एसआयपी(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

Reading Time: 3 minutes

स्मार्टफोनच्या जमान्यात गुंतवणूकदारही गुंतवणुकीच्या स्मार्ट आधुनिक पर्यायांना पसंती देत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणारे लाभ व कालावधी याचा विचार करता उत्तम परतावा व वेळेची लवचिकता देणाऱ्या गुंतवणूकीच्या आधुनिक पर्यायांची लोकप्रियता सध्या वाढू लागली आहे. शेअर्स, बॉण्ड्स, स्टॉक अशा अनेक पर्यायांना मागे टाकत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणुकीला जास्त पसंती देत आहेत.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

  • साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे तर म्युच्युअल फंड म्हणजे समान गुंतवणुकीचे उद्दिष्ट असणाऱ्या असंख्य गुंतवणूकदरांचे पैसे सामायीकपणे एकत्र करून, ते पैसे फंड व्यवस्थाकांमार्फत विविध प्रकारचे शेअर्स, कर्जरोखे, इ. अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात. अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेली मिळकत लाभांश, भांडवली वृद्धी अशा स्वरुपात असते.
  • गुंतवणुकदाराला त्याच्या  गुंतवणुकीच्या प्रमाणात परतावा (Returns) मिळतो.

एसआयपी (Systematic Investment  Plan)

  • सध्या एसआयपी (सिप) या म्युच्युअल फंडच्या प्रकाराकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे.
  • कोणत्याही एका फंडामध्ये संपूर्ण रक्कम एकदम गुंताविण्यापेक्षा ठराविक कालावधीत थोडी-थोडी रक्कम गुंतवणे जास्त सोईस्कर आणि कमी जोखमीचे वाटते. त्यामुळेच गुंतवणूकदार अनेक नामांकित कंपन्यांचे विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांचे युनिट्स सिपच्या माध्यमातून खरेदी करत आहेत. याच कारणामुळे आधुनिक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सिपला (SIP) जास्त पसंती दिली जात आहे.
  • सिपमधील गुंतवणूक ही शिस्तबद्ध व लवचिक असते. तसेच ही गुंतवणूक ठराविक कालावधीत करता येत असल्याने गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक, सहामाही अशा कालावधीमध्ये फंडामध्ये रक्कम भरता येते. त्यामुळे भविष्यात बाजाराच्या चढ – उताराचा फायदा घेवून मोठी गुंतवणूक करणं सहज शक्य होऊ शकते.
  • यामध्ये जर नियमितपणे रक्कम गुंतवली तर आपली आर्थिक उद्दिष्टे सध्या होण्यास मदत होवू शकते असे तज्ञांचे मत आहे.
  • आजकाल बाजारात विविध कंपन्यांचे फंड उपलब्ध आहेत. तसेच, सध्या विविध क्षेत्रातील सिप फंड प्रकार उपलब्ध आहेत. त्यापैकी तज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य तो प्रकार निवडून आपल्या शक्य तेवढी रक्कम यामध्ये गुंतवण्यास सुरुवात करावी.

एस.आय.पी. चे (Systematic Investment  Plan) फायदे:

 १. तज्ञांची मदत:

म्युच्युअल फंड अथवा सिपमध्ये गुंतवणूक करताना मार्केटचा थोडाफार अभ्यास करून गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक नेहमी फंड मॅनेजर करत असतात. या फंड मॅनेजर्सना मार्केटची व भांडवली बाजाराची संपूर्ण जाण असते. आपली रक्कम योग्य प्रकारे गुंतवणे हे त्या फंड मॅनेजर / कंपनीचे काम असते. त्यामुळे आपली रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते.

 २. कमीत कमी जोखीम:

म्युच्युअल फंडबद्दल असणाऱ्या गैरसमाजांपैकी एक म्हणजे अनेकांना असं वाटतं की खूप मोठी रक्कम गुंतवावी लागेल. पण सिपमध्ये मात्र तुम्ही कमी कमी (रु. ५००/-प्रतिमाह ) रक्कम गुंतवूनही उत्तम परतावा मिळवू शकता. अनेकदा बचत करून मोठी रक्कम गुंतवणे कठीण जाते. तसेच ते जोखमीचेही असते. पण सिपमध्ये गुंतवलेली लहान रक्कमही चांगला परतावा देते. ज्यांना शेअर बाजारात थेट गुंतवणुकीची जोखीम घ्यायची नाही परंतु बाजाराचा चढ-उताराचा फायदा घ्यायचा आहे त्यांचासाठी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सोयीस्कर ठरू शकते.

३. गुंतवणूकीचे स्वरूप:

यामध्ये विविध प्रकारचा व विविध क्षेत्रातील गुंतवणूक एकत्र केलेल्या असतात. त्यामुळे आपण कोणत्याही एकाच क्षेत्रावर अवलंबून रहात नाही. तसेच मार्केटच्या बदलणाऱ्या परिस्थितीचा फायदा घेता येतो. 

४. कालावधी आणि लवचिकता:

जर काही कारणांनी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक थांबवायची असेल तर आपण ते त्वरित करू शकतो. आपल्या फंडची एनएव्ही (NV) जितकी असेल त्या किमतीचा आणि आपल्याकडील फंड युनिट्सचा गुणाकार केल्यावर जे उत्तर येईल त्यानुसार आपल्या फंडचे मुल्यांकन केले जाते. यामध्ये विविध कर, कमिशन  वजा करून आपणास उर्वरित रक्कम त्वरित मिळवता येते.

५. पारदर्शी गुंतवणूक:

सिप अथवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही पारदर्शी गुंतवणूक असते. यामध्ये आपल्या गुंतवणुकीचे मुल्य आपणास हवे तेव्हा कळू शकते.  तसेच फंड व्यवस्थापक कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे यावरही आपल्याला लक्ष ठेवता येते.

६. गुंतवणुकीचा निश्चित कालावधी:

यामध्ये जास्त रक्कम गुंतवावी लागत नाही व कालावधीही आपल्या सोयीनुसार निश्चित करता येतो. तसेच यामधून मिळणाऱ्या लाभामुळे भविष्यात मोठी गुंतवणूक करता येणं सहज शक्य होऊ शकते.

अशाप्रकारे सिप गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आपल्या लिस्टमध्ये सिपचा पर्याय नक्की ॲड करा आणि स्मार्ट गुंतवणूक करून  स्मार्ट गुंतवणूकदार बना.

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस, भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस ,

चक्रवाढ व्याजाची जादू , मूल्य आधारित गुंतवणूक – समृद्धीचा महामार्ग

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *