Smoking affects health insurance premium
धुम्रपान करणे हा आपल्या समाजाला लागलेला एक आजार आहे. धुम्रपान करण्याची लोकांची सवय कमी व्हावी यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी आणणे, प्रत्येक अर्थसंकल्पात सिगरेटची किंमत, कर वाढवणे, सिगारेटच्या पाकिटावर कर्करोग होण्याच्या शक्यतेबद्दल लिहिणे इतके सर्व प्रयत्न करूनही काही लोकांची धुम्रपान करण्याची सवय ही कमी होतच नाही हे आपण बघतच आहोत. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचं शारीरिक नुकसान तर होतंच असतं. शिवाय, प्रत्येकवेळी धूम्रपान करणारी व्यक्ती ही सिगरेटची दरवर्षी वाढत जाणारी किंमत देखील मोजावी लागते. धूम्रपानाच्या सवयीमुळे त्या व्यक्तीची जीवन विम्याची रक्कम सुद्धा कित्येक पटीने वाढत असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर, हृदयविकार, हाडं ठिसूळ होणे यापैकी रोगांची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींच्या विमा रकमेत कसा फरक पडत असतो ? जाणून घेऊयात.
१. विमा हप्त्यासाठी अधिक रक्कम द्यावी लागणे:
धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याचा अधिक धोका असल्याने त्यांना नेहमीच ‘हाय रिस्क प्रोफाईल’ मध्ये गणलं जातं. विम्याची रक्कम या लोकांना द्यावी लागण्याची शक्यता अधिक असल्याने प्रत्येक विमा कंपनी ही त्यांच्या अर्जात “धूम्रपान करता का ?” असा प्रश्न विचारते आणि त्यानुसार तुमच्या विम्याचा हफ्ता ठरवत असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला विम्याचा हफ्ता हा इतर विमाधारकांपेक्षा अधिक असतो हे नेहमीच सर्वेक्षणात समोर आलं आहे. धूम्रपान टाळता आलं तर विमा हफ्ता सुद्धा कमी होत असतो याबद्दल जागरूकता वाढणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा – Term and Health Insurance : टर्म आणि हेल्थ इंशुरन्स मधील फरक काय?
२. धूम्रपानाने होणारे आजारांचं ‘कवच’ दिलं जात नाही :
काही विमा कंपन्यांनी अशा आरोग्य विमा योजना तयार केल्या आहेत ज्यामध्ये धूम्रपानामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांना त्यांच्या ‘विमा कवच’ मधून वगळण्यात आलं आहे. कोणते आजार झाले तर विमा कंपनी त्यांच्या सेवा पुरवणार नाही हे अर्जात छोट्या अक्षरात लिहिलेलं असते. धूम्रपान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या विमा प्रतिनिधी सोबत चर्चा करून आधी माहिती घ्यावी. आरोग्य विमा हा त्या व्यक्तींसाठी असतो जे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. धूम्रपान करणारे व्यक्ती हे स्वतःच कित्येक आजारांना निमंत्रण देत असतात हे माहीत असल्याने विमा कंपनी देखील त्यांना मर्यादित स्वरूपातच मदत करते हे स्पष्ट आहे.
३. योग्य माहिती देणे आणि त्यानुसार आरोग्य विमा योजना निवडणे गरजेचे असते :
धूम्रपान करणाऱ्या काही व्यक्ती विमा प्रतिनिधींना त्याबद्दल माहिती देत नाहीत. पण, अशी खोटी माहिती देण्याची चूक कोणीच करू नये असं विमा कंपनी सांगत असते. विमाधारक हे जेव्हा एखाद्या आजारासाठी विमा कंपनीकडे आर्थिक मदत मागत असतात, तेव्हा विमा कंपनी तुमच्या आजाराची सुरुवात ही कोणत्या सवयीमुळे झाली याचा सखोल अभ्यास करत असते. तुमची धूम्रपानाची सवय आधीच सांगितली नाही तर जेव्हा तुम्हाला आर्थिक मदतीची गरज असते तेव्हा ती मिळण्यास त्रास होऊ शकतो, तुमचा ‘क्लेम’ नाकारल्या जाऊ शकतो. शिवाय, तुमचा विमा रद्द करून तुम्ही आजवर भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम ही विमा कंपनी जप्त करू शकते. विमा कंपनी ही अशा व्यक्तींवर खोटी माहिती दिल्याबद्दल केस सुद्धा करू शकते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.
हेही वाचा – Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स
4.धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी विमा विकत घेतांना कोणती काळजी घ्यावी ?
धूम्रपान करणारे व्यक्ती हे विमा योजना विकत घेऊच शकत नाही असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला विमा विकत घेण्याचा अधिकार आहे. धूम्रपान करणारी व्यक्ती ही ज्याप्रकारे धूम्रपान करून आपल्या जगण्याचा खर्च वाढवत असते त्याच प्रमाणात त्याचा विमा हफत्याचा खर्च अधिक असतो अशी समज घ्यावी आणि विमा विकत घ्यावा. आरोग्य विमा ही आजच्या काळातील सर्वात आवश्यक गोष्ट आहे हे मान्य करावं आणि विमा प्रतिनिधीला खरी माहिती देऊन तुम्हाला अनुरूप असा योग्य आरोग्य विमा विकत घ्यावा.
धूम्रपान करणे ही अशी सवय आहे जी सोडणं अवघड आहे. पण, अशक्य नाही. धूम्रपान केल्याने तुमचं आरोग्य तुम्ही धोक्यात टाकत असतात आणि अधिक खर्च करून तुम्ही भविष्य देखील धोक्यात टाकत असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग, आपण ही सवय सोडण्यासाठी योग्य ती पावलं उचलू शकतो.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies