देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच LIC ने नुकतीच नवी विमा योजना लॉन्च केली आहे. 22 मे 2022 रोजी ही नवी योजना ‘एलआयसी विमा रत्न योजना’ (LIC Bima Ratna Scheme) या नावाने लॉन्च करण्यात आली आहे.
पॉलिसीधारकाच्या कुटुंबाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान काही अपघात किंवा अकाली निधन झाले तर ही योजना आर्थिक सहाय्य करण्यास उपयुक्त ठरते. तसेच, विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण विमा योजना आहे.
काय आहे ‘एलआयसी विमा रत्न योजना’?
संरक्षण व बचत यांचा मेळ घालणारी ही नवी पॉलिसी एक नॉन-लिंक्ड, नॉन- पार्टीसिपेटिंग, इंडिविज्युअल व बचत जीवन विमा योजना आहे, जी देशांतर्गत बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार केली आहे. विमा रत्न पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे अकाली निधन झाल्यास आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने LIC ने ही नवी योजना सुरु केली आहे.
पॉलिसीधारकाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला ठराविक कालावधीने पेमेंट केले जाते. शिवाय, यामध्ये कर्जाच्या विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – Education Loan : परदेशी शिकायला जाताय? शैक्षणिक कर्जासाठी या ५ गोष्टींची दक्षता घ्या
‘एलआयसी विमा रत्न योजना’ कशी खरेदी करावी?
हे उत्पादन सध्या कॉर्पोरेट एजंट, विमा, मार्केटिंग फर्म किंवा ब्रोकर्स या मध्यस्थांद्वारे खरेदी केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट एजंट, विमा विपणन कंपन्या (IMF) किंवा दलाल यांच्याद्वारे हे उत्पादन खरेदी करून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता.
सुविधा :-
डेथ बेनेफिट (death benefit) –
पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम ही मृत्यूवरील मूळ विमा रकमेच्या 125% किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट जास्त असेल. डेथ बेनेफिट हा एकूण भरलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसेल.
तथापि, 8 वर्षांखालील मुलाचा, जोखीम सुरु होण्यापूर्वी अकाली मृत्यू झाला, तर कोणताही अतिरिक्त प्रीमियम किंवा रायडर प्रीमियम वगळता भरलेल्या प्रीमियमचा परतावा मिळेल.
सर्व्हायव्हल बेनेफिट (survival benefit) –
पॉलिसीची मुदत जर 15 वर्ष असेल, तर पॉलिसी, 13 व्या आणि 14व्या वर्षांच्या शेवटी मूळ विमा रकमेच्या 25% रक्कम देईल. 20 वर्षांची मुदत असल्यास, LIC ला प्रत्येक 18व्या व 19व्या पॉलिसी वर्षांच्या शेवटी 25% रक्कम द्यावी लागेल. दरम्यान, पॉलिसी योजना 25 वर्षांच्या मुदतीसाठी असल्यास, LIC ला प्रत्येक 23व्या व 24व्या पॉलिसी वर्षांच्या शेवटी 25% रक्कम द्यावी लागेल.
मॅच्युरिटी बेनेफिट (maturity benefit) –
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाची पॉलिसी जर अंमलात असेल तर जमा झालेल्या गॅरंटीड ऑडिशन्ससह “मॅच्युरिटीवर विमा रक्कम” देय असेल. येथे मॅच्युरिटीवर विम्याची रक्कम मूळ विमा रकमेच्या 50% इतकी असते.
सेटलमेंट ऑप्शन –
‘एलआयसी सेटलमेंट’ हा ‘इन-फोर्स’ किंवा ‘पेड-अप’ पॉलिसी अंतर्गत 5 वर्षांच्या कालावधीतील हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी बेनेफिट प्राप्त करून देण्याचा एक सोपा पर्याय आहे.
इतर फायदे –
LIC पहिल्या व पाचव्या वर्षांपर्यंत 1000 रुपयांच्या मूळ पेमेंटसाठी 50 रुपयापर्यंत अतिरिक्त विमा गॅरेन्टी देईल. दरम्यान, 6व्या ते 10व्या पॉलिसी वर्षापर्यंत, प्रत्येक मूळ विमा रकमेसाठी 1000 रुपये, पेआउट 55 रुपये असेल. तसेच, 11 व्या ते 25 व्या पॉलिसी वर्षापर्यंत 1000 रुपयांच्या मूळ विमा रकमेसाठी हमी दिलेली रक्कम 60 रुपयांपर्यंत वाढेल. या पॉलिसीमध्ये किमान विम्याची रक्कम 5 लाख रुपये आहे. तसेच, यामधे कमाल विम्याच्या रकमेवर मर्यादा नाही.