Titan : टायटनची यशोगाथा – भाग २
मागील भागात आपण टायटनची निर्मिती आणि त्याच्या यशस्वी प्रवासाबद्दल माहिती घेतली. या भागात आपण टायटनच्या (Titan) यशाच्या प्रवासातील एक मोठा टप्पा म्हणजेच त्यांचा परदेशी बाजारातील प्रवास, त्यातील अडथळे याबद्दलची म्हणजेच थोडक्यात टायटनचा यशाचा प्रवास कसा होता याबद्दल माहिती घेऊ.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)
टायटन – यशाचा प्रवास –
- आशियाई व युरोपियन बाजारपेठेत ‘टायटन’ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भारतीय तरुणाईला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्सना तिकडच्या बाजारपेठेत मात्र, पसंतीची दाद मिळत नव्हती. अपेक्षांची गणितं चुकली होती.
- ही परिस्थिती बदलण्यासाठी, ‘टायटन’ने तिथल्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेतल्या. त्यावर पुनर्विचार केला. त्या बाजपेठेच्या स्ट्रॅटेजी बदलून, संबंधित धोरणे बदलून त्यांच्यासाठी खास वेगळे डिझाइन्स बनवून घेतले. यामुळे ‘टायटन’ च्या यशोगाथेत आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले, यात शंकाच नाही.
- २३ डिसेंबर १९८७ ला मुंबई मधील ‘सकीना प्लाझा’ येथे टायटनचे पहिले शोरूम सुरु करण्यात आले. यासाठी वर्तमानपत्रांत मोठ्या जाहिराती टायटनने दिल्या होत्या. यामध्ये घड्याळे बनवण्याची प्रक्रिया दिली होती. त्याकाळात म्हणजे जवळपास ३२ वर्षांपूर्वी, लोकांना हे सर्व नवीन, आश्चर्यकारक होते. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बघून कंपनीने मग जास्तीत जास्त दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रति १०,००० लोकसंख्येमागे एक तरी टायटनचा डीलर असला पाहिजे, असे ठरवण्यात आले.
- टायटनला एकदम इतकी सगळी दुकाने उघडणे शक्य नव्हते तेव्हा अपारंपरिक दुकानांकडे मोर्चा वळवला. पुस्तकांची दुकाने, ज्वेलरी शॉप्स, हॉटेल्स, उपहारगृह यांच्या मोठ्या दुकानात एका कोपऱ्यात टायटनचे छोटेखानी काउंटर सजवण्यात आली. ग्राहकांना या नवीन ब्रँडचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले. टायटनची घड्याळं वापरणारे म्हणजे “क्लास”, “स्टेट्स” हे ग्राहकांच्या मनावर ठसवणाऱ्या जाहिराती आजही व्यवसाय व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासाचा भाग आहे.
- टायटनच्या प्रवासात ‘ग्राहकसेवा’ या गोष्टीचा फार मोठा सहभाग आहे. सुरुवातीच्या काळात टायटनने स्वतःचे ‘सर्विंस सेंटर’ उभी केली. घड्याळ रिपेअर करणे कंपनीची नावलौकिक रिपेअर करणे असे टायटनचे ब्रीदवाक्य होते. एरव्ही दुकानदाराची जबाबदारी घड्याळ विकल्यावर संपून जायची. टायटन मात्र सर्व्हिस देताना खुप काळजी घेत होती. या सर्वाचा परिणाम ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास दृढ होण्यात झाला.
तनिष्क (Tanishq):
- अनेक आव्हाने ‘टायटन’ ब्रॅण्ड स्वीकारत, त्यात यशस्वी ही होत असतानाच, आणखी एका क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. ते म्हणजे ‘ज्वेलरी’ मध्ये !
- याच काळात ‘तनिष्क’ (Tanishq) हा ब्रँड कंपनीने सुरु केला. शुद्ध सोने, अनोखे नवनवीन डिझाइन्स,उत्कृष्ट ग्राहकसेवा, आकर्षक दुकाने यांमुळे बरोबरच लवकरच ग्राहकांच्या पसंतीला उतरला.
- सोनेखरेदी हा तसा आपल्या भारतीयांसाठी भावनिक व नाजूक विषय! आपल्या नेहमीच्या सराफी पेढीकडून अनेक वर्ष दागिन्यांची खरेदी केली जाते. सर्व व्यवहार ‘विश्वास’ शब्दावर चालतात.
- ‘कॅरामीटर’ नावाचे उपकरण तनिष्कने आपल्या शोरूम मध्ये उपलब्ध करून दिले. या कॅरामीटर द्वारे ग्राहकाला आपल्या सोन्याची शुद्धता तपासता येणार होती. पारंपरिक पद्धतीने आपल्या नेहमीच्या सोनारावर विश्वास ठेऊन लोक सोने खरेदी करत असत. या कॅरामीटर मध्ये मात्र तपासल्यावर चित्र वेगळेच दिसत होते. आपल्याला २४ कॅरेटचे सांगून २२ कॅरेटचे किंवा चक्क १८ कॅरेटपेक्षा कमी दर्जाचे सोने गळ्यात मारले गेल्याचे काही ग्राहकांच्या लक्षात आले. पारंपरिक सराफी पेढ्या ‘कॅरामीटर’ उपलब्ध करून देत नव्हत्या. याउलट ‘तनिष्क’ (Tanishq) शोरूम्स मात्र संपूर्ण पारदर्शकपणे आपले दागिने विकत होते. सोने खरेदीवर दिलेली ‘एक्सचेंज ऑफर’, ग्राहकांची गरज लक्षात घेत दर्जावर केंद्रित केलेले लक्ष व हाच दर्जा कायम टिकावा यासाठी कोणतीही तडजोड न करणे, यामुळे ‘तनिष्क’ ((Tanishq) ने देखील भारतीय बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
- टायटनने दागिने विकावे की घड्याळे विकावीत याबाबत टाटा समूहामध्ये सुद्धा सुरुवातीला दुमत होते. एकदा रतन टाटांनी टायटनच्या संचालक मंडळ बैठकीत विचारले होते की टायटन ही घड्याळांसोबत दागिने विकणारी कंपनी आहे की दागिन्यांबरोबर घड्याळे विकणारी कंपनी आहे ?
- पण टायटन व्यवस्थापनाने तनिष्कच्या प्रगतीतून सर्व शंकांचे निरसन केले. टायटनच्या एकूण विक्रीपैकी जवळपास ८३% विक्री हि तनिष्कच्या माध्यमातून येते. केवळ १०% विक्री घड्याळांच्या विक्रीतून येते.
- टायटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भास्कर भट ३० सप्टेंबर २०१९ रोजी निवृत्त झाले. १ एप्रिल २००२ ला त्यांनी टायटनची एमडी (MD) म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. या कालावधीत टायटनचे शेअर्स जवळपास ४०० पट वाढले. सेन्सेक्सच्या वाढीची तुलना करता ही वाढ प्रचंड आहे. सेन्सेक्स फक्त ११ पट वाढला. म्हणजे तुम्ही फक्त १००० टायटनमध्ये गुंतले असते, तर आजची किंमत ४ लाख रुपये असती. त्याच १००० ची किंमत सेन्सेक्सच्या इंडेक्स फंडात गुंतवली असती तर केवळ ११,०००रु. एकूण किंमत असती.
- २०१८-१९ ची एकूण विक्री – रु. १९,२५० कोटी. यामध्ये,
- तनिष्क(ज्वेलरी) – ८३%
- घड्याळे – १३%
- आयवेअर – ३% ५१० कोटी
- इतर – २७० कोटी
- टायटनच्या यशामागे व्यवस्थापनाचे दूरदर्शी निर्णयाचा फार मोठा वाटा आहे. शक्यतो, नवीन व्यवसाय सुरु करताना असंघटित किंवा ज्या क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्राचे लक्ष नाही, असे व्यवसाय टायटन व्यवस्थापनाने विस्तारीकरणासाठी निवडले.
व्यवसायांची सुरुवात | वर्ष |
घड्याळे | १९८३ |
तनिष्क (ज्वेलरी) | १९९५ |
फास्टट्रॅक घड्याळे | २००३ |
टायटन आयप्लस | २००७ |
स्किन परफ्यूम्स | २०१३ |
तनेरिया साडी | २०१७ |
- आजकाल सर्वात जास्त खरेदी ऑनलाईन माध्यमांतून केली जाते. इथेही टायटन मागे कसे असेल. २०१६ मध्ये ‘कॅरेटलेन’ (Caratlane) या ज्वेलरी ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाईट कंपनीमध्ये टायटनने ६२% हिस्सा विकत घेतला.
- टायटनचे पुढचे लक्ष ‘साड्यांच्या” व्यवसायाकडे आहे. ज्याप्रमाणे सुरुवातीला ज्वेलरीचे मार्केट हे असंघटित होते.त्याप्रमाणे सध्या साड्यांचे मार्केटही असंघटित आहे. टायटन कंपनी या व्यवसायाकडे ‘नेक्स्ट बिग थिंग’ म्हणून बघते. सध्या तनेरियाच्या ५ शाखा असून त्यांची वाढ पुढच्या ५ वर्षात ६० ते ७० पर्यंत करायचा कंपनीचा मानस आहे.
- टायटनची भारतभरात १७०० दुकाने असून २.१ मिलियन स्क्वेअर फूट जागा म्हणजे २१ लाख स्क्वेअर फूट जागा त्या दुकानांनी व्यापली आहे.
- तुम्ही म्हणाल की कंपनीला या सर्व धंद्यांच्या आयडिया कंपनीला येतात कुठून? कर्मचाऱ्यांचे अंतर्गत सर्वेक्षण व कर्मचारी वर्गाला आयडिया मांडण्यासाठी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन यांचा टायटनच्या यशात फार मोठा वाटा आहे.
- टायटनच्या शेअर मुल्यामध्ये झालेल्या वाढीला अजून एक कारण आहे, ते म्हणजे पारदर्शी कारभार! प्रत्येक तिमाही निकालाबरोबर पुढच्या तीन ते सहा महिन्यांत धंदा कसा असेल, याची माहिती कंपनी जाहीर करते. कुठलीही वाईट बातमी टायटन बेहिचक गुंतवणूकदारांना कळवते. (वाईट बातमी म्हणजे विक्रीतील घट, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, एखाद्या प्रॉडक्ट विक्रीतील अपयश वगैरे.)
तर, अशी ही देशी कंपनी केवळ भारतातच नाही तर, परदेशातही यशस्वी झालीआहे. कॉर्पोरेट क्षेत्रामधील विविध अडचणींना तोंड देत, सर्वसामान्यांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास मिळविणातही यशस्वी झाली आहे.
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
For suggestions and curries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies