‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात किंवा कानावर आला असेल. हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसं ‘निफ्टी’= एनएससी + फिफ्टी, ‘सेन्सेक्स’= सेन्सेटिव्ह + इंडेक्स. अशाप्रकारे दोन शब्दांतून तयार होणाऱ्या शब्दाला मराठी व्याकरणात ‘संधी’ म्हणतात. सामान्यपणे ‘संधी’ हा शब्द ‘शक्यता, अवसर, वेळ आणि अवधी’ अशा अर्थानं वापरला जातो.
- फिनटेक कंपन्या या वित्तीय क्षेत्रांशी संबंधित विविध कार्य करत असतात. तसंच तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या शक्यताचा अधिकाधिक वापर करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर या कंपन्या अशाप्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान विकसित करता,त ज्यामुळे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला (पी 2 पी) पेमेंट करायचं असेल तर त्यासाठी खास अँप्लिकेशन्स बनवलं जाईल. त्यामुळे हा व्यवहार सुलभ होईल.
- फिनटेक हा खूप व्यापक शब्द आहे. अलीकडे इलेक्ट्रॉनिक / डिजिटल व्यवहार वाढले असले तरी भारतात अजूनही रोख रकमेतच अनेक व्यवहार होत आहेत.
- लोक बँकांना केंद्रित ठेवून त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करतात. यातील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारणी करण्यात येते. जर असे व्यवहार सुरक्षित, झटपट आणि अत्यंत कमी खर्चात किंवा विनामूल्य झाले तर अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होतील. ही सुविधा देण्याचं महत्वाचं कार्य या कंपन्या करत असतात.
- फिनटेक कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना देत असलेल्या महत्वाच्या आर्थिकसुविधा या पारंपरिक बँकिंगपेक्षा वेगवान, सुलभ आणि किफायतशीर दरात देतात.
यातल्या काही सेवा पुढीलप्रमाणे आहेत.
- पैशांची देवाणघेवाण: उदाहरण: फोनेपे, गूगल पे, पेटीएम यांच्या माध्यमातून आर्थिक सेवा (पैशांची देवाणघेवाण) देणं.
- सेवा: युपीआय, पैसे पाठवणं, क्यू आर कोड, बिल पेमेंट्स, व्यापारांना एकमेकांशी (बी 2 बी), व्यापारी आणि ग्राहक (बी 2 पी), ग्राहक आणि व्यापारी (पी 2 बी), व्यक्तींना एकमेकांशी (पी 2 पी) पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा असेल.
- कर्ज वितरण:उदाहरण: क्रेडिट-बी, लेंडिंगकार्ट
- सेवा: झटपट वैयक्तिक आणि व्यवसायायिक कर्ज देणं, समान मासिक हप्ते सुविधा असणं.
- शेअर बाजार आणि अन्य गुंतवणूक मंच यांचा सहभाग असणं : उदाहरण: झिरोदा, ग्रो, अपस्टोक्स
- सेवा: शेअर्स, म्युच्युअल फंड्स यात नियमित गुंतवणूक करण्यासाठी योग्य अँप्सची निर्मिती करणं.
- निओबँक्स (डिजिटल बँका): उदाहरण: ज्युपिटर, नियो
- सेवा: बँक खाते, कार्ड, खर्चाचं व्यवस्थापन (पूर्णतः ऑनलाइन) कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नाही.
- विमा तंत्रज्ञान: उदाहरण: ऍको, पॉलिसीबाजार, डिजिट
- सेवा: विमा खरेदी, दावा प्रक्रिया, वर्गणी, ऑनलाईन आणि अँप्सच्या माध्यमातून तुलना करून योग्य निर्णय घेण्यास फायदेशीर ठरते.
- व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापन: उदाहरण: मनीव्ह्यू, वॉलनट
- सेवा: खर्चाचा मागोवा, आर्थिक नियोजन, क्रेडिट स्कोअर संदर्भात सेवा प्रदान करणं.
आजकाल बहुतेक लोकांकडे त्यांच्या मोबाईलमध्ये किमान एक तरी फायनान्शियल अँप आहे, ज्यामुळे आपले जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. गुगल पे/ पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेकजण उद्योजक त्यात अधिकाधिक कल्पकता आणून त्यांचे स्टार्टअप उद्योग सुरू करत आहेत. ते स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याला सरकारी प्रोत्साहनही मिळत आहे.
अनेक नावीन्यपूर्ण फिनटेक कंपन्या व्यवसायवृद्धीस हातभार लावून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम करत आहेत. आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत अमूलाग्र बदल घडवत असल्यानं त्यांचं महत्व अधोरेखित होतं.
या सेवांचा फायदा काय आहे?
- ग्रामीण भागात आर्थिक सेवा पोहोचवणं.
- कॅशलेस व्यवहाराला चालना मिळणं.
- या सेवा स्टार्टअप्स, मध्य लघु आणि सूक्ष्म उद्योगासाठी फायद्याच्या ठरत आहेत.
- पारंपरिक बँकिंगला पूरक सेवा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
भारतातील ग्राहकांना उपयोग होईल अशा भविष्यकालीन नाविन्यपूर्ण फिनटेक कल्पना त्यासंबधीची उदाहरणं आणि त्यांचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
- पूरक वित्त – (Embedded Finance)
म्हणजे काय: बँकींग किंवा आर्थिक सेवा थेट इतर अॅप्समध्ये समाविष्ट असणं.
उदाहरण: फ्लिपकार्टवर खरेदी करताना कर्ज मिळणं.
परिणाम: बँकेकडे न जाता देखील व्यवहार पूर्ण होणं.
- कृत्रिम प्रज्ञेवर आधारित संपत्ती व्यवस्थापन- (Robo-Advisors)
म्हणजे काय: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिला जाणारा गुंतवणुकीचा सल्ला होय.
उदाहरण: तुमच्या मासिक खर्चाचा विचार करून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणं.
परिणाम: नवशिक्यांसाठी गुंतवणूक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता वाढीस लागण्यास उपयुक्त ठरू शकते.
- CBDC (डिजिटल रुपये – RBI कडून)
म्हणजे काय: आरबीआयनं जारी केलेला डिजिटल भारतीय रुपया होय. सध्या मोठ्या कंपन्या व्यवहार करण्यासाठी याचा वापर करत आहेत. असं म्हटलं जातंय की भविष्यात हा वापर सार्वत्रिक होईल.
परिणाम: डिजिटल भारतीय रुपयामुळे जलद, सुरक्षित, सहज शोध घेता येऊ शकेल असे व्यवहार समाविष्ट असतील.
- विकेंद्रित वित्त – (Decentralized Finance)
म्हणजे काय: ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवा देणं आणि मध्यस्थाचा कमीतकमी वापर करणं, उदाहरण: स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे कर्ज, विमा आणि व्याज मिळवणं.
परिणाम: पारदर्शकता, कमीतकमी व्याजदर, व्यवस्थापन फी आकारणी आणि त्यावर नियमन असणं.
- बोलून सूचना देऊन केले जाणारे व्यवहार- (Voice based banking/transactions)
म्हणजे काय: फक्त बोलून आपल्या भाषेत व्यवहार करणं.
उदाहरण: “मंदारला 1000 रुपये त्वरित पाठवा” अशी सूचना गुगल असिस्टंटला केली असता माझ्या खात्यातील पैसे गुगल पे द्वारा मंदारच्या खात्यात त्वरित हस्तांतरीत होतील.
परिणाम: ज्येष्ठ नागरिक आणि अल्पशिक्षित व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी उपयुक्त होईल.
- कृषी वित्तव्यवहार – (Agri-Fintech)
म्हणजे काय: शेतकऱ्यांसाठी खास आर्थिक तंत्रज्ञान सेवा पुरवणं.
उदाहरण: हवामान अंदाजावर आधारित कर्ज पुरवणं, अॅपवरून पीक विमा घेणं.
परिणाम: ग्रामीण भागाचा आर्थिक विकास.
- पर्यायी विदेद्वारे पतमानांकन-
म्हणजे काय: कॉल, व्यवहार, मोबाईल वापराच्या डेटावरून क्रेडिट स्कोअर तपासणं.
परिणाम: ज्यांच्याकडे बँक इतिहास नाही त्यांनाही कर्ज मिळू शकेल.
- बायोमेट्रिक + ब्लॉकचेन केवायसी-
म्हणजे काय: फिंगरप्रिंट, डोळा स्कॅन व ब्लॉकचेनच्या मदतीनं तपासणी करणं.
परिणाम: फास्ट व फसवणूक-मुक्त ओळख पडताळणी होणं.
- ग्राहकांच्या गरजेनुसार विशेष सेवा- (Special Services)
म्हणजे काय: ग्राहकांच्या विशिष्ट खास गरजा ओळखून त्यानुसार सेवा प्रदान करणं.
उदाहरण: ग्राहकास काही समभाग, म्युच्युअल फंड युनिट, दीर्घकालीन रोख्यामधली गुंतवणूक प्रदीर्घकाळ ठेवायची असल्यास – अशी गुंतवणूक जी मोडताही येणार नाही आणि सुरक्षित राहील अशा पद्धतीने साठवून ठेवता येईल अशी डीजीलॉकर अथवा एन्टिटीलॉकर सदृश्य सुविधा देणं.
परिणाम: वारसांसाठी निश्चित सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक करता येणं शक्य होईल.
ही यादी परिपूर्ण नसून यात ग्राहकांच्या विशिष्ट नेमक्या गरजा ओळखून त्यात अनेक गोष्टींची भर घालता येईल. त्यातून फिनटेक निर्मितीत रस असणाऱ्या उद्योजकांना अनेक नावीन्यपूर्ण स्टार्टअप उद्योगात ‘अवसर’ अशा अर्थाने संधी शोधता येणं शक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणत्याही फिनटेक मंचाची शिफारस करीत नाही)