कमी भागभांडवल असलेल्या कंपन्यांचे शेअरचे भाव कमी कालावधीसाठी वाढवून नवे, भोळे गुंतवणूकदार आत आले की ते विकून फायदा घेवून मोकळे व्हायचे, असे प्रकार शेअर बाजारात नेहमीच घडतात. असेच एक प्रकरण अलीकडे सेबीने समोर आणले असून संबधितांवर आरोप दाखल केले आहेत. अशा प्रकारात आपण अडकणार नाही, याची काळजी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घेतली पाहिजे. ती काळजी म्हणजे हे प्रकरण समजून घेणे होय.
[email protected]
यमाजी मालकर
सोशल मिडीयाचा खुबीने वापर करून अल्पावधीत प्रसिद्ध होण्याचा धंदा जसा जोरात आहे तसेच श्रीमंत
होण्यासाठीचे नवनवे मार्ग त्यामार्फत काढले जात आहेत. चांगली कामे समाजात रुजविण्यासाठी आणि नव्या गोष्टी घरी बसून शिकण्यासाठी सोशल मिडीयाचा मर्यादित वापर अपरिहार्य ठरला आहे, हे मान्य केले पाहिजे. मात्र अनेकदा त्याचा अतिरेकच पाहायला मिळतो आहे. आर्थिक क्षेत्रात तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतके बदल होत आहेत की त्याचा वापर करून साध्याभोळ्या गुंतवणूकदारांना फसविणारे ठगही त्यात घुसले आहेत. अलीकडेच सेबीने उघडकीस आणलेला फसवणुकीचा प्रकार शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना माहीत हवाच. अशा प्रकारांमध्ये आपण अडकणार नाही, अशी काळजी घेण्यासाठी हे आवश्यक आहे.
चार चॅनेल्सच्या मदतीने हेराफेरी
शेअर बाजारातील गुंतवणूक आणि एकूणच गुंतवणुकीविषयीची जागरूकता आपल्या समाजात वाढली आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच अशा गुंतवणूकदारांची संख्या विक्रमी १० कोटींवर गेली आहे. पण त्याचाच फायदा घेऊन नव्या गुंतवणूकदारांना कसे गंडविले जाते, हे या घटनेत पाहायला मिळते. कोणते शेअर घ्यावेत, याचा सल्ला देणारे युट्यूब चॅनेल्सची सध्या चलती आहे. अशाच चार चॅनेल्सच्या मदतीने ही हेराफेरी प्रत्यक्षात आली. द अॅडव्हायझर, मनीवाईज, प्रॉफीट यात्रा आणि मिडकॅप कॉल ही ती चार चॅनेल्स. मनीष मिश्रा नावाचा सल्लागार या सर्व चॅनेल्सशी संबंधित आहे. त्याने एवढा प्रभाव निर्माण केला होता की द अॅडव्हायझरचे ८.२४ लाख तर मनीवाईजचे ७.६८ लाख सभासद झाले होते. शार्पलाईन ब्रॉडकास्ट आणि साधना ब्रॉडकास्ट या एकाच क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपन्यांचा त्यात समावेश आहे. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध नट अर्शद वर्शी, त्याची पत्नी मारिया गोर्टी आणि त्याचा भाऊ इक्बाल वर्शी यांची नावे या प्रकरणात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण कमी काळात दामदुप्पट पैसा मिळत असेल तर कोणाला नको असतो? त्यामुळे या नटालाही तो मोह आवरलेला दिसत नाही. या सर्वानी मिळून नेमके काय केले, हे बारकाईने पाहिले आणि समजून घेतले पाहिजे. म्हणजे असा प्रकार आपल्यापर्यंत आला तर आपण त्याला बळी पडणार नाही.
हेही वाचा- शेअरबाजारः ज्ञानी, अज्ञानी, आणि अदानी..
प्रमोटर्सचा ठगगिरीरीत सहभाग!
हा सारा प्रकार सुरू झाला तो गेल्या वर्षी एप्रिलमध्ये. शार्पलाईन ब्रॉडकास्ट आणि साधना ब्रॉडकास्ट या
दोन्ही कंपन्यांच्या प्रमोटर्सनी इतर काही शेअरहोल्डरसोबत कंपनीचे शेअर विकत घेण्यास सुरवात केली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये हालचाल सुरु झाली. शेअर्सची किंमत वाढू लागली. त्या पाठोपाठ २० मे २२ मिडकॅप कॉलवर पहिला व्हिडीओ प्रसारित झाला, ज्याला ३५ लाख दर्शक मिळाले. शार्पलाईन ब्रॉडकास्ट ही कंपनी अदानी ग्रुप घेणार आहे, तिला ओटीटी लायसन मिळाले आहे आणि अनेक नवी चॅनेल्स सुरु होणार आहेत. एवढेच नव्हे तर कंपनी झी आणि सोनी कंपनीशी काही चित्रपट निर्मितीविषयी करार करत असून त्यातून कंपनीला २५० कोटी रुपये मिळणार आहेत, अशी खोटी माहिती त्यात प्रसारित करण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रमोटर्स शेअर्स खरेदी करत आहेत, हेही दाखविण्यात आले. प्रमोटर्स शेअर खरेदी करत असतील तर त्या कंपनीत काही चांगले बदल होत आहेत, असे गृहीत धरले जाते आणि गुंतवणूकदार ते शेअर घेण्यास प्रवृत्त होतात. त्या समजाचा उत्तम वापर यात करण्यात आला. हाच व्हिडीओ तीनच दिवसात प्रॉफीट यात्रावर दाखविण्यात आला, ज्याला तब्बल ७१ लाख दर्शक मिळाले. या दोन्ही ठिकाणी हे व्हिडीओ आळीपाळीने पुन्हा दाखविण्यात आल्याने कंपनीचे शेअर विकत घेण्याची जणू स्पर्धाच लागली. पूर्वी या शेअरची किंमत २३.४२ रुपये होती, ती एका दिवसात ३२.९२ रुपये झाली! याचा अर्थ जे व्हिडीओ पाहत होते, ते शेअर घेवू लागले होते. जूनमध्ये म्हणजे अवघ्या एका महिन्यात हा शेअर ५३ रुपयांवर जाऊन पोचला, म्हणजे दुपटीहून अधिक! म्हणजे ज्या कंपनीच्या शेअरची खरेदी विक्री लिस्टिंग झाल्यावर सहा महिने अजिबात होत नव्हती, त्या कंपनीचा शेअर घेण्यासाठी आता चढाओढ लागली होती. साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या शेअरच्या बाबतीतही कमीअधिक फरकाने सर्व काही असेच झाले, एवढेच नव्हे तर त्यातील बहुतांश लोक सारखेच आहेत. याचा अर्थ या सर्वानी ही ठगगिरी अगदी ठरवून केली आहे.
हपापाचा माल गपापा
नवीन गुंतवणूकदार शेअर चढ्या भावाने घेत होते आणि ज्यांनी हे कुभांड रचले होते, त्यांची शेअर विकण्याची हीच वेळ होती. त्यांनी शेअर विकण्याचा सपाटा लावला. काही काळाने शेअरची किंमत अर्थातच खाली खाली येत गेली. पहिला व्हिडीओ येण्याआधी ज्यांनी ज्यांनी या कंपनीचे शेअर ठरवून मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते, त्यातच वर्शी मंडळींचा समावेश होता. त्यातून त्यांना ७१ लाख रुपयांचा फायदा झाला, असे सेबीने आरोपपत्रात म्हटले आहे. तर जे पाच पन्नास लोक त्यात होते, त्यांनी एकूण ५५ कोटी रुपये दोन तीन महिन्यात कमावले. शेअर खरेदीचा सल्ला देणाऱ्या मनिष शर्माला त्यासाठी कंपन्यांकडून तर पैसा मिळालाच पण दर्शक वाढले की गुगलकडून पाच कोटी रुपयांची कमाई झाली. काही लाख रुपयांची पुंजी जमा करण्यासाठी सर्व
सामान्य नागरिक आपले आयुष्य खर्च करतात, पण येथे तर दोन तीन महिन्यात कोट्यवधी रुपये कमावले गेले. सेबीने आता या सर्वावर आरोपपत्र दाखल केले असून त्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे हपापाचा माल गपापा असे झाले आहे.
हेही वाचा : प्रत्येक गुंतवणूकदाराला जोखमीबद्दल काय माहित असायला हवे?
आता ते बाहेर कसे पडणार?
सेबी हे प्रकरण लावून धरेल आणि आरोपीना शिक्षा होईल. पण आपल्यासाठी त्यातील महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती ही की पैसे कमावण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करून जे नवीन मार्ग अवलंबले जात आहेत, ते कितीही आकर्षक वाटत असले तरी त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये असे प्रकार नेहमीच होतात, ते प्रत्येकवेळी उघडकीस येतातच, असे नाही. पण अशा प्रत्येक प्रकरणात, पैसे कमावण्यासाठी आलेले नवे भोळे गुंतवणूकदार आपला कष्टाने कमावलेला पैसा घालवून बसतात. नव्या गुंतवणूकदारांनी छोट्या कंपन्यांच्या वाट्याला जावू नये म्हणतात, ते त्यामुळेच. कोणतीही कंपनी दोन चार महिन्यात असे कोणतेही उत्पादन करत नाही की तिच्या शेअरचे भाव दुप्पट व्हावेत. अशा प्रकारात काही मोजकी मंडळी बक्कळ पैसा कमवून घेतात आणि हजारो गुंतवणूकदार नागविले जातात. शेअर बाजारात नेहमीच होणारे हे प्रकार पूर्ण थांबतील, असे कधीच होणार नाही. अशा प्रकारात आपण अडकणार नाही, याची दक्षता घेणे एवढेच आपल्या हातात आहे. (ताजा कलम – साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या शेअरची किंमत ३४.८० वरून आता ४.८५ रुपये झाली आहे तर शार्पलाईन ब्रॉडकास्टची किंमत ५५.९५ वरून ५.५६ रुपये इतकी खाली आली आहे. ज्या भोळ्या गुंतवणुकदारांनी व्हिडिओ पाहून चढ्या भावाने खरेदी केली ते आता यातून कसे बाहेर पडणार?)