Reading Time: 4 minutes
आयकर (Income Tax) म्हणजे काय?
- विशिष्ट रकमेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या उत्पन्नाचा ठराविक हिस्सा सरकार तिजोरीत जमा करवा लागतो. आपल्या उत्पन्नाचा कर स्वरुपात, सरकारकडे जमा केलेला पैसा म्हणजेच ‘आयकर’.
- लोकांकडून त्यांचा कमावलेला पैसा घेण्यामागे सरकारचे महत्वाचे दोन उद्देश आहेत. एकतर लोकांनी भरलेला हा कराचा पैसा सरकारचं उत्पन्न (Revenue) आहे, हा पैसा विविध योजनांवर आणि विकास कार्यांवर सरकारकडून खर्च केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे संपत्तीच्या समान वाटपाचे उदिष्ट साधले जाऊन गरीब श्रीमंत दरी घटण्यास मदत होते.
करबचत (Tax Saving) म्हणजे काय?
- आपले खरे उत्पन्न न दाखवता बनावट नोंदीतून करापासून सुटका मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असे कराच्या चोरीचे गुन्हे शिक्षेस पात्र असतात. मग करबचत म्हणजेही कराची चोरीच आहे का? तर नाही!
- करबचत ही कराची चोरी नसून सामान्य माणसाचा कर वाचावा व त्याला कमीतकमी कर भरावा लागावा यासाठीचा एक कायदेशीर मार्ग आहे.
- व्यक्तीच्या वाढणाऱ्या गरजा आणि त्यांवर होणारा खर्च पाहता, सरकारकडे भरावा लागणारा कर सामान्य माणसाच्या आर्थिक नियोजनावर ताण निर्माण करतो. मोठ्या शहरांमध्ये वाढणाऱ्या गरजा आणि त्यावर होणारा खर्च, भविष्याच्या नियोजनासाठी पैशांची गुंतवणूक, शिक्षणासारख्या गरजांवर होणारा मोठा खर्च,इत्यादी सारे खर्च अपरिहार्य असतात.
- सर्व कर वगळून हातात खर्चासाठी येणारं उत्पन्न (Disposable Income) या सर्वांपुढे अपुरं वाटू लागतं. यातून लोकांनी कर चोरी किंवा इतर बेकायदेशीर मार्गांकडे जाऊ नये. कर वाचावा म्हणून विचारी आणि कायदेशीर मार्गाने करबचत करता येणे सहज शक्य आहे.
लोकांच्या करबचतीचा सरकारला फायदा काय?
- कोणत्याही देशाचा आर्थिक आराखडा केवळ लोकांचा फायदा आणि सरकारचा नुकसान या तत्वावर चालू शकत नाही. करबचत करण्यामागे व्यक्तींबरोबरच सरकारचाही फायदा असतो. तो कसा हे समजून घेताना लोकांच्या उत्पन्नाचा मोठा भाग गुंतवणुकीत असावा हे एक साधं आर्थिक गृहीतक आहे.
- उत्पन्नतील सेव्हिंग अर्थात बचतीचा वाटा बँकांमध्ये जास्त प्रमाणात जमा केला जाईल. पुढे ही बचत बँका, गुंतवणूक म्हणून विविध उद्योग आणि धंद्यांना भांडवलाच्या रुपात देऊन त्यांना चालना मिळेल म्हणून लोकांनी आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग बचतीच्या स्वरुपात बँकांमध्ये जमा करावा. अर्थात यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते.
- बचतीला चालना देण्याच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे करबचत’. यामधून आपला कर वाचवण्याच्या हेतूने लोक गुंतवणुकीकडे वळतील, लोकांमध्ये बचतीची सवय रुजेल आणि यामधून सरकारचाही हेतू साध्य होईल.
करबचतीसाठी फिक्स्ड डिपॉझिटच का?
- भविष्याची उपाययोजना म्हणून बचतीचे विविध मार्ग उपलब्ध असताना मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिटच कशासाठी? हा प्रश्न पडतो.
- याचं कारण असं की बचत किंवा इतर ठेवी अत्यंत अल्प मुदतीच्या असतात. कधीही पैसे काढून घेण्याची सोय त्यात असल्यामुळे या ठेवींमध्ये अनिश्चितता असते. या ठेवी दीर्घ मुदतीसाठी नसल्याने त्याचा बँकांनाही फारसा फायदा होत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही कमी मोबदला मिळतो.
- यावर पर्याय म्हणून करबचतीसाठी एफ.डी (FD) हा उत्तम पर्याय असतो. आपला कर वाचवण्यासाठी लोक या दीर्घकाळ ठेवींचा वापर करतील ज्यातून व्यक्ती आणि बँका दोघांनाही फायदा होईल.
करबचतीचे विविध मार्ग
- भारतीय आयकर कायदा, १९६१ मधील कलम ८०(सी) नुसार कोणताही करदाता ‘कर बचत मुदत ठेव’ (टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट) स्वरुपात आपल्या एकूण उत्पन्नावरील करात दीड लाखापर्यंत रकमेची घट मिळवू शकतो. करबचत (tax save) करण्यासठी काही मुलभूत गोष्टींची माहिती असणे मात्र आवश्यक आहे. त्याकरिता ‘टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (एफ.डी)’ बद्दल काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे-
- केवळ व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- एफ.डी. करता जमा करावयाची किमान रक्कम बँकानुसार वेगवेगळी असते.
- रकमेवर मिळणारा व्याजदर ५.५% ते ७.७५% पर्यंत असू शकतो. एफ.डी.च्या रकमेवर जेष्ठ नागरिकांना मिळणारा व्याजदर हा सामान्य नागरिकांपेक्षा बऱ्याचदा जास्त मिळतो.
- ही रक्कम पाच वर्षांच्या ठराविक मुदतीसाठी असते.
- मुदतपूर्व पैसे काढण्याची किंवा रकमेवरती कर्ज घेण्याची कोणतीही सोय या योजनेअंतर्गत नाही.
- सहकारी आणि ग्रामीण बँका वगळता इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील बँकेत या प्रकारच्या एफ.डी.ची गुंतवणूक केली जाऊ शकते.
- पोस्ट ऑफिसची पाच वर्षांची मुदत ठेव देखील भारतीय आयकर कायदा, १९६१ मधील कलम ८०(क) अंतर्गत कर घट करण्याच्या योजनेसाठी पात्र आहे. हे मुदत ठेव खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करता येऊ शकते.
- या एफ.डी. वैयक्तिक किंवा जोड खात्यांच्या स्वरुपात करता येतात. जोड खात्याच्या संदर्भात मात्र करलाभ केवळ प्रथम खातेदाराच मिळतो.
- एफ.डी.च्या व्याजावर गुंतवणूकदाराच्या करसंचाप्रमाणे कर आकारला जातो, त्यामुळे टी.डी.एस. लागू होतो. रकमेवरील व्याज पुन्हा गुंतवले (रीइनव्हेस्ट) जाऊ शकते. मिळवलेल्या व्याजावरील टी.डी.एस. कपात होऊ नये म्हणून १५G (जेष्ठ नागरिकांसाठी १५H) हा फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागतो.
- सदर योजना वारस सुविधा (नॉमिनी) उपलब्ध करून देते
कर घटवण्यासाठी टॅक्स सेव्हिंग एफ.डी. (FD) शिवायाही अन्य कोणता मार्ग आहेत?
- होय. आपला करात घट करण्यासाठी टॅक्स सेव्हिंग एफ.डी.शिवाय किंवा त्यापेक्षाही फायदेशीर मार्ग अस्तित्वात आहेत. वरील प्रकारात आपला कर घटवण्यासाठी बचतीचा मार्ग अवलंबला जातो खरा पण त्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एकूण उत्पन्नात जमा होऊन त्यावरही कर बसतोच.
- एफ.डी.च्या व्याजावही टी.डी.एस. च्या रूपात कर आकाराला जातोच. त्यामुळे ही योजना करमुक्त नाही. तर मग असा कोणता उपाय आहे, ज्यामुळे व्यक्ती करमुक्त गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकते? कर बचतीचा अजून एक सोपा मार्ग उपलब्ध आहे. ज्याला म्हणतात ‘कर विरहित गुंतवणूक’(Investment with tax free returns). तुमची गुंतवणूक कराच्या जाळ्यात न अडकता तुम्हाला मोबदलाही मिळू शकतो आणि या प्रकारच्या गुंतवणुकींना कर विरहित गुंतवणूक म्हणतात. कर विरहित गुंतवणुकींचा लाभ देणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे :
१. सुकन्या सामुद्धी योजना:
- सर्वात जास्त मिळकत म्हणजेच ८.१% इतका कर विरहित मिळकतीचा लाभ या योजनेद्वारा होतो.
- परंतु यासाठी गुंतवणुकीचा कालावधी फार जास्त म्हणजे २१ वर्षे इतका आहे, हा मात्र या योजनेचा तोटा आहे.
२.बचत खाते:
- रु. १०,०००/- मर्यादेपर्यंतच्या गुंतवणुकींवरील व्याज करमुक्त असते.
- रु. १०,०००/- च्या वरील गुंतवणुकीवर ३.५%व्याजदर मिळतो. मात्र यावर कर आकाराला जातो.
३. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड:
- यामध्ये ७.८% व्याजदर मिळतो. मिळणारे व्याज करमुक्त आहे.
- परंतु दीर्घ मुदतीची ही योजना १५ वर्षांच्या कालावधीसाठी असते.
कमी कालावधीत जास्त व्याज दर मिळवून देणारे ई.एल.एस.एस.म्युचुअल फंड-
- कर बचतीसाठी एफ.डी. व्यतिरिक्त इतर काही मार्ग आहेत ज्याच्या सहायाने तुम्ही कमीत कमी मुदतीत जास्त व्याजदर मिळवू शकता. ई.एल.एस.एस.म्युचुअल फंड हा त्यातला एक सर्वात फायदेशीर उपाय.
- ही योजना दुहेरी फायदा देते. एकतर सर्वात कमी मुदतीसाठी म्हणजेच केवळ ३ वर्षांसाठी ही ठेव ठेवता येते आणि दुसरीकडे जास्तीतजास्त टॅक्स फ्री व्याजदराचा मोबदलाही मिळतो.
वरील सर्व योजना करबचत, गुंतवणूक आणि बचत यांचा संगम आहेत. यामध्ये करबचतीबरोबरच तुमची गुंतवणूकही सुरक्षित राहते.त्यामुळे गुंतवणूक करताना या योजनांचा नक्की विचार करा.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2OFHPwQ )
Share this article on :