१ सप्टेंबर २०१९ पासून बँक व तत्सम आर्थिक नियमांमध्ये होणारे महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आर्थिक जीवनावर होणार आहे. बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. होणाऱ्या प्रत्येक बदलामागे काहींना काही कारण असतेच. प्रत्येकानेच बदलामुळे होणाऱ्या फायदे तोट्यांना दोन्ही सामोरं जायची तयारी ठेवायला हवी.
१ सप्टेंबर २०१९ पासून होणारे बँकिंग क्षेत्रातील महत्वाचे बदल-
१. गृहकर्ज होणार स्वस्त:-
- बँकेच्या वेळेत बदल करण्यात येणार असून स्टेट बँकऑफ इंडियाचे (SBI) गृहकर्ज अजून स्वस्त होणार आहे कारण स्टेट बँकेने गृह कर्जाच्या दरात ०.२०% घट केली आहे. त्यामुळे स्टेट बँकेचा गृहकर्जाच्या नवीन व्याजदर दर ८.०५% होणार आहे.
- १ सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. सामन्यपणे स्टेट बँकेचे गृहकर्ज स्वस्त झाल्यांनतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक बँका आपला व्याजदरही कमी करतात. त्यामुळे आता घर घेणं अजून स्वस्त होणार.
२. रिटेल कर्जाला रेपो रेटशी जोडणार:
- स्टेट बँकेने गृहकर्ज स्वस्त करण्याचा निर्णय घेतल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रनेही रिटेल कर्जाला रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे जेव्हा आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करेल तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जाच्या व्याजदरातही बदल होईल. साहजिकच त्यामुळे त्यांचे कर्जही स्वस्त होणार आहे.
३. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाची जलद प्रक्रिया:
- कर्जाची प्रक्रिया हा कर्जदाराला नेहमीच त्रासदायक ठरणार विषय आहे. परंतु १ सप्टेंबरपासून सरकारी बँकांकडून ५९ मिनिटांत कर्ज उपलब्ध होणार आहे.
- यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा समावेश करण्यात आला आहे.
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने ‘psbloansin59minutes’ वर ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
४. बचत आणि मुदत ठेव (FD) यांवरील व्याजदर:
- स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे.
- परंतु ग्राहकांच्या हिताचा विचार करून बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कोणतेही बदल केले नसून १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी ३.५%.टक्के व्याजदर तर रु. १ लाखांपर्यंतच्या ठेवींवर ३% व्याजदर हा पहिला दर कायम ठेवण्यात आला आहे.
५. १५ दिवसांत किसान क्रेडिट कार्ड:
- भारत सरकारच्या महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असणारे किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्यात येणार आहे.
- हे कार्ड १५ दिवसांच्या आत जारी करण्यात यावं, असा निर्देश केंद्र सरकारमार्फत सर्व बँकांना देण्यात आला आहे.
६. मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना केवायसी (KYC ) सक्तीचे:
- गुगल पे(Google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm) अशी मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांनी सदर वॉलेटची केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.यासाठीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे.
- १ सप्टेंबर नंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना ही वॉलेट वापरता येणार नाहीत.
७. बँकेच्या वेळेत बदल:
- बहुतांश सरकारी बँका सकाळी १० वाजता उघडत असल्यामुळे अनेक ग्राहकांची पंचाईत होते. बँक १० वाजता उघडते तर नोकरदार वर्गाला सकाळी १० वाजायच्या ऑफिसला पोचायची घाई असते. शिवाय संध्याकाळी ऑफिस लवकर सुटत नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होते.
- ग्राहकांना ऑफिसला जाण्यापूर्वी बँकेत जाणं शक्य व्हावं म्हणून सकाळी बँक उघडण्याची वेळ १० वरून ९ ची करण्यात आली आहे.यासंदर्भात वित्त मंत्रालयामार्फत १ सप्टेंबरपासून सकाळी ९ वाजता बँकेचे कामकाज सुरु करण्याचे निर्देश सर्व सरकारी बँकांना देण्यात आले आहेत.
भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)
बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज
बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.