Personal Budget
आर्थिक नियोजन करताना आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपण अनेकदा आपले आर्थिक अंदाजपत्रक (Personal budget) तयार करतो, पण ते किती वेळा यशस्वी होतं? आपला खर्च आर्थिक अंदाजपत्रकानुसार होईलच याची कोणतीही शाश्वती नसते. अनेकदा आपण ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अनेक पट अधिक खर्च करतो, मग साहजिकच आपण तयार केलेले अंदाजपत्रक अयशस्वी होते. आजच्या लेखात आपण आर्थिक नियोजन अयशस्वी होण्याची कोणती कारणे आहेत, याबद्दल माहिती घेऊया.
हे नक्की वाचा: मासिक बजेट तयार करण्याच्या ११ स्टेप्स
Personal Budget: आर्थिक अंदाजपत्रक अयशस्वी होण्याची ६ कारणे
१. बचत आणि खर्चाचा ताळमेळ
- अंदाज पत्रक तयार करत असताना वास्तवाचं भान असणं गरजेचं आहे
- आपल्याला जर काही बचत करायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपण किती खर्च कमी करू शकतो याची जाणीव असणे गरजेचे आहे.
- उदा. जर तुम्हाला मासिक १.५ लाख रुपये पगार आहे तर, लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक महिन्याला ८० हजार रुपये बचत करू शकालच याची काही शाश्वती नाही. एखाद्या महीन्यात तुमचा खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतो, तर काही वेळेस तो कमी देखील होऊ शकतो.
- तूम्ही प्रत्यक्षात किती खर्च कमी करू शकता याचा व्यवस्थित विचार करून तो आकडा नियोजनात नमूद करा. अन्यथा तुमचे नियोजन तयार करतानाच कोलमडलेलं असेल.
२.खर्चाचा अभ्यास करा
- अंदाजपत्रक तयार करताना खर्चांच्या नेमक्या रकमेचा सामावेश करणे आवश्यक आहे
- तुमच्या प्रत्येक खर्चाची तंतोतंत रक्कम माहित असणे शक्य नाही, परंतु त्याचा साधारण अंदाज तुम्हाला नक्कीच असणार. त्यामुळे नियोजन करताना किमान या अंदाजे आकड्यांचा तरी नक्कीच समावेश करा.
- यासोबतच अगदी लहान- सहान खर्चाचा देखील समावेश करा, म्हणजेच अगदी दिवसभरात तुम्ही किती वेळेस चहा घेतात याचादेखील ढोबळमानाने विचार करा त्याचा समावेश करा.
- असे न केल्यास तुमचे आर्थिक नियोजन नक्कीच चुकू शकते त्यामुळे खर्च मोठा असो किंवा लहान त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
महत्वाचा लेख: आर्थिक नियोजनाचे हे ७ महत्वाचे प्रकार, तुम्हाला माहिती आहेत का?
३. आपत्कालीन निधी
- अंदाजपत्रक तयार करत असताना अनेक प्रकारच्या निधींचा विचार करावा लागतो पण त्यातील सर्वात महत्त्वाचं निधी म्हणजे आपत्कालीन निधी.
- जेव्हा आपल्या एखादा मोठा खर्च अचानक उद्भवतो अशा वेळी हा निधी आपल्याला अनेक मोठ्या अडचणींमध्ये मदत करू शकतो.
- जर तुम्ही हा निधी विचारात घेतला नाही, तर अचानक उद्भवलेल्या मोठ्या खर्चामुळे तुमची गुंतवणूक किंवा बचत अडचणीत येऊ शकते.
- या अचानक उद्भवलेल्या खर्चातून बाहेर येण्यासाठी कधीकधी तुम्हाला कर्ज देखील घ्यावे लागू शकते, जर आपत्कालीन निधीची तरतूद असेल तर कदाचित कर्जाची आवश्यकता भासणार नाही.
- या निधीत अत्यंत कमी प्रमाणात जरी रक्कम उपलब्ध असली तरी चालेल,परंतु तो निधी असणे आवश्यक आहे.
४. मनोरंजनावर खर्च न करणे
- अनेक व्यक्ती अंदाजपत्रक तयार करताना त्यामध्ये मनोरंजन, हॉटेलिंग किंवा इतर सवयींचा खर्च विचारात घेत नाहीत. परंतु, अशाप्रकारे जर तुम्ही तुमच्या मनोरंजन किंवा इतर गोष्टींवर खर्च केला नाही, तर तुमचेच मनस्वास्थ्य बिघडेल आणि अगदी महिनाभरातच तुम्ही तुमचे अंदाजपत्रक कचऱ्याच्या पेटीत टाकून द्याल.
- मनोरंजन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे त्यावरील खर्च कमी करून तुम्ही कुठलीही बचत करू शकणार नाहीत.
- आपल्या नियोजनात या गोष्टीवरील खर्चाचा समावेश केल्यामुळे तुमचा कुठलाही अधिकचा खर्च होणार नाही
- याउलट या सर्व खर्चाचा समावेश असणारे अंदाजपत्रक यशस्वी ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात खर्च करायची चांगली सवय लागेल.
५. स्वतःला बक्षीस न देणे
- जेव्हा आपल्याला यश मिळते तेव्हा त्याचे कौतुक झाल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. ही बाब अंदाजपत्रकाच्या बाबतीत सुद्धा नक्कीच लागू होते.
- आपले अंदाजपत्रक यशस्वी झाल्यास स्वतःसाठी काहीतरी बक्षीस ठरवा. जसं महिनाभर डाएट करणाऱ्या व्यक्तीला ‘चिट डे’ च्या दिवशी त्याच्या आवडीचा पदार्थ खायची मुभा असते, तसेच महिनाभर काटेकोरपणे आर्थिक नियोजन करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी बक्षीस मिळाल्यास पुढच्या महिन्यासाठी आपले अंदाजपत्रक तयार करायला अथवा यशस्वी करायला उत्साह मिळेल.
- अशा प्रकारची तरतूद केल्यामुळे तुम्ही आर्थिक नियोजन काटेकोरपणे नक्कीच पाळालच याशिवाय तुमचाआत्मविश्वासही वाढेल. अन्यथा काही काळानंतर तुम्ही बजेटकडे बघणार देखील नाही.
विशेष लेख: पगारच पुरत नाही…बचत कशी करू?
६. आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना बजेटची कल्पना न देणे
- जर तुम्ही कुठलं अंदाजपत्रक तयार करत आहात आणि त्याला अगदी काटेकोरपणे पाळण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर ही वाटचाल अशीच चालू ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला याबद्दल कल्पना देणे.
- जर तुम्ही त्यांना तुमच्या अंदाजपत्रकाची कल्पना दिली तर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती देखील तुम्हाला या वाटचालीमध्ये नक्कीच मदत करू शकतील, ते तुम्हाला नियोजन काटेकोरपणे पाळण्यासाठी मदत करतीलच त्यासोबतच प्रोत्साहन देखील देतील आणि तुम्ही तुमचे ध्येय योग्य पद्धतीने गाठू शकाल.
अंदाजपत्रक तयार करणे आणि त्याचा विचार करूनच खर्च करणे ही एक कला आहे. अशाप्रकारे खर्च करत असताना तुमच्यासमोर अनेक प्रकारच्या अडचणी येतील परंतु आपले आर्थिक ध्येय गाठण्यासाठी मर्यादेत खर्च करण्याची आपल्याला गरज आहे. जर वर दिलेल्या टिप्सचा विचार तुम्ही बजेट तयार करत असताना केलात तर तुमचे अंदाजपत्रक कधीही अयशस्वी ठरणार नाही.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Personal Budget in Marathi, Personal Budget Marathi Mahiti, Personal Budget Marathi, Personal Budget Mhanje kay, What is Personal Budget Marathi