‘स्वतःचं घर’ विकत घेणे (Buy your Dream Home) हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं. हे साध्य करताना घराच्या आर्थिक परिस्थितीनुसार, प्रत्येकाला कमी अधिक संघर्ष करावा लागतो. गृहकर्ज मिळवणे ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी सुखकर होत असल्याने घरांच्या विक्रीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. स्वतःचं घर होण्यासाठी आधी लोकांना वयाची पन्नाशी गाठावी लागायची. पण, आता तसं नाहीये. ३० वर्षांच्या आसपास वय असलेलं जोडपं हे घर विकत घेण्याला पहिला प्राधान्य देतात. स्वतःला राहण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून कमी वयात घर घेणाऱ्या व्यक्तींची संख्या सुद्धा आता खूप वाढली आहे. तुम्ही सुद्धा जर कमी वयात घर घेण्याचा योग्य विचार करत असाल तर या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील:
Buy your Dream Home : १० स्मार्ट टिप्स
१. आर्थिक शिस्त लावा :
घर विकत घेतांना घराच्या मूळ किमतीच्या जास्तीत जास्त ८५% इतक्या रकमेचं गृहकर्ज आपल्याला मिळत असतं. इतर १५% रक्कम ही आपल्याला रोख भरावी लागते. उदाहरणार्थ, ६० लाख किमतीचं घर घेण्यासाठी ९ लाख रुपये हे तुमच्याकडे उपलब्ध असायला हवेत. ही रक्कम तुमच्याकडे जमा होण्यासाठी खूप आर्थिक शिस्त असावी लागते. कमी खर्चात घर चालवणे, अनावश्यक खर्चाला कात्री लावणे, तुमच्यावर असलेले वैयक्तिक कर्ज संपवून टाकणे आणि शक्य असल्यास कायदेशीर मार्गाने उत्पन्नाचे स्रोत वाढवणे.
२. तुमच्या आर्थिक पात्रतेला प्रामाणिक रहा :
तुमच्या महिन्याचा बहुतांश खर्च हा कुठे जात आहे ? याकडे लक्ष देऊन बघा. घरभाडं, फिरायला जाणे, बाहेरून जेवण मागवणे या सर्व खर्चांपैकी आवश्यक खर्चांना धरून दर महिन्याचं एक ‘बजेट’ तयार करा. हे बजेट तयार करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मोफत उपलब्ध असलेल्या प्लिकेशनची मदत घेऊ शकतात. तुम्ही तयार केलेल्या बजेट सोबत प्रामाणिक रहाणं हे अत्यंत आवश्यक आहे. पैसे येतात कुठून आणि जातात कुठे ? ही तुलना केली तर आर्थिक शिस्त लावणं सहज शक्य आहे.
३. घराचा पूर्ण अभ्यास करूनच घर विकत घ्या :
‘स्वतःचं घर’ विकत घेतांना ते कुठे घ्यायचं आहे ? किती मोठं घ्यायचं आहे ? शहरात घ्यायचं आहे की शहरापासून थोड्या अंतरावर घ्यायचं आहे ? कोणत्या पर्यायाला गेल्यावर जास्त सोय आणि फायदा होईल याचा योग्य अभ्यास करूनच आपला निर्णय घ्या. तुम्ही किती रुपयांपर्यंतचा मासिक हफ्ता बँकेला भरू शकतात हे तपासूनच घर घ्या. बजेटपेक्षा अधिक किमतीचं घर घेतल्यास ईएमआय भरणं डोईजड जाणार हे नक्की.
४. वाचवा आणि गुंतवणूक करा :
पैसे वाचवणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्याची पुढे गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तुमच्या पैशांचा व्याजाच्या स्वरूपात योग्य परतावा मिळवण्यासाठी तुमचे पैसे ‘फिक्स्ड डिपॉजीट’ मध्ये ठेवून ४% व्याज आपण मिळवू शकतो. रिकरिंग डिपॉजीट म्हणजेच ‘आरडी’ मध्ये हे व्याज ६% इतकं मिळतं. म्युच्युअल फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक केल्यास हा परतावा १०% ते १५% इतका मिळू शकतो. कमी वयात म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही घर विकत घेतांना उपयोगी पडू शकते.
५. ईएमआयची तयारी करणे :
घर विकत घ्यायचं ठरल्यावर घराचा हफ्ता सुरू होण्यापूर्वी ईएमआय गणकाच्या (EMI Calculator) मदतीने तुमचा हफ्ता किती असेल ? याची माहिती काढा. काही महिने आधीपासूनच तितके पैसे दर महिन्यात बाजूला टाकण्याची सवय करा. घराचा हफ्ता भरण्यासाठी लागणारे पैसे बाजूला ठेवण्याची सवय लावल्यास ईएमआय भरणं तुम्हाला जड जाणार नाही.
हेही वाचा – Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना…
६. घरासोबत लागणारे इतर खर्च :
घराच्या मूळ किंमत, डाऊनपेमेंट याशिवाय घर घेतांना सरकारला द्यावी लसगणारी स्टॅम्प ड्युटी ही ५% ते ७% इतकी असते. घराचं नोंदणी शुल्क (Home Registration Fee) हे घराच्या मूळ किमतीच्या १% इतकं असतं. त्याशिवाय, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा सारखे खर्च सुद्धा तुम्हाला करावे लागतात. घराचा विमा उतरवणे, ब्रोकरचे पैसे देणे सारखे खर्च सुद्धा गृहीत धरूनच स्वतःच्या घराची शोधमोहीम सुरू करावी.
७. क्रेडिट स्कोअर वाढवा :
७५० पेक्षा अधिक जर तुमचा क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्ही गृहकर्ज मिळवण्यासाठी पात्र असतात. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त तितकं तुम्हाला कमी व्याजदरात गृहकर्ज मिळू शकतं. कमी व्याजदर आणि कमी काळासाठी घेतलेलं कर्ज यामुळे तुम्ही कर्जाच्या मुद्दल रकमेपेक्षा कमी रक्कम व्याजाच्या रूपाने बँकेला भरत असतात. क्रेडीट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्ही कमीत कमी वस्तू या तुम्ही उधारीवर घेतलेल्या पाहिजेत. तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर ३०% पेक्षा अधिक झालेला नसला पाहिजे. तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलाची पूर्ण रक्कम तुम्ही नियमितपणे भरलेली असली पाहिजे.
८. गृहकर्जाची तुलना करा :
जसं घर घेतांना आपण विविध पर्याय बघतो तसंच, गृहकर्ज घेतांना बँकांसोबत इतर उपलब्ध असलेल्या वेबसाईटवर तुलना करून मगच गृहकर्ज घ्यावं. मागील काही वर्षात सतत गृहकर्जाच्या व्यजदरात होणारी कपात लक्षात घेता गृहकर्ज हे ‘फ्लोटिंग’ व्याजदराने घेणं चांगलं असं अर्थतज्ज्ञ सांगत असतात. गृहकर्ज देतांना बँक तुमच्याकडून घेणारी रक्कम, मुदतपूर्व परतफेडीसाठी लागणारी अतिरिक्त रक्कम याची तुलना करून मगच गृहकर्ज घेण्यासाठी तुमची बँक नक्की करा.
९. घर घेण्याची योग्य वेळ ठरवा :
रिजर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणारा ‘रेपो’ रेट हा २०१९ पासून सतत कमी होत आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सेंट्रल बँकेने हा दर ३५ बेसिस पूर्णांकाने कमी केला होता, त्यानंतर गृहकर्जाचा व्याजदर हा सतत कमी होत आहे. आपलं क्षेत्र कोणतंही असो, अर्थक्षेत्रात घडणाऱ्या अशा घडामोडींवर लक्ष ठेवावं आणि त्यानुसार अनुरूप असलेल्या काळातच स्वतःचं घर विकत घेण्याचा निर्णय घ्या.
१०. कर वाचवण्यात होणारा फायदा :
‘स्वतःचं घर’ विकत घेतांना होणारा खर्चाची, गृहकर्जाची माहिती तर आपल्याला सहज उपलब्ध होते. पण, त्यासोबत हे सुद्धा लक्षात घ्यावं की, गृहकर्ज नियमितपणे फेडत असतांना आपल्याला आयकराच्या सेक्शन २४ च्या अंतर्गत गृहकर्जाचा व्याजाच्या रकमेत दरवर्षी २ लाख रुपये इतकी सूट मिळत असते. गृहकर्जाच्या मूळ रक्कम परतफेडीच्या १५ लाख रुपये इतकी रक्कम एका वर्षात तुम्हाला आयकरातून सूट देऊ शकते.
‘स्वतःचं घर’ घेणं हे काम जितकं लांबवलं जातं तितकं ते काम आर्थिकदृष्ट्या अवघड होत जातं. कारण, तुमचा खर्च हा दरवर्षी वाढत असतो. स्वतःला आर्थिक शिस्त लावल्यास आपण हे स्वप्न कमी वयात पूर्ण करू शकतो. हे साध्य करतांना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, पण घराच्या किल्ल्या हातात पडल्यावर होणारा आनंद हा त्यापेक्षा कित्येक पटीने मोठा असतो.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies