वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र
वॉरेन बफेट या यशस्वी गुंतवणूकदाराने दिलेला गुरुमंत्र लक्षात ठेवण्याची हीच वेळ का आहे?
कोरोना संकटात भारतासह जगभरातील शेअर बाजारांनी उत्तम परतावा दिला आहे. तीन महिने जग बंद असताना मिळणारा हा परतावा तोंडात बोट घालायला लावणारा आहे. अशा परताव्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात येणाऱ्या गुंतवणूकदारांनी जर गुंतवणुकीची शिस्त पाळली नाही तर या परताव्याचे मोठ्या हानीत रुपांतर होण्यास वेळ लागत नाही.
घरबसल्या उघडा डीमॅट अकाउंट
वॉरेन बफेट: शिस्तबद्ध गुंतवणूकदार –
- गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांना सध्याच्या शेअर बाजाराचा कल ओळखता आला नाही, तर आपल्याला काय येणार, असे आपण म्हणू शकतो. कारण कोरोनाच्या संकटात जगभरातील शेअर बाजार ४० ते ५० टक्के आपटले आणि अवघ्या तीन महिन्यात ते ३५ टक्के वर आले.
- या रॅलीत बफेट यांनी भाग घेतला नाही, म्हणून बफेट यांना शेअर बाजारातील कळत नाही, असे आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही.
- बफेट यांचे वय आहे ८९ आणि आपले? आपण तर खूपच तरुण पिढीचे आहोत. त्यामुळे जगातील पहिले दोन तीन श्रीमंत कोण, या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला गेले दोन दशके ज्यांचे नाव टाळता आले नाही, त्या बफेट यांचे नाव आपण घेण्याचे काही कारण नाही.
- बफेट यांनी सोन्यात गुंतवणूक केली नाही, पण सोन्याने गेल्या वर्षांत चांगला परतावा दिला.
- बफेट यांनी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळले, पण जगात गेले दोन दशके आयटी कंपन्या मोठा परतावा देत आहेत.
- याचा अर्थ बफेट यांना शेअर बाजाराची चाल कळली नाही, असा होत नाही.
- बफेट हे शिस्तबद्ध गुंतवणूकदार आहेत. त्यांनी आयुष्यभर ती शिस्त पाळली. हाच आहे त्यांचा गुरुमंत्र! त्यांचा गुणगौरव केला जातो, तो त्यासाठी. केवळ तात्कालिक चढउतारावर स्वार होण्यासाठी नव्हे!
तीन महिन्यातल्या अभूतपूर्व घटना –
- गेले तीन महिने जे जगाच्या शेअर बाजारांत झाले, तेच भारतीय शेअर बाजारात झाले.
- २३ मार्च रोजी लॉकडाऊन लावले गेले तेव्हा एका महिन्याने जग पूर्वीसारखे सुरु होईल, असे आपल्यापैकी अनेकांना वाटत होते. पण पुढे दोन महिने जग जवळपास बंद होते.
- आश्चर्य म्हणजे याकाळात शेअर बाजार एकही दिवस बंद नव्हता. पण लॉकडाऊनचा फटका त्यालाही बसला होता.
- जगाचे व्यवहार या पद्धतीने दीर्घकाळ बंद राहू शकत नाहीत, हे शेअर बाजाराला माहीत होते. त्यामुळे लॉकडाऊनने केलेल्या आर्थिक हानीकडे कानाडोळा करत शेअर बाजाराची चाल वेगवान झाली. आणि नाही, नाही म्हणता त्याने तब्बल ३५ टक्के मजल मारली.
- जगातील सर्वच शेअर बाजारांनी कोरोना संकटाकडे दुर्लक्ष करून अशी मजल मारली आहे. पण त्यातही भारतीय शेअर बाजाराने आघाडी घेतली आहे.
- या काळात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे –
- रिलायन्स इंडस्ट्रीजने मिळविलेली सुमारे १.५ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक,
- देशाच्या तिजोरीतील विक्रमी परकीय चलनाचा साठा,
- सरकारने २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या मार्गाने केलेली पतपुरवठ्याची पेरणी,
- मॉन्सूनने पहिल्या महत्वाच्या महिन्यात दिलेली उत्तम साथ,
- कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागात लवकर सुरु होऊ शकलेली शेतीची कामे आणि त्यावर अवलंबून असलेला निम्मा भारत आणि हो, सर्वात महत्वाचे
- गुंतवणूक म्हणून ज्यांनी अजून शेअर बाजाराचे नावही घेतले नव्हते, अशा लाखो वेळ आणि पैसा असलेल्या भारतीयांनी शेअर बाजाराकडे वळविलेला मोर्चा.
- अशा सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे भारतीय शेअर बाजाराने दिलेला घसघशीत परतावा.
- केवळ भारताच्या म्हणून ज्या गोष्टी आहेत, त्या भारतीयांना कळेनात, त्या वॉरेन बफेट यांना कशा कळतील? खरे म्हणजे त्या कोणालाच कळण्याच्या पलीकडच्या आहेत!
गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे
शेअर बाजाराचे सूत्र
- उत्तम परतावा मिळाला म्हणून जे शेअर बाजाराकडे आकर्षित होतात, ते आधी स्वत:चे नुकसान करून इतरांना कमाई करण्यासाठीच बाजारात उतरलेले असतात.
- शेअर बाजार ज्या वेगाने वाढतो, त्याच वेगाने तो घसरतो, याचे भान त्यांना आलेले नसते.
- आजूबाजूचे सर्व व्यवहार मंद झाले असताना शेअर बाजार वाढतो आहे, याचा अर्थ त्याचा कोठेतरी कडेलोट होणार आहे, हे नक्की. आणि तो कधी, हे मात्र कोणीच सांगू शकत नाही.
- पण मग, एवढे सारे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना आपण काठावरच बसायचे का? शेअर बाजारातून आपण पैसा कमवायचा नाही का?
- या प्रश्नाचे उत्तर आहे, आपणही शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. पण त्यासाठी त्याला आधी समजून घेतले पाहिजे.
- सर्वात जास्त जोखीम असलेल्या दैनंदिन ट्रेडिंगच्या वाट्याला जाऊ नये.
- आपल्याला ज्या कंपन्यांचा व्यवसाय माहीत आहे, त्या कंपन्यांत दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे.
- ही जोखीमही नको वाटत असेल तर म्युच्युअल फंडाच्या मार्गाने आपली गुंतवणूक त्या त्या कंपन्यांच्या फंड व्यवस्थापकाच्या हाती दिली पाहिजे. आणि येथेच वॉरेन बफेट आपले गुरु ठरतात.
वॉरेन बफेट यांचे यशस्वी गुंतवणुकीचे सूत्र
वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र
- ज्या कंपनीचा शेअर कधीही विकण्याची वेळ येणार नाही, अशा कंपनीतच गुंतवणूक करा, असे वॉरेन बफेट सांगतात.
- या एका मंत्रावर बफेट श्रीमंत झाले. केवळ श्रीमंत झाले नाहीत, तर समृद्ध आयुष्यही जगले.
- आपण श्रीमंत झालो, म्हणजे उतमात करायला मोकळे झालो, असे त्यांनी कधी मानले नाही.
- अर्थात, त्यांचे हे गुरुपण एका दमात आपल्याला झेपणारे नाही.
- शेअर बाजारातील गुंतवणूक आणि एकूणच वेगाने बदलत चाललेले जग समजून घेण्यासाठी आपल्याला हा संवाद असाच सातत्याने सुरु ठेवावा लागेल.
महत्वाची आकडेवारी
१.३४ अब्ज –
जून २०२० महिन्यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) वर झालेले एकूण व्यवहार, आतापर्यंतचे सर्वोच्च. (१.३२ अब्ज कोरोनापूर्वीचे व्यवहार – फेब्रुवारी २०२०)
५०० अब्ज डॉलर्स –
भारताकडील परकीय चलनाचा विक्रमी साठा. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशियानंतरचा जगातील सर्वोच्च – जगात पाचवा कमांक
५ कोटी –
गेल्या आर्थिक वर्षात वेटिंग लिस्ट तिकीट मिळाल्यामुळे रेल्वेचा प्रवास करू न शकलेल्या प्रवाश्यांची संख्या
३०,००० कोटी रुपये –
१०९ मार्गांवर १५० खासगी रेल्वे चालविण्यासाठी खासगी कंपन्या एप्रिल २०२३ पर्यंत करणार असलेली गुंतवणूक.
३५.२ टक्के –
भारतीय शेअर बाजाराने गेल्या तीन महिन्यात दिलेला परतावा.
Delisting – समभाग नोंदणी रद्द करणे म्हणजे काय?
इकडे लक्ष द्या –
- चांगल्या मॉन्सूनमुळे आणि सरकारने केलेल्या अतिरिक्त तरतुदीमुळे शेती क्षेत्राची चांगली वाढ अपेक्षित असल्याने त्या क्षेत्राशी संबधित कंपन्यांचा व्यवसाय वाढणार आहे.
- डिजिटल व्यवहार वाढतच चालले असल्याने त्या सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवा.
- ऑनलाईनचे महत्व यापुढेही वाढणार असल्याने डेटा पुरविणाऱ्या तसेच मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या बाजी मारणार आहेत.
- आणि जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या कंपन्या नेहमीच चांगल्या मानल्या जातात, पण त्यांचे मूल्य आधीच वाढले असल्याने त्यांच्यावर पुढील काळात लक्ष ठेवा.
– यमाजी मालकर
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies