Term Vs. Personal Accident Insurance : मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा यांमधील फरक काय?

Reading Time: 2 minutes

Term Vs. Personal Accident Insurance 

सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी विमा असणे किती महत्वाचे आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची चिंता सर्वांनाच असते आणि म्हणूनच विमा खरेदी करण्यास सर्वजण प्राधान्य देत आहेत. विमा खरेदी करताना अनेक पर्याय पाहायला मिळतात त्यामुळे कोणता विमा योग्य आहे हे ठरवणे थोडे अवघड वाटू शकते. प्रत्येक जण जास्तीत जास्त फायदा देणारी विमा पॉलिसी घेण्याच्या मागे असतो. बहुतेक वेळेस जीवन विमा  खरेदी करताना विम्याचे फायदे, अर्थ बघता मुदत विमा किंवा वैयक्तिक अपघात विमा यांची निवड करताना गोंधळ निर्माण होतो.

म्हणूनच या लेखात आपण मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा यांमधील फरक जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Term and Health Insurance : टर्म आणि हेल्थ इंशुरन्स मधील फरक काय?…

टर्म इन्शुरन्स- 

 • टर्म इन्शुरन्स ही एक जीवन विमा योजना आहे जी विशिष्ट कालावधीसाठी जीवन विमा संरक्षण प्रदान करते. 
 • विमा कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकानंतर त्याच्या नॉमिनीला किंवा त्याच्या परिवाराला विम्याची रक्कम मिळते. 
 • टर्म इन्शुरन्स निवडण्याचा फायदा म्हणजे कमीत कमी प्रीमियम भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळते. यामुळे पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर देखील त्याच्या कुटुंबास आर्थिक हातभार लागू शकतो. म्हणून आजच्या काळात कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स असणे फायदेशीर ठरते.

वैयक्तिक अपघात विमा – 

 • अनपेक्षित घटना जसे की अपघात काही सांगून घडत नाहीत आपल्या आजूबाजूला दररोज अनेक अपघाताच्या घटना आपण पाहत असतो, त्यामुळे कितीही खबरदारी घेतली तरीही अपघातांसारख्या अनपेक्षित घटना काही टाळता येत नाहीत. 
 • या अपघातामुळे किरकोळ ते गंभीर दुखापत तसेच शारीरिक नुकसान होण्याची शक्यता असते. काही परिस्थितीमध्ये अशा अपघातांमुळे अपंगत्व देखील येऊ शकते. यामुळे दररोज वाढणारी महागाई बघता अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चाचा  मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो व तुमच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होऊ शकतो. 
 • अशा वेळेस वैयक्तिक अपघात विमा असणे उपयोगी ठरते. वैयक्तिक अपघात विमा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गंभीर दुखापत, शारीरिक नुकसान तसेच तात्पुरते अपंगत्व व कायमचे अपंगत्व अशा स्थितीमध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करते. 
 • काही वेळेस अपघातादरम्यान मृत्यू झाल्यास कंपनीकडून नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते.

मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा यातील फरक:

 • मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा या दोन्हीही पॉलिसी अंतर्गत मृत्यू लाभ कव्हर केले जातात. परंतु या दोन्ही पॉलिसीमधील मुख्य फरक म्हणजे वैयक्तिक अपघात विम्या अंतर्गत फक्त अपघाती मृत्यू कव्हर केले जातात तर मुदत विमा अंतर्गत सर्वसाधारण, नैसर्गिक व अपघाती मृत्यू कव्हर केले जातात.
 • तसेच मुदत विम्यात विमा प्रीमियम ठरवणारा मुख्य घटक म्हणजे पॉलिसी धारकाचे वय. त्याचप्रमाणे वैयक्तिक अपघात विमा प्रीमियम मध्ये ग्राहकांचा व्यवसाय हा निर्णायक घटक आहे.
 • वैयक्तिक अपघात विमामध्ये  ३ वेगवेगळ्या जोखमीच्या श्रेणी आहेत. जोखीम श्रेणी १ मध्ये बँकर, शिक्षक, व्यवस्थापक इत्यादी समाविष्ट आहेत त्याचप्रमाणे जोखीम श्रेणी २ मध्ये कंत्राटी बांधकाम क्षेत्रातील लोकं,  हलक्या मोटार वाहनांचे चालक,गॅरेज मेकॅनिक इत्यादी. तर जोखीम श्रेणी ३ मध्ये खाणीमध्ये काम करणारे कामगार, वायर्स बसवणारे इत्यादी अशा धोकादायक व्यवसायातील लोकांचा समावेश आहे.
 • याव्यतिरिक्त मुदत विम्याच्या प्रीमियम पेक्षा वैयक्तिक अपघात विम्या मधील प्रीमियम कमी असतो.
 • वैयक्तिक अपघात विमा आणि मुदत विमा यांच्यामधील फरक पाहिला असता आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरू शकते. परंतु याच बरोबर जर विमा पोर्टफोलिओ सुरक्षिततेकडे लक्ष देत असाल तर अधिक लाईफ कव्हर वाढविण्यासाठी वैयक्तिक अपघात विम्यामधील गुंतवणूक सुद्धा फायदेशीर ठरू शकते. कारण वैयक्तिक अपघात विम्यामध्ये वीमा कंपनी अपघातामुळे होणाऱ्या गंभीर दुखापती किंवा अपंगत्वांमध्ये सुरक्षा प्रदान करते.
 • किती विमा संरक्षण गरजेचे आहे हे तुमच्या आर्थिक गरजा, वय, उत्पन्न या घटकांवर निर्धारित असते.
 • यामुळे  परिवाराच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी  कोणत्या विम्यामध्ये गुंतवणूक करायची हा निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या.

हेही वाचा – Term Insurance : टर्म  इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी ‘ही’ घ्या काळजी…

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.