Reading Time: 2 minutes
शेअर बाजार आणि म्युचुअल फंड आता खेडोपाडी पोचले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. म्युच्युअल फंडासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे का? असं नेहमी विचारलं जातं.
- म्युच्युअल फंड स्टेटमेंट स्वरूपात वितरित केले जातात तसेच डिमॅट स्वरूपात देखील वितरीत केले जातात. फक्त अर्ज करते वेळी आपण आपली निवड सांगायची आणि डिमॅट खात्याचा नंबर द्यायचा. आपल्याला दर महिन्याला डिमॅट खात्याचे स्टेटमेंट येतं त्यात आपल्या डिमॅट खात्यात असलेले शेअर्स आणि म्युच्युअल फंडाचे युनिट दोन्हीचा उल्लेख असतो. मी सीडीएसएल मधून जरी निवृत्त झालो, तरी माझा ईमेल आयडी सीडीएसएलचाच असल्यामुळे अजूनही लोकांकडून प्रश्न येत असतात आणि आणि मी त्यांचा आनंदाने स्वीकार करतो आणि उत्तरे देतो.
- पूर्वी डिमॅट खात्यामध्ये एकच नॉमिनी नियुक्त करता येत असे. त्यामुळे एखाद्या गुंतवणूकदाराला तीन मुलं असतील तर तो तीन डिमॅट खाती उघडत असे आणि प्रत्येक खात्यात एका एका मुलाचं नाव नॉमिनी म्हणून टाकत असे.
- ग्राहक सेवा हे सीडीएसएलचे वैशिष्ट्य आहेच. त्यामुळे आता डिमॅट खात्यात तीन व्यक्ती नॉमिनी म्हणून ठेवता येतात. अर्थात प्रत्येक नॉमिनीला किती प्रमाणात शेअर्स द्यायचे हे डिमॅट खातेदार ठरवीत असतो. (म्हणजे सर्वांना समान किंवा एकाला ४०% दुसऱ्याला २५% आणि तिसऱ्याला ३५% अशाप्रकारे).
- मात्र काही वेळा अशी परिस्थिती उद्भवू शकते, समजा खात्यात तेरा शेअर्स आहेत आणि खातेदारांना समान प्रमाणात शेअर द्यायचे आहेत. तर प्रत्येकाला चार शेअर्स मिळतील. तथापि एक शेअर शिल्लक राहील त्याचे तुकडे तर करता येत नाहीत म्हणून तो एक शेअर पहिला क्रमांकाच्या नॉमिनीला दिला जाईल.
- अनेक व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून गुंतवणूकदार मेळावे म्हणजेच ‘इन्वेस्टर अवेअरनेस प्रोग्रॅम’ विषयी विचारणा होत असते. आर्थिक साक्षरतेसाठी सीडीएसएल कटिबद्ध आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेशी संलग्न असेल, जसे की रोटरी क्लब, सांस्कृतिक संस्था, ज्ञाती संस्था, मोठे उद्योग, शैक्षणिक संस्था तर त्यांच्यासाठी सीडीएसएल विनामूल्य गुंतवणूकदार मेळावे आयोजित करते.
- सीडीएसएल तर्फे महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी असे कार्यक्रम होऊ शकतात आणि तेही अगदी मातृभाषेतून म्हणजे मराठीतून, सोप्या शब्दात स्लाईड शोच्या माध्यमातून.
- आजच्या घडीला सीडीएसएलकडे ‘एक कोटी बहात्तर लाखाहून’ जास्त डिमॅट खाती उघडली गेली आहेत. कारण बँकांच्या शाखांचे जाळे देशभर विणले गेले आहे. तसेच मोठे शेअर दलाल यांचेदेखील उप-दलाल खेडोपाडी पसरले आहेत.
- एकेकाळी, “शेअर बाजारातील गुंतवणूक हे मोठ्या लोकांच काम आहे”, असा चुकीचा समज होता. आता अगदी सामान्य माणूस देखील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकतो कारण डिमॅट व्यवस्थेमुळे कोणत्याही कंपनीचा एक शेअर खरेदी करायची सोय आहे.
- शिवाय ऑनलाइन ट्रेडिंग यंत्रणेमुळे घरबसल्या किंवा प्रवासात असताना देखील शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. कोल्हापूर इन्वेस्टर असोसिएशनच्या माध्यमातून मी अनेक गुंतवणूकदार मेळावे संबोधित केले आहेत. आपण असोसिएशनशी संपर्क साधला तरी चालेल.
- आपल्या डिमॅट खात्यात शेअर्स असतात. या शेअर्सची प्रचलित बाजारभावाप्रमाणे किंमत असते त्यावर आधारित बँका कर्ज देखील देतात.
- अर्थात आजच्या घडीला शेअरची किंमत शंभर रुपये असेल, तर बँक शंभर रुपये कर्ज देणार नाही. साधारणपणे चाळीस रुपये इतकेच कर्ज देईल कारण या बाजारभावात कधीही चढ-उतार होऊ शकतो.
- कर्ज घेताना आपल्या डिमॅट खात्यात शेअर्स तारण म्हणून राहतात. ते आपल्याच खात्यात राहतात पण त्यांच्यावर अधिकार मात्र बँकेचा असतो. त्यामुळे ते शेअर्स आपण कुणाला हस्तांतरित करू शकत नाही किंवा विकू शकत नाही. अर्थात कर्जाची परतफेड झाली की त्या शेअर्सवरचा हक्क बँक सोडून देते. या सर्व प्रक्रियेला प्लेज (Pledge) असे म्हणतात.
– चंद्रशेखर ठाकूर
९८२०३८९०५१
(अधिक तपशिलासाठी अथवा वाचकांना कोणतेही प्रश्न असतील तर निसंकोचपणे माझ्याशी ९८२०३८९०५१ या मोबाईल क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.)
शेअर्स खरेदीचं सूत्र
एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय
म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :