणे
- नियमितपणे आयकर भरणे ही एक चांगली सवय आहे आणि निश्चित याचे फायदे देखील अनेक आहेत. जर समजा तुम्ही प्राप्तिकर विवरण पत्रक भरण्यास टाळाटाळ करत असाल तर बँकेकडून कर्ज नाकारण्याचे हे देखील एक कारण होऊ शकते.
- कर्ज परतफेड करण्यास तुम्ही सक्षम आहात की नाही हे बँक तुमचे उत्पन्न आयकर विवरण प्त्रकाब्रोबर तपासून बघते.
- बँक कर्ज देताना कर्ज घेण्याचा अर्ज देण्यापूर्वी अर्जदाराने दोन वर्षांचा आयकर( income tax returns) भरला की नाही हे पाहत असतात. जर भरला असेल तर कर्ज देण्याची पुढील प्रक्रिया सुरु होते, अन्यथा कर्ज देण्यास बँक नकार देऊ शकते.
4. कर्ज घेण्याचा अर्ज करताना त्यासोबत अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत दाखवणे
तुम्हाला उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत असतील तर नक्कीच कर्ज घेताना फायदा होतो. तुम्हाला येणाऱ्या भाड्याचे उत्पन्न, एखाद्या जोडधंद्याचे उत्पन्न किंवा इतरही उत्पन्नाचे स्रोत तुम्ही कर्ज फेडण्याची क्षमता वाढवतात. अतिरिक्त आर्थिक स्रोतांमुळे गृहकर्ज घेण्यास तुम्ही पात्र आहात असं ठळकपणे अधोरेखित होत असते. त्यामुळे कधीही एका पेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत असणे फायदेशीर आहे.
5. कर्ज भरण्यासाठी जास्त वेळ घ्या
कर्जाचे हप्ते ठरवताना कर्जदाराला विशिष्ट कालावधी निवडण्याचे पर्याय असतात. कर्ज भरताना जर उशिराचा म्हणजेच दूरची फेड घेतल्यास कर्जदाराला कमी मासिक हप्ता रक्कम मिळते. यामुळे कर्जदाराला वेळेसोबतच आर्थिक आधारही मिळतो. अशा वेळी कर्जदार नियमितपणे कर्ज भरून आपली क्षमता वाढवू शकतो.
6. गृहकर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता –
- कर्जदाराचे वय २४ ते ६४ दरम्यान असावे.
- कर्जदार हा पगारदार किंवा व्यावसायिक असला पाहिजे.
- पगारदार असल्यास किमान ३०,००० रुपये मासिक पगार आणि किमान दोन वर्षांचा नोकरीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- व्यवसायिक असल्यास तुम्हाला सदरील व्यवसाय क्षेत्रामधला तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वरील सर्व गोष्टींमध्ये पात्र ठरल्यानंतरच तुम्हाला गृहकर्ज मिळेल किंवा नाही हे ठरवले जाते त्यामुळे तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक पावले उचला.