Zomato IPO
Reading Time: 5 minutes

Zomato IPO

झोमॅटो आयपीओ (Zomato IPO) बाबतची उत्सुकता सध्या शीगेला पोहोचली आहे. आर्थिक जगात सर्वत्र फक्त झोमॅटोचीच चर्चा आहे.  स्टार्टअप कंपन्या भविष्यात मोठ्या व्यवसाय संधी असलेल्या कल्पना व स्वतःची क्षमता दाखवून प्रायव्हेट इक्विटीद्वारे व्यवसायासाठी भांडवल उभे करतात. 1 बिलियन डॉलर म्हणजे सध्याचा डॉलरचा भाव बघता 7500 कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना “युनिकॉर्न” बिरुद लावले जाते. भारतीय स्टार्टअप युनिकॉर्नपैकी आतापर्यंतचा सर्वात मोठी म्हणजे तब्बल 9000 कोटी रुपये प्राथमिक समभाग विक्री करणारी झोमॅटो पहिली युनिकॉर्न कंपनी आहे. 

हे नक्की वाचा: आयपीओ म्हणजे काय?

कंपनीच्या आयपीओसाठी सेबी परवानगी देते. यासाठी काही वर्षे सलग नफा कमावणे कंपन्यांना आवश्यक होते. सेबीने तोट्यात असणाऱ्या कंपन्यांनासुद्धा आयपीओ आणायची परवानगी दिली आहे. पण यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना उपलब्ध असलेल्या शेअर्सचे प्राथमिक समभाग विक्रीतले प्रमाण कमी करण्यात आले आहे. झोमॅटोच्या आयपीओ मध्ये किरकोळ गुंतवणूकदार 10% शेअर्सलाच अर्ज करू शकतात. 

झोमॅटोची सुरवात: 

  • दीपेंदर गोयल आणि पंकज चड्ढा असे दोघे आयआयटीयन बेन एंड कंपनी या मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीत काम करत होते. 
  • जेवणाच्या सुट्टीत खाण्यासाठी लोकांची रांग लागलेली असायची. लोकांना जेवणाचे पर्याय उपलब्ध व्हावे म्हणून  foodieBay या नावाचे आजूबाजूच्या हॉटेल्सचे मेनू उपलब्ध असलेले इन्ट्रानेट म्हणजे फक्त त्या कंपनीच्या लोकांनाच बघता येईल असे पोर्टल त्यांनी सुरु केले.
  • लोकांचा जबरदस्त प्रतिसाद आल्यावर पोर्टल पब्लिक करण्यात आले. नवीन पोर्टलवर ग्राहक त्यांचे रिव्ह्यूव म्हणजे अभिप्राय सुद्धा टाकू शकत होते. 
  • रेस्टॉरंट, त्यांचे मेनू आणि ग्राहकांच्या अभिप्रायानंतर कंपनीने ग्राहकांना हॉटेलमध्ये ऑर्डर केल्यावर खाद्यपदार्थ पोहोच करायची म्हणजे फूड डिलिव्हरी सेवा देणे सुरू केले. 

FoodieBay ला मिळाले फंडिंग: 

  • Naukri.com, jeevansathi.com, 99acres.com या वेबसाईटची मालकी इन्फोएज कंपनीकडे आहे. इन्फोएज लिस्टेड कंपनी असून यशस्वी इंटरनेट कंपनी म्हणून ओळखली जाते. 
  • इन्फोएजचे संस्थापक संजीव भिकचंदानी हॉटेल मधले मेनू बघण्यासाठी foodieBay वेबसाईट वापरायचे. 
  • त्यांनी दीपेंदर गोयल यांना ईमेल केला की आम्ही तुमची वेबसाइट नेहेमी वापरतो, तुम्हाला काही फ़ंडींग हवी असेल तर आम्हाला संपर्क करा. 
  • दीपेंदर यांनी पुढच्या २४ तासात ईमेलला उत्तर दिले, ४८ तासांत दोघांची भेट झाली आणि ७२ तासांत १ मिलियन डॉलर म्हणजे २२ जुलै २०१० रोजीचे ४.७ कोटी रुपये झोमॅटोला पहिले फ़ंडींग मिळाले.   

झोमॅटो नावामागची आयडिया

  • झोमॅटो नावामागची आयडिया पण अशीच भारी आहे. लोकांना उच्चरायला सोपे आणि खाण्याबद्दल काहीतरी सांगणारे असे नाव शोधत असतांना टोमॅटो सारखा झोमॅटो नाव शोधले गेले. 
  • झोमॅटो आणि स्विगी या दोनच मोठया फूड डिलिव्हरी एग्रीगेटर कंपन्या भारतात जवळपास सर्व बाजारहिस्सा राखून आहेत. झोमॅटो भारतातील 525 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि 23 देशांत सेवा देते. झोमॅटो ॲप आणि वेबसाईट मिळून 4.1 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. 

झोमॅटो पैसे कसे कमावते? 

फूड डिलिव्हरी म्हणजे खाद्यपदार्थ तुम्ही मागवाल तिथे पोहोच करायची सेवा देणे हा झोमॅटोचा प्रमुख व्यवसाय आहे. 

  1. सुरुवातीला झोमॅटो रेस्टॉरंटच्या मेनूची यादी पोर्टलवर जाहीर करायची. याद्वारे लोकांना एकाच ठिकाणी आपल्या आवडीचे पदार्थ, त्यांच्या किंमती यांची तुलना करायची संधी उपलब्ध झाली. लोकांना पोहोच खाद्यपदार्थ देण्याचे काम झोमॅटो ने सुरू केले. इथे तुम्ही झोमॅटोच्या ॲपवर ऑर्डर देता. ही ऑर्डर देताना भरलेले पैसे संपूर्णपणे रेस्टॉरंटकडे जात नाहीत. झोमॅटो ऑर्डर आणून दिल्याबद्दल आपले कमिशन काढून घेते. तसेच प्रत्यक्ष हॉटेल पेक्षा जास्त किंमतीला पदार्थ विकूनही झोमॅटो पैसे मिळवते. 
  2. आपल्या रेस्टॉरंटचे नाव इतर रेस्टॉरंटच्या आधी झोमॅटो वेबसाईट आणि ॲपवर दिसण्यासाठी जाहिरात फी आकारली जाते. हा झाला पैसे मिळवण्याचा दुसरा प्रकार. 
  3. डायनिंग आउट सेवा म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी टेबल बुकिंग करणे, जास्त डिस्काउंट व सुविधा देणाऱ्या झोमॅटो प्रो सेवेची फी, हायपर प्यूअर नावाने रेस्टॉरंटला भाजीपाला, धान्ये असा नेहेमी लागणारा कच्चा माल पुरवायची सेवा, लाईव्ह इव्हेंट्स असे इतर काही झोमॅटोचे उत्पन्नाचे मार्ग आहेत. 

नियोजन सेवा: 

  • रोजच्या रोज हजारो ऑर्डर्स देशभरात ग्राहकांपर्यंत झोमॅटो पोहोचवते. या सगळ्या कारभरातून प्रचंड डिजिटल माहिती तयार होते.
  • ग्राहकांची आवडनिवड, ऑर्डर करायची वेळ, कोणत्या परिसरातले ग्राहक किती पैसे कुठल्या पदार्थांवर खर्च करू शकतात, कुठल्या ऑर्डर्स पुन्हा पुन्हा मागवल्या जातात, वयोगटानुसार मागवले जाणारे पदार्थ याप्रकारची माहिती झोमॅटो गोळा करते. 
  • मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून रेस्टॉरंट किंवा हॉटेल्सला सल्ला सेवा देण्याचे कामही झोमॅटो करते. 

Zomato IPO: झोमॅटोचा आयपीओ- 

  • झोमॅटो 9000 कोटी रुपये आयपीओद्वारे उभे करणार आहे. कंपनी आयपीओतून जमा झालेले पैसे एकतर स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून वापरते किंवा आधीच्या  गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर विकून कंपनीच्या गुंतवणूकीतून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे एक्झिट देते. 
  • सुरुवातीपासून गुंतवणूकदार असणारी इन्फोएज त्यांचा काही हिस्सा आयपीओत विकून पूर्वी 18.68% असलेली हिस्सेदारी आयपीओनंतर 15.23% करणार आहे. 
  • झोमॅटो आयपीओचे बऱ्यापैकी पैसे स्वतःकडे ठेवणार आहे. सध्या त्यांच्याकडे 8000 कोटी रुपये आहेत आणि अजून हे आयपीओचे 9000 कोटी म्हणजे एकूण जवळपास 17,000 कोटी रुपये झोमॅटोकडे भविष्याच्या वाढीसाठी उपलब्ध असणार आहे. 

झोमॅटोची विक्री, खर्च आणि तोटा पुढीलप्रमाणे आहेत: 

यानुसार झोमॅटो सतत तोट्यात असली तरी तोट्याचे प्रमाण कमी होते आहे.

कंपनीचे मूल्यांकन आणि पीई रेशो:

  • कंपनीचे मूल्यांकन करतांना पीई रेशो चा विचार केला जातो. प्रती शेअर उत्पन्नाच्या पटीत कंपनीच्या शेअर्सचे मूल्यांकन केले जाते. 
  • झोमॅटो सतत तोट्यात असल्याने पीई रेशो ऐवजी एकूण विक्रीच्या पटींत शेअरचे मूल्यांकन करण्यात आले आहे. 
  • कंपनीची विक्री 2000 कोटी रुपये आहे. आयपीओ नंतरचे बाजारमूल्य साधारणपणे 60,000 कोटी रुपये असणार आहे. झोमॅटोची प्रती शेअर किंमत विक्रीच्या 30 पट आहे. 
  • भारतीय शेअर बाजारात झोमॅटो सारखी दुसरी कुठलीही कंपनी तुलना करण्यासाठी नोंदीत नाही. 
  • जागतिक समव्यवसायिक कंपन्यांचे शेअर्स एकूण विक्रीच्या ८ ते १० पट किंमतीला तेथील शेअर बाजारांत नोंदीत झाले आहेत. तुलनेने  झोमॅटोचे शेअर्स महाग आहेत. 

झोमॅटो शेअर्सची किंमत जास्त असल्यामागची कारणे:

 झोमॅटो शेअर्सची किंमत जास्त असल्यामागची कारणे पुढीलप्रमाणे देते –

  1. भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या काही वर्षांत १०० कोटी आकडा पार करणार आहे. तरुणांची  वाढती संख्या, वाढणारे उत्पन्न आणि इंटरनेटची उपलब्धता असल्याने झोमॅटोचा ग्राहक वर्ग वाढत जाईल असा कंपनीचा अंदाज आहे.  
  2. झोमॅटोने स्पर्धा कमी करण्यासाठी उबर ईट्स विकत घेतली. रनर ही लॉजीस्टिक कंपनी आणि ग्रोफर्स या किराणा सामान पोहोच करणाऱ्या कंपन्यांमध्येही झोमॅटोने हिस्सा विकत घेतला आहे. पुढील काळात या नवीन शाखांमधूनही नवीन व्यवसाय मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे. 

झोमॅटोसाठी संभाव्य धोके:

  1. रेस्टोरंन्टसने स्वतःचेच ऍप तयार करून झोमॅटो ऐवजी स्वतःच डिलेव्हरी देऊन व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. आपण जी गोष्ट स्वतः करू शकतो त्यासाठी झोमॅटोला कशाला कमिशन द्यायचे हा विचार बरीच रेस्टोरंन्टस करत आहेत. 
  2. डॉमिनोज पिझा सारखे ब्रॅण्ड्स स्वतःच्याच ऍपद्वारे त्यांची ५०% पेक्षा जास्त विक्री करतात. असेच इतरही मोठ्या ब्रॅंड्सने झोमॅटोला बायपास करून स्वतःच ग्राहकांपर्यंत पोहोचायचं ठरवल्यास झोमॅटोचा धंदा मार खाईल. 
  3.  ऍमेझॉन, रिलायंस जिओ यांसारखे महाकाय संपत्ती असलेले उद्योगसमूह फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरत आहेत. भयंकर स्पर्धात्मक व्यवसायात झोमॅटो कशा प्रकारे टिकून राहील याचा अंदाज बांधणे अवघड आहे. 
  4. नॅशनल रेस्टोरंन्टस असोसिएशन इंडियाने मक्तेदारी नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे झोमॅटो विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Zomato IPO: आयपीओची प्राथमिक माहिती:  

आयपीओ किंमत पट्टा – रु. 72 ते रु. 76

लॉटसाईज : 195 शेअर्स 

किमान अर्ज रक्कम : रु.15,000

आयपीओ  कालावधी : 14 जुलै ते 16 जुलै 2021

आयपीओ लिस्टिंग दिनांक : 27 जुलै 2021

तुम्ही काय कराल ?

  • झोमॅटोकडे मोठी उद्योग संधी आहे परंतु शेअर्सच्या किंमती कंपनीच्या नफ्याच्या गुलाम असतात असे जाणकार सांगतात. सध्या तोट्यात असणारी झोमॅटो भविष्यात किती नफा मिळवेल हे सांगता येत नाही.
  • तुम्हाला लिस्टिंग गेन म्हणजे शेअर बाजारात नोंदणी झाल्यावर शेअर्स विकून पहिल्या दिवसाचा भाववाढीचा फायदा घ्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे पण दीर्घकालीन परताव्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागू शकते.  

सीए. अभिजित कोळपकर 

(लेखात माहिती दिलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. सदर कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Zomato IPO in Marathi, Zomato IPO Marathi Mahiti, Zomato IPO Marathi, Zomato IPO 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…