Reading Time: 3 minutes

अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यातही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगावा, अशी दमदार वाटचाल भारताने केली आहे. या वाटचालीचे एक देश म्हणून आकलन केले तर ही वाटचाल निश्चितच अचंबित करणारी आहे. 

 

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्या मनात देशाच्या वाटचालीविषयीच्या काय भावना आहेत, याला अतिशय महत्व आहे. आपण जेव्हा देशाविषयी बोलतो, तेव्हा देशात ७५ वर्षे ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाहीत, याचा पाढा वाचतो. गेल्या ७५ वर्षांत खूप काही व्हायला पाहिजे होते, याविषयी दूमत असण्याचे कारण नाही. पण देशाच्या या वाटचालीकडे देश कोठे होता आणि आज कोठे आहे, याचा वस्तुस्थिती समोर ठेवून विचार केल्यास भारताने मोठी झेप घेतली आहे, हे लक्षात येते. भारतात एक देश म्हणून आणि भारतीय म्हणून आपल्या सर्वांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, मात्र त्या अजून पूर्णपणे वापरल्या गेल्या नाहीत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त त्या सर्व क्षमता यापुढे आम्ही वापरू असा संकल्प निश्चितच केला जाऊ शकतो. 

 

प्रतिभेला स्थर्याची जोड 

परवा एक बातमी प्रसिद्ध झाली. पंढरपूरला एकेकाळी उसाची शेती करणारे वैष्णवीप्रसाद रानडे हे सध्या कल्याण येथे रेल्वे रेजिमेंटमध्ये अभियंता आहेत. उसाचा ट्रॅकटर चढावर त्याच्या ब्रेकवर उभे राहून चालकाला नियंत्रित करावा लागत होता, हे त्यांनी पाहिले होते. त्यांनी ही अडचण लक्षात ठेवून संशोधन केले आणि अँटी रोल डाऊन मॅकनिझमसाठी पेटंट मिळविले. चढावर गाडी मागे जाणार नाही, असे तंत्र त्यांनी विकसित केले. असे पेटंट घेणारे पाश्चिमात्य संशोधकही स्पर्धेत होते. पण ते टिकले नाहीत, कारण पाश्चिमात्य संशोधकांनी त्यासाठी सुमारे १०० सुटे भाग वापरले होते, तर रानडे यांनी केवळ सहा सुट्या भागात हे तंत्र विकसित केले होते. त्यामुळे रानडे यांना अखेर पेटंट मिळाले. ही बातमी महत्वाची यासाठी आहे की भारतात असलेले गुंतागुंतीचे पश्न आणि त्याला सोडविण्यासाठीची भारतीयांमध्ये असलेली प्रतिभा यातून दिसते. अलीकडच्या काळात भारतीय समाजही पोटापाण्याच्या प्रश्नांतून बाहेर पडला असून त्याला आपली प्रतिभा वापरण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होते आहे, याचे हे एक छोटे उदाहरण आहे. 

 

ही अतिशोयोक्ती नव्हे 

प्रतिभेला आर्थिक समृद्धीची जोड मिळाली तर देश मोठी झेप घेवू शकतो. त्यामुळे आर्थिक विकासात आपण कोठे आहोत, हे पाहणे या निमित्ताने फार महत्वाचे आहे. आपली आजची आर्थिक समृद्धी युरोप अमेरिकेपेक्षा कमी आहे, हे तर सर्व जण जाणतात, पण आपला प्रवास कोठून कोठे झाला आहे, हे जाणून घेतले तर आपल्याला या वाटचालीचा निश्चितच अभिमान वाटला पाहिजे. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जी आकडेवारी देशासमोर ठेवली जाते, त्यातून अशा अनेक संदर्भातून अशी काही आकडेवारी एकत्र केली असता भारताची गेल्या ७५ वर्षांतील झेप अचंबित करणारी आहे. यातील काही आकडे ते आपल्याला अतिशोयोक्ती केल्यासारखे वाटू शकतात. पण ती वस्तुस्थिती आहे. त्यातील काहीच आकड्यांचा येथे आपण विचार करू यात. 

 

दुर्लक्ष करता येणार नाही, असे आकडे 

भारतीयांचे १९५० मध्ये दर माणशी राष्ट्रीय उत्पन्न  केवळ २६५ रुपये रुपये होते, ते आज दीड लाख रुपये आहे. भारताचा जीडीपी १९६० मध्ये  ०.०४ ट्रीलीयन डॉलर होता, जो आज ३.१८ ट्रीलीयन डॉलर इतका आहे. महत्वाचे म्हणजे तो जगातील १९२ देशांमध्ये पाचव्या क्रमांकाचा आहे. १९६० मध्ये जीडीपीच्या टक्केवारीत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वाटा ११.३ टक्के होता, तो २०१५ मध्ये ५५ टक्यांवर गेला होता. सध्या तो ४० टक्के आहे. १९५१ ला रेल्वेने ४० लाख प्रवासी प्रवास करत होते, आज २.३ कोटी नागरिक रेल्वे प्रवास करतात. भारतातील रेल्वे नेटवर्क जगातील चौथ्या तर रोड नेटवर्क दुसऱ्या क्रमांकाचे आहे. १९५१ मध्ये मोटारींची संख्या ३० हजार होती, ती आज ३० कोटी झाली आहे. १९९५ मध्ये विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या ३७ लाख होती, ती २०१८ मध्ये ३.५० कोटी झाली आहे. १९५१ मध्ये ४.८ दशलक्ष टन अन्नधान्याची आयात करावी लागत होती, तर २०२० मध्ये आपण ५.९ दशलक्ष टन अन्नधान्याची निर्यात केली आहे. दूध आणि साखर उत्पादनात जगात पहिला क्रमांक तर गहू आणि तांदूळ उत्पादनात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. १९५१ मध्ये सरासरी आयुष्यमान केवळ ३७ वर्षे होते तर आता ते ७० वर्षे झाले आहे. साक्षरतेचे प्रमाण १९५१ मध्ये १८.३ होते, जे आज ७७.७ टक्के झाले आहे. याकाळात आपली लोकसंख्या दुप्पट झाली. या पार्श्वभूमीवर ही कामगिरी आपण केलेली आहे. 

 

लोकसंख्येची घनता अधिक असूनही 

काही आणखी आर्थिक निकष पाहू यात. भांडवली बाजाराला (शेअर बाजार) जगात अतिशय महत्व आले आहे. भारताचा भांडवली बाजाराचे मूल्य आज ३२१ अब्ज डॉलरवर पोचले आहे आणि पाच हजार २१५ कंपन्या म्हणजे जगात सर्वाधिक कंपन्या लिस्ट झालेल्या आहेत. सध्या ग्रीन एनर्जीचा बोलबाला आहे. त्यासाठीच्या उभारणीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठे सोलर एनर्जी पार्क (१४ हजार एकर) राजस्थानात भादला येथे उभे राहिले आहे. जगातील साडेतीन टक्के पर्चेसिंग पॉवर बाळगून असलेला आपला देश आहे. परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलरच्या घरात असून तो जगात चौथ्या क्रमांकाचा आहे. सोने घराघरात इतके असावे का, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी आज २१००० टन सोने आपल्याकडे आहे. अशी ही आकडेवारी सांगते की गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण मोठी मजल मारली आहे. त्याचा आणखी एक महत्वाचा पैलू आपल्याला विसरता येणार नाही. तो म्हणजे आपली १४० कोटी लोकसंख्या आणि तिची घनता. आपला देश जगात सातव्या क्रमांकाचा मोठा असला तरी प्रति चौरस किलोमीटरला भारतात ४२५ लोक रहातात. लोकसंख्येची ही घनता अधिक मानली जाते. कारण आपण आपली ज्या प्रगत देशांशी तुलना करतो अशा अमेरिकेची ३३, रशिया ९, चीन १४५, ऑस्ट्रेलिया ९ अशी आपल्यापेक्षा खूपच कमी घनता आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा प्रवास निश्चितच अभिमानास्पद आहे. 

 

लोकशाहीचे रक्षण 

भारत हा सध्या टेक ऑफ स्टेजमध्ये आहे, असे का म्हटले जाते, हेही जाणून घेतले पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक महत्वाचा मानला गेलेला घटक म्हणजे तरुणांची संख्या. ती ५५ कोटींच्या घरात आहे. माहिती तंत्रज्ञानात तरुण करत असलेल्या कामगिरीमुळे जगाची बाजारपेठ भारताला मिळते आहे. जगाने स्वीकारलेल्या इंग्रजी भाषेत पारंगत तरुण भारतात सर्वाधिक आहेत. चीनच्या कारवाया जगात वादग्रस्त ठरत असल्याने भारतातील उत्पादनांची मागणी जगभर वाढू लागली असून गेल्या वर्षी निर्यातीचा उच्चांक हा त्याचाच पुरावा म्हटला पाहिजे. कोरोनामधून तुलनेने लवकर करून घेतलेली सुटका आणि अर्थव्यवस्थेने घेतलेला वेग, यामुळे भारताच्या अर्थकारणाला जगात अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यात भारतीयांनी केलेले लोकशाहीचे रक्षण ही तर भारताची अमूल्य अशी कमाई आहे.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.