Reading Time: 3 minutes

प्रत्येक व्यक्ती निश्चित हेतूनं गुंतवणूक करत असते. या हेतूंमधे अनेकदा आपल्याला खरंखुरं आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, आपल्या मर्जीनुसार पैसे खर्च करता यावेत अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा असते. स्वतः कोणतीही गुंतवणूक न करता अनपेक्षितपणे काही जण श्रीमंत बनतात. त्यांच्याकडे केवळ भरपूर पैसे आहेत, म्हणून आपण त्यांना श्रीमंत म्हणू शकतो पण समृद्ध नव्हे. जवळ असलेले पैसे योग्य पद्धतीनं आणि योग्य ठिकाणी गुंतवणं तसंच वाढवणं आवश्यक आहे. किंवा त्यात भर घालता आली नाही, तर निदान ते सांभाळता येतील, एवढं किमान कौशल्य आपल्याकडे असेल, तर आर्थिकदृष्ट्या आपण खरोखरच समृद्ध झालो, असं म्हणता येईल. हा मार्ग वाटतो तितका सोपा नाही, त्यात अनेक अडथळे आहेत. 

आपल्या अनेक आर्थिक सवयी या आपल्याला मध्यमवर्गातच ठेवतात अथवा त्याकडे ढकलतात, त्या कोणत्या, त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

  • कोणतंही निश्चित आर्थिक ध्येय नसणं – अनेक व्यक्ती अश्या आहेत, की त्यांच्यापुढे कोणतंही आर्थिक ध्येय नसतं. त्यामुळे बचत किंवा त्यापुढं जाऊन गुंतवणूक करावी, असं त्यांना वाटतच नसल्यामुळे त्यांना समृद्धी सोडाच श्रीमंतही होता येत नाही. तेव्हा आर्थिक दृष्टीनं समृद्ध व्हायचं असेल, तर आपलं उद्दिष्ट असणं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
  • स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांना प्राधान्य न देणं – काही व्यक्ती अशाही आहेत, ज्यांच्याकडे निश्चित आर्थिक उद्दिष्ट आहे,पण त्यांचा प्राधान्यक्रम, गरजा आणि चैन यासाठी खर्च करण्याकडे आहे. त्यामुळे ते पुरेशी गुंतवणूक करू शकत नाहीत, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकत नाहीत. फारच थोडे लोक उद्दिष्टांवर लक्ष ठेवून प्रथम बचत अथवा गुंतवणूक करतात. मिळालेल्या पैशाचं नियोजन करून गुंतवणूक केल्यास, राहिलेले पैसे परिस्थितीनुसार खर्च कसे करायचे ते आपोआप समजत जाईल. 
  • अनावश्यक कर्ज घेणं – आर्थिक क्षेत्रामधल्या स्पर्धेमुळे सध्या कुणालाही सहज कर्ज उपलब्ध होत आहे. त्यासाठी कोणतंही तारण ठेवावं लागत नसल्यामुळे अनेकदा अनावश्यक कारणांसाठी कर्ज घेतलं जातं. स्वतः ला राहण्यासाठी घर, उच्च शिक्षण, व्यवसायाची वृद्धी या साठी घेतलेलं कर्ज हे आवश्यक कर्ज म्हणता येईल. घर आणि उच्च शिक्षण हे गरजेचं पण आता आवाक्यातील नसल्यामुळे कर्ज घ्यावं लागणं अपरिहार्य आहे. व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेल्या कर्जातून भविष्यात उलाढाल होईल, वाढीव परतावा मिळू शकतो, म्हणून ते कर्ज आवश्यक कर्ज समजावं. याउलट चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घेतलेलं कर्ज अनावश्यक म्हणता येईल. अनेकदा यासाठी हप्ता (EMI) किती पडेल हे सांगितलं जातं. त्याकडे पाहून कर्ज खूप शुल्लक वाटू शकतं. यासाठी व्याज द्यावं लागतं, वरचेवर सहज उपलब्ध असलेलं कर्ज घेतलं तर “कर्ज फेडण्यासाठी नवं कर्ज” अशी परिस्थिती निर्माण होऊन तुमची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू होते.
  • पुरेसा राखीव निधी नसणं – अचानक काही आर्थिक संकट आलं, जसं की मोठं आजारपण, अपघात, नोकरी जाणं, अशा परिस्थितीत काही नियमित खर्च हे करावेच लागतात, त्यांना पर्याय नसतो. खर्च करण्यासाठी,स्वतःजवळ 6 ते 12 महिने पुरेल एवढा निधी असेल आणि तो सहज काढून घेता येत असेल, तर तो उपयोगी पडतो, नाहीतर अधिक व्याजदरानं कर्ज घ्यावं लागतं. उधार उसनवारी करावी लागते. असा निधी निर्माण करून आपली आर्थिक स्थिती मजबूत राहते. कुणाकडे हात पसरावे लागत नाहीत.
  • उत्पन्न खर्च मालमत्ता दायित्व किती ते माहिती नसणं – कोणतंही आर्थिक उद्दिष्ट नसलेल्या व्यक्तीना या गोष्टी माहिती नसतात. याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक निर्णय घेण्याची सवय असेल तर  त्यातल्या अनावश्यक गोष्टी टाळता येतात. आवश्यक तरतुदी / धोरणात्मक बदल करता येतात.
  • आर्थिक नुकसान करणाऱ्या महाग सवयी – अपवादात्मक प्रसंगीच क्षम्य असलेल्या मात्र अलीकडे सर्रास अंगवळणी पडलेल्या काही सवयी उदाहरणार्थ, हॉटेलिंग करणं, तात्काळ कोट्यामधून प्रवास तिकीट काढणं, शेवटच्या क्षणी सहलीस निघणं, आयत्या वेळी विमानाचं तिकीट काढणं, बाहेर खाणं, ब्रॅण्डेड वस्तूच खरेदी करणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याऐवजी खाजगी वाहतुकीचा वापर करणं. सुजाण ग्राहक हा नेहमी जागृत असायाला हवा, त्याने योग्य दर्जा आणि वाजवी किंमत (स्वस्त नाही) यांचा स्वतः नियमित शोध घ्यावा आणि नियोजन करावं,  अगदीच नाईलाज असेल तरच अन्य पर्यायांकडे वळावं.
  • गुंतवणूक न करता त्यांच्या संधी शोधत बसणं  – गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असताना विशिष्ठ पर्यायाची वाट पाहण्यासाठी, अनेकजण आपले पैसे तसेच बचत खात्यात ठेवतात. त्यामुळे गुंतवणूक न होता नुकसानच होते. फार काळ पैसे तसेच गुंतवणूक न करता ठेवण्याऐवजी आपल्याकडे एकच पर्याय नसून त्याचे अन्य पर्यायही माहिती असायला हवेत.
  • कर आकारणी सवलती संबंधात माहिती नसणं – भांडवल बाजाराशी संबंधित अनेक गुंतवणूक प्रकार आहेत. त्यावर करामधे सूट आणि सवलतीच्या एकसमान दराने कर आकारणी होते. अनेकांना हे माहिती नसल्यामुळे ते आपली गुंतवणूक अन्य प्रकारात करून त्यावर कर देतात.
  • प्राथमिक आर्थिक विषयांची कमी माहिती – आर्थिक संबंधात अश्या अनेक प्राथमिक गोष्टी म्हणजे उद्दिष्ट, अंदाजपत्रक, देखभाल खर्च ज्या माहीत असतील तर योग्य पर्याय गुंतवणूकदार निवडू शकतात. उदाहरणार्थ, घर – गाडी विकत घेणं याऐवजी भाड्यानं घेणं. असलेलं घर-गाडी बदलून मोठं घर घेणं, अलिशान गाडी घेण्याचे फायदे / तोटे हे माहीत असेल तर योग्य तोच खर्च केला जातो.

    सहज सुचलेल्या या यादीत अनेक गोष्टींची अजूनही भर टाकता येईल. बऱ्याच जणांना त्या कंजूषपणा दर्शविणाऱ्या वाटतील. आवश्यक असेल तर त्या नक्की कराव्यात त्यासाठी मागेपुढे पाहू नये. हा समतोल साधत राहिलं तर आपण सुजाण गुंतवणूकदार बनून आपल्या संपत्तीत भर घालू शकतो.

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

 

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutesमाझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutesतुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutesडिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…