Reading Time: 4 minutes

 वैयक्तिक कर्ज ही सर्वसाधारणपणे, विनातारण असतात. बँका, पतसंस्था अथवा नॉन बँकिंग कंपन्या यांच्याकडून ते आपल्याला मिळू शकते. तातडीच्या अडचणींवर जसे की आजारपण, शिक्षण, लग्नाचा खर्च, घराचे नूतनीकरण, स्थावर मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास इ अशा तात्कालीक  मोठया खर्चावर मात करण्यासाठी अशी कर्जे घेतली जातात. तर काही जण असे कर्ज सुलभतेने मिळते आहे असे समजल्यावर, ते मुद्दाम घेऊन आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठीसुद्धा घेतात.

           असे कर्ज बँका , बिगर बँकिंग कंपन्या आपल्या अनुभवावर वितरित करतात. कर्ज परतफेडीची पात्रता हा त्यांचा महत्वाचा निकष असतो. बँकाबँकांमध्ये  आणि फायनान्स कंपन्यामध्ये  असलेली तीव्र स्पर्धा यामुळे असे कर्ज देण्याच्या अटी, परातफेडीचा कालावधी, कमान /किमान कर्जरक्कम, व्याजदर यात भिन्नता आढळते. हे कर्ज सामान्यतः विनातारण मिळत असल्याने त्यात जोखीम अधिक असते त्यामुळे त्यावरील  व्याजदर हा तारण कर्जाहून अधिक असतो. सध्या अशा प्रकारच्या कर्जावरील सध्याच्या व्याजदर 12 ते 15% प्रतिवर्ष आहे.

कर्ज वितरीत करण्यासाठी, अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याचे बँक आणि फायनान्स कंपन्या यांचे सर्वसाधारणपणे काही निकष आहेत. यात त्यांच्या धेय्यधोरणानुसार थोडाफार फरक असू शकतो.

*अर्जदाराचे वय 18 ते 60 व्यावसायिकांसाठी 55 वर्षापर्यंत असावे.

*तो नोकरदार किंवा व्यावसायिक असावा.

त्याची हाती येणारे मासिक उत्पन्न किमान 15 ते 25 हजार रुपये असावे.

*कर्ज फेडीची मुदत 3 ते 5 वर्षे

*सिबिल (CIBIL) या पतमापन संस्थेकडे असलेला अर्जदाराचा पतदर्जा (rating) किमान 750 (उच्च दर्जाचे) हून अधिक असावा.

*नोकरदारांना कमाल 15 लाख तर व्यावसायिकांना 30 लाख रुपये वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

आवश्यक कागदपत्रे:

*यासाठी नियमाप्रमाणे अर्ज, फोटो ओळखपत्र , निवासाचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा व फोटो द्यावा लागतो.

*व्यावसायिकांना मागील दोन वर्षांचा लेखपालाने प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला  लागतो. क्वचित एखादी व्यक्ती हमीदार म्हणून हवी असेल तर तिची माहिती व फोटो लागतो.

सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वैयक्तिक कर्ज 48 तासात मंजूर होऊ शकते.

अन्य कर्जाप्रमाणे ते त्याच कारणास वापरले पाहिजे असे बंधन नसते.

कर्ज रक्कम जरुरीप्रमाणे लागेल तशी टप्याटप्याने घेता येते. परतफेड आपणास शक्य होईल असा हप्ता बांधून करता येते.

कर्ज प्रक्रिया:

बँक वित्तीय संस्था यांच्या संकेतस्थळावर भेट  देऊन आपण ऑनलाईन कर्ज मागणी करू शकतो. या वेबसाईटवर  व्याजदर, प्रक्रिया फी, कर्जरक्कम ,परतफेडीची मुदत याशिवाय अन्य काही खर्च यांची माहिती घेऊन त्यांची तुलना करता येते.

      वैयक्तिक कर्जामुळे आपली तात्कालीन गरज झटपट पूर्ण होते.  सध्या खाजगी क्षेत्रांतील बँका म्हणजे एचडीएफसी बँक, अक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स श्रीराम गृप यांनी मोठया प्रमाणात वैयक्तिक कर्ज व्यवसायावर ताबा मिळवलेला आहे. याशिवाय झटपट कर्ज देणाऱ्या अनेक मान्यताप्राप्त आणि मान्यता नसलेल्याही अनेक संस्था या बाजारात कार्यरत आहेत.

अशा प्रकारे कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

*आपल्याला किती कर्जाची गरज आहे ते निश्चित करावे.

*कर्ज घेणे कोठून फायदेशीर होईल याचा शोध घ्यावा.

*आपला पतदर्जा तपासून पहावा.

 *कर्ज करारातील बारीकसारीक तपशील वाचावा.

*विशेषतः कर्ज मुदतीपूर्वी परत केल्यास काही आकारणी फी द्यावी लागेल अथवा नाही ते तपासावे.

*आपल्याला योग्य अशी मुदत आणि कर्जफेड रक्कम ठेवावी.

*आपली पात्रता, कर्जफेडीची क्षमता, व्याजदर या गोष्टी विचारात घ्याव्यात.

*प्रोसेसिंग फी ची तुलना करावी.

*कर्ज परतफेडीसाठी पुढील तारखेचे धनादेश, किंवा इसिएस (ECS), नच या सारख्या माध्यमातून परस्पर हप्ता कापण्याची सूचना देऊन ठेवावी.

         असे कर्ज घेणे ही अनेकांची अपरिहार्यता असते. तरीही अनेक लोक असे आहेत की जे आपले पैसे मुदत ठेवीत कमी व्याजाने ठेवून अधिक व्याजदर असलेले अनावश्यक कर्ज उचलतात. यामुळे आपण आर्थिक नव्हे तर वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत हेच कर्ज होते. ते झटपट मिळत असले तरी याचा व्याजदर अधिक असतो.

त्याहून कमी व्याजदराने आपण खालील मार्गाने कर्ज मिळवू शकतो.

*मित्र नातेवाईक यांच्याकडून पैसे उधार घेऊन

*असलेली गुंतवणूक मोडून

*असलेले सोनेनाणे विकून

*पीपीएफ, पीएफ मधून अंशतः पैसे काढून घेबून

        यात व्याज देण्याचा प्रश्न येत नाही आणि गरज तात्काळ पूर्ण होते. असे करण्यास संकोच किंवा कमीपणाचे वाटत असेल, थोडेफार व्याज गेले तरी चालेल अशी विचारसरणी असेल तर खऱ्याखुऱ्या गरजेसाठी काही पर्याय असे-

★मुदत ठेवींवरील कर्ज- आपली मुदत ठेव असलेल्या संस्थेकडून आपल्यास कर्ज मिळू शकते हे कर्ज ठेव रकमेच्या 70 ते 90% असते तसेच त्यावरील व्याजदर ठेव दराहून 1 ते 3% अधिक असतो.

फायदे-

*मालमत्ता न मोडता झटपट कर्ज

*व्याजदर परवडणारा

*कमीतकमी कागदपत्रे

*प्रक्रिया शुल्क नाही.

तोटे

*कर्ज रक्कम आणि परतफेड मुदत ठेवींच्या प्रमाणातच

★क्रेडिट कार्ड

हे एक अल्पमुदतीचे कर्जच आहे. कमी कालावधीसाठी काही रक्कम खर्चास उपलब्ध होते. काही संस्था 6 महिने मुदतीचे बिनव्याजी कर्ज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात.

फायदे

*कमी कालावधीची गरज पूर्ण होते.

*शून्य व्याजदर

*खर्च करण्याची पत वाढते

*नियमितता असल्यास सीबील स्कोर वाढतो

तोटे

*परतफेड न करता आल्यास त्यावर दंड आणि व्याज यामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता.

*त्यामुळे सीबीलवर परिणाम होतो.

*यात छुपे खर्च बरेच असतात.

★सुवर्ण तारण कर्ज

आता जवळपास सर्व वित्तीय संस्था हे कर्ज सहज देतात. यासाठी सोन्याचे दागिने नाणी तारण म्हणून असल्याने हा सुरक्षित कर्जाचा प्रकार म्हणता येईल.

फायदे

*वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी

*चांगल्या सीबील स्कोर आणि निश्चित उत्पन्न असण्याची आवश्यक नसते

तोटे

*परतफेड कालावधी मध्यम जास्तीत जास्त 24 महिने

*तारण सोन्याची किंमत ठरवण्याचे निकष वेगळे

★विमा पॉलिसीवरील कर्ज-

आपल्याकडे असलेल्या अनेक विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकते. पॉलिसी व्हॅल्यू, कालावधी यावर किती कर्ज मिळेल ते ठरवले जाते.

फायदे

*झटपट वितरण

*कमी व्याजदर

तोटे

*या पॉलिसीवर किती कर्ज मिळू शकते ते आपण इन्शुरन्स कंपनीकडे किती रक्कम जमा केली त्यावर अवलंबून असते त्यामुळे नेमके किती कर्ज मिळू शकेल याची चौकशी करावी लागेल.

*कर्जफेड न केल्यास पॉलिसी रद्द होण्याची शक्यता त्यामुळे पॉलिसी घेण्यामागील हेतुलाच धक्का पोहोचण्याची शक्यता.

★पी टू पी प्लॅटफॉर्म-

कर्ज देणारे ऑनलाइन प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या अटी शर्तीनुसार कर्ज मिळू शकते.

फायदे

*कर्ज देणारा आणि घेणारा यांच्यातील एकमतानुसार योग्य अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता

तोटे

*ब्रोकरेज अधिक जाते

*यातील प्लॅटफॉर्म फारसे विश्वासार्ह नाहीत

★शेअर्स तारण ठेवून कर्ज

शेअर, कर्जरोखे, युनिट तारण ठेवून कर्ज मिळू शकते हे कर्ज त्याच्या बाजारभावावर अथवा निव्वळ मालमत्ता मूल्यावर अवलंबून असते.

फायदे

*तात्काळ मिळते, व्याजदर कमी

°आपल्या मर्जीनुसार फेडता येते.

तोटे

*गहाण ठेवलेले शेअर्स, रोखे, युनिट त्यावरील बोजा हाटवल्याखेरीज विकू शकत नाही.

*यदाकदाचित भाव खूप खाली आले तर यातील मार्जिन पैसे किंवा अधिक शेअर्स गहन ठेवून पूर्ण करावे लागते.

हेही वाचा : क्रेडिट स्कोअरशिवाय कर्ज कसं मिळवायचे ? 

★स्थावर मालमत्ता तारण ठेऊन कर्ज :

घर, दुकान, फार्म हाऊस, जमीन अशी स्थावर किंवा व्यवसायाची मशिनरी कच्चा माल, तयार माल यासारखी मालमत्ता तारण ठेवून असे कर्ज मिळते.

फायदे

*याचे पात्रता निकष निश्चित आहेत. मालमत्तेच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 ते 70% रक्कम कर्ज मिळू शकते.

तोटे

*कागदपत्रे तयार करण्यात वेळ जातो.

      वैयक्तिक कर्जासाठी वरील पर्याय हे स्मार्ट पर्याय होऊ शकतील. शक्यतो कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी –

*खर्चावर नियंत्रण ठेवावे. नियमित बचत गुंतवणूक करावी.

*प्रवासासाठी शेअरिंग किंवा सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा.

*घरातील अनावश्यक वस्तूंची विक्री करावी.

*छोटा मोठा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालावी.

*येणाऱ्या रकमेचे योग्य नियोजन करावे. यासाठी नियमितपणे जमाखर्च लिहून वेळोवेळी त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यातून मिळालेली शिकवण लक्षात घेऊन योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. यामुळे यदाकदाचित कर्ज घेण्याची वेळ आलीच तर त्यावर आपल्याला नक्कीच मात करता येईल.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तिक असून कर्ज घेण्यासंदर्भात कोणतीही शिफारस करीत नाहीत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…