आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल?
कोरोना महामारीच्या साथीने जगासोबत भारतीय समाजासमोर सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ते आव्हान पेलवताना, ही साथ आणि तिच्याविषयी निर्माण झालेला संभ्रम हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करण्याचा हा एक प्रयत्न ..
कोरोना : पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही? …
- कोरोनाच्या साथीच्या या अभूतपूर्व अशा संकटाचे पहिल्या पाच महिन्यांनंतर पुढे काय होणार, याविषयी सर्व जगाला कुतूहल आणि चिंता आहे.
- विशेषतः भारतात कडक लॉकडाउन मागे घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या असताना आता आपले दैनंदिन जीवन कसे असेल, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
- कोरोनाची लस सापडेल का, आपल्यापर्यंत यायला तिला किती वेळ लागेल, याची चिंता प्रत्येकाला लागली आहे.
- या पाच महिन्यात व्यवहार आधी मंद आणि नंतर बंद झाल्यामुळे जग, देश आणि वैयक्तिक अर्थकारणावर जो परिणाम झाला आहे, त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
अशा या अभूतपूर्व अशा पार्श्वभूमीवर आणि पुरेशा, नेमक्या माहितीअभावी समाजात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातील काही संभ्रम दूर व्हावेत तसेच त्याला सुसंगत विचाराची दिशा मिळावी, म्हणूनच हे पाच प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची मांडणी –
कोरोना: ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?…
प्रश्न – १. भारतात आता कडक लॉकडाऊन राहणार नाही, पण काही निर्बंध रहातील. याचे वैयक्तिक अर्थकारणावर काय परिणाम होतील?
- अपरिहार्य अशा लॉकडाऊनमध्ये सर्व पातळ्यांवर मोठी आर्थिक हानी झाली आहे. तिचा स्वीकार करून आता आपल्याला पुढे चालावे लागेल.
- बाजारामध्ये काही मोजके अपवाद सोडता कोणत्याच सेवा आणि वस्तूंना पुरेशी मागणी लगेच येणार नाही. त्यामुळे उद्योग व्यवसाय अतिशय कमी क्षमतेने चालतील. याचा अर्थ अर्थव्यवहार रोडावेल.
- आपल्या उत्पन्नावरही याचा परिणाम होईल, जो आपल्याला एक वस्तुस्थिती म्हणून सर्वांना मान्य करावा लागेल.
- मागणीच कमी असल्याने बहुतांश सेवा आणि वस्तूंच्या किंमती कमीच रहातील, त्यामुळे उत्पन्न कमी झाले तरी खर्चही कमी होईल.
- काही अनावश्यक सेवा आणि वस्तूंची खरेदी लांबणीवर टाकल्यास पुढील काही महिने कमी खर्चात आपण आपल्या कुटुंबाच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकू.
- रोजगार मिळविण्यासाठी अनेकांना आता नवी कौशल्ये आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरेल.
जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध
प्रश्न २ – भारतात कडक लॉकडाऊन केल्यामुळे देशाचा फायदा झाला की तोटा? लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नव्हता का?
- सध्याचा कोरोना विषाणू हा जगासाठी पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे त्याच्या साथीची लक्षणे, रुग्णाची काळजी, कशाकशाने प्रसार होऊ शकतो, याविषयी गेले पाच महिने वैद्यकीय जगात एकमत होऊ शकलेले नाही.
- सर्व नामांकित विज्ञान संस्थांनी साथीच्या प्रसाराचे वेगवेगळे अंदाज दिले आणि ते सर्व चुकीचे सिद्ध झाले.
- अशा स्थितीत लोकसंख्येची प्रचंड घनता असलेल्या भारतासमोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नव्हता.
- स्वीडनसारख्या काही मोजक्या देशांनी कडक लॉकडाऊन न करता सार्वजनिक जीवनात एकमेकांपासून अंतर ठेवणे पसंत केले. पण त्यामुळेही साथ आटोक्यात राहिली नाही.
- तेथे २७ मे अखेर चार हजारावर बळी गेले आहेत. पण स्वीडनची लोकसंख्या आहे एक कोटी आणि घनता आहे केवळ २५, तर भारताची लोकसंख्या आहे १३६ कोटी आणि घनता आहे ४२५.
- आपण आपली अशा देशांची तुलना करणे हा मुर्खपणा आहे.
- भारतात लॉकडाऊनमुळे रुग्णांचा आणि मृतांचा आकडा मर्यादित राहिला, हे आता सिद्धच झाले आहे.
- अर्थकारणाचा विचार न करता तो फायदाच झाला, असे म्हटले पाहिजे. पण यापुढे व्यवहार सुरु न झाल्यास त्यातून गरीबांवर जे परिणाम होतील, ते देश म्हणून आपल्या फायद्याचे नसेल. त्याचे समाजजीवनावर अतिशय विपरीत असे परिणाम होतील.
लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल
प्रश्न –३ कोरोना साथीमध्ये समाजात अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हा गोंधळ आपल्याला टाळता आला नसता का?
- १९१८ ची स्पॅनिश फ्ल्यूची साथ सोडली, तर गेल्या १०० वर्षांत एवढी मोठी साथ जगात आलेली नाही. त्यावेळी जगात सुमारे दोन कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. गंगेच्या काठी अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडेही मिळत नव्हती, इतक्या वेगाने त्यावेळी भारतातही मृत्यू झालेले आहेत.
- थोडक्यात, इतक्या वेगाने पसरणाऱ्या साथीचा अनुभव ना सरकारांना होता, ना डॉक्टरांना होता, ना नागरिकांना.
- उत्तम पायाभूत सुविधा असताना अमेरिकेचे सर्वाधिक नागरिक या साथीचे बळी ठरले आहे. असा तुलनात्मक विचार केला तरी हा सर्व गोंधळ मान्य करूनही भारतीय समाज फार संयम, समंजसपणाने सामोरा गेला आहे, हे अधिक महत्वाचे आहे. अपवाद फक्त काही अतिउत्साही माध्यमांचा.
- माणसे मरताहेत, साथ पसरते आहे, याच्या बातम्या आनंदाच्या उकळ्या फुटल्यासारख्या दिल्या गेल्यामुळे घबराट आणि गोंधळ निर्माण झाला. त्यात सोशल मिडीयाने भर घातली.
- सोशल मिडियाचा वापर कसा करावा, याविषयीची परिपक्वता नसल्याने हे झाले. अर्थात, या प्रश्नाला आपल्याला भविष्यातही तोंड द्यावे लागणार आहे.
आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !
प्रश्न – ४ कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर त्याचे नजीकच्या भविष्यावर काय परिणाम होतील?
- कोरोनाचे रुग्ण भारतात आता वाढणारच आहेत. त्यात घाबरण्यासारखे काही नाही.
- या साथीचा प्रसार फार वेगाने होत असला तरी त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी म्हणजे फक्त १.७ टक्के आहे. भारतात तर ते त्यापेक्षाही कमी राहिले आहे.
- मृतांमध्ये प्रामुख्याने वयस्कर नागरिक आणि तेही आधीच काही आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा वयस्कर नागरिकांचे काळजी घेणे, हेच मोठे आव्हान आहे.
- जगात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, त्या वेगाने भारतात पावसाळ्यात संख्या वाढेल, असा अंदाज केला जातो आहे. तो खरा ठरला तरी सरकारने या दोन महिन्यात रुग्णांना सेवा देण्यासाठी मोठी तयारी केली आहे.
- वास्तविक अशी तयारी करण्यासाठीच भारताला लॉकडाऊन करावे लागले आहे. वैद्यकीय सुविधा नसताना कोरोनाचे रुग्ण वाढणे, हे आपल्याला अजिबात परवडणारे नव्हते.
- आता या साथीसह जगणे, हे आपल्याला शिकून घ्यावे लागेल. स्वाईन फ्ल्यू आणि अशा अनेक साथीवर लस सापडली नाही, पण म्हणून जग थांबलेले नाही, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.
संकटकाळातील आर्थिक नियोजन
प्रश्न ५ – कोरोनामुळे झालेली आर्थिक हानी कशी आणि कधी भरून काढणार?
- गेले काही वर्षे भारताने प्रचंड स्थर्य अनुभवले आहे. त्यामुळे आर्थिक हानीविषयी आपण सर्वच प्रचंड अस्वस्थ झालो आहोत.
- मानवी आयुष्याचे पैशीकरण झालेले असल्याने ही अस्वस्थता समजण्यासारखी असली तरी या हानीचा शक्य तितक्या लवकर स्वीकार करणे, एवढेच आपल्या हातात आहे.
- ही साथ अजून किती हानी करणार, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतीय समाजाने जो समंजसपणा दाखविला, त्याचीच पुढे गरज आहे.
- सुदैवाने सरकारी यंत्रणा या संकटाचा मुकाबला करण्यासाठी त्या त्या वेळी योग्य असा प्रतिसाद देताना दिसते आहे.
- सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज आणि जागतिक व्यासपीठावर भारताला यानिमित्त आलेली संधी जर आपण घेवू शकलो, तर भारत या संकटावर चांगल्या पद्धतीने मात करील. पण त्यासाठी या काळात देशाला टोकाचे राजकारण बाजूला ठेवावे लागेल आणि एक देश म्हणून अतिशय वेगळा विचार करावा लागेल.
- कोट्यवधी मजूर आणि गरीब नागरिकांना अन्नपाणी देण्यासाठी सरकारसोबत समाज उभा राहिला आणि हानी शक्य तेवढी कमी ठेवण्यात जे भारतीय मानस दिसले, त्याचीच यापुढेही गरज आहे.
- मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक विषमता असलेल्या आपल्या देशासमोर हे फार मोठे आव्हान आहे.
- जुनाट आणि पाश्चिमात्य विचारांचे अनुसरण कमी केले आणि विकासाच्या फळांचे वितरण करणाऱ्या नव्या काळाशी सुसंगत अशा समन्यायी व्यवस्थेविषयी सहमती घडवून आणल्यास, या संकटानंतर एक समृद्ध भारत आपल्याला पाहायला मिळेल.
कोरोना – संभ्रम निर्माण करणाऱ्यांनो देशाची माफी मागा !
– यमाजी मालकर
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies