1 ऑक्टोबर 2020 पासून बदललेले महत्वपूर्ण नियम
1 ऑक्टोबर 2020 पासून ‘ऑक्टोबर हिट’च्या उकाड्यात सुखद गारव्याची झुळूक देणारे काही नियम लागू झाले आहेत. बदललेले काही नियम तुमच्या डोक्याचे तापमान वाढवू शकतात, पण बरेचसे नियम ‘सुस्वागतम’ म्हणावे या प्रकारातले आहेत. मोटार वाहन नियम, उज्ज्वला योजना, आरोग्य विमा, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, इत्यादींच्या बदललेल्या नियमांबद्दल आजच्या भागात माहिती घेऊया.
1 ऑक्टोबर 2020 पासून बदललेले महत्वपूर्ण नियम
वाहनविषयक बदलेले नियम:
1. ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक:
- यापुढे गाडी चालवताना करताना आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स यासारखी कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज नाही. गाडी चालवताना वाहनाशी संबंधित कागदपत्रांची केवळ वैध सॉफ्ट कॉपी असली तरी पुरेसे आहे.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या अशा अनेक प्रकारच्या दुरुस्तीची अधिसूचना जारी केली असून ती 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेल्या आहेत.
- वाहनचालकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने वाहनांची देखभाल, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलान अशा कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले असून ते आता 1 ऑक्टोबर 2020 पासून माहिती तंत्रज्ञानाच्या पोर्टलद्वारे केले जातील.
- सॉफ्ट कॉपीसाठी वाहनचालक आपल्या वाहनासंबंधित सर्व कागदपत्रे केंद्र सरकार पुरस्कृत डिजी-लॉकर किंवा एम-परिवाहन सारख्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करून ठेवू शकतात.
2. नेव्हिगेशनसाठी मोबाइल फोनचा वापर
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम 1989, मध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता रोड नेव्हिगेशनसाठी मोबाइलचा वापर करू शकता.
- मात्र यामध्ये वाहन चालवताना वाहनचालकांच्या एकाग्रतेत अडचण येऊ नये, ही काळजी घेणे आवश्यक आहे.
हे नक्की वाचा: शेअर ट्रेडिंग: मार्जिन प्लेज व अनप्लेज – नवीन नियम
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नवीन नियम
1. मिठाई विक्रेत्यांना ‘बेस्ट बिफोर डेट’ लिहिणे अनिवार्य
- मिठाई विक्रेत्यांना आता त्यांच्या दुकानात पॅकिंग शिवाय किंवा लूज विकण्यात येणाऱ्या मिठाईसाठी ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) संस्थेने मिठाई विक्रेत्यांना 1 ऑक्टोबरपासून या नियमाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
2. इतर स्वयंपाकाच्या तेलासह मोहरी तेलाच्या मिश्रणास बंदी
- भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) १ ऑक्टोबरपासून विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ बनविताना मोहरीचे तेल इतर खाद्यतेलांसोबत मिश्रण करून वापरण्यास बंदी घातली आहे.
- सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात एफएसएसएएआयने म्हटले आहे की “मोहरीच्या तेलाचे इतर कोणत्याही खाद्यतेलाचे मिश्रण करणे 1 ऑक्टोबर 2020 पासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.”
आरोग्य विमा नियमांमधील महत्वपूर्ण बदल
- कोविड -19 महामारीनंतर आरोग्य विमा संदर्भातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
- नवीन नियमानुसार आरोग्य विम्याचा प्रीमियम व आरोग्य सेवांच्या किंमती वाढतील.
- आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कोविड -19 चा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे नवीन आरोग्य विमा नियमानुसार 17 आजार विमा कवचाच्या लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहेत.
क्रेडिट आणि डेबिट कार्ड नवीन नियम
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. हे बदल 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आले आहेत.
- नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आता कार्डधारक आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार, स्पेंड लिमिट (खर्च -मर्यादा) तसेच कॉन्टॅक्टलेस कार्डसाठीच्या ऑप्ट-इन किंवा ऑप्ट-आउट सेवांसाठी रजिस्टर करू शकतील.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
- केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) अंतर्गत मोफत स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर्स घेण्यास सप्टेंबर अखेरपर्यतची मुदतवाढ देण्यास मान्यता दिली होती.
- पीएमयूवाय अंतर्गत वाढवून देण्यात आलेली ही मुदत 30 सप्टेंबर 2020 रोजी संपली असून 1 ऑक्टोबर 2020 पासून विनामूल्य एलपीजी कनेक्शनची सुविधा बंद करण्यात आली आहे.
करविषयक (Tax) बदलेले नियम
1. टीसीएस आणि नवीन कर संकलित
- आयकर विभागाने टीसीएस तरतूदी लागू होण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वे जारी केली ज्यात ई-कॉमर्स ऑपरेटरला वस्तू आणि सेवांच्या विक्रीवरील 1 टक्के कर कपात करावा लागेल. नवीन कर 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.
- वित्त अधिनियम, 2020 ने आयकर कायदा 1961 मध्ये नवीन कलम 194-ओ समाविष्ट केला असून, त्यानुसार 1 ऑक्टोबर 2020 पासून ई-कॉमर्स ऑपरेटर्सना वस्तूंची विक्री किंवा सेवेची तरतूद, किंवा दोन्हीसाठी डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांवर एकूण करांच्या १ टक्के दराने आयकर कपात करणे बंधनकारक आहे.
- जर अशा व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंबासंदर्भात मागील 2020-21 दरम्यान ( सप्टेंबर 2020 पर्यंत) विक्री किंवा सेवांची एकूण रक्कम किंवा दोन्ही सुविधा जर पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असतील, तर कलम 194-ओ ची तरतूद 1 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यानंतर जमा झालेल्या किंवा भरलेल्या कोणत्याही रकमेवरलागू करण्यात येईल.
2. परकीय निधी हस्तांतरणावर 5% कर आकारला जाईल
- परदेशी टूर पॅकेजेस खरेदी करण्यासाठी अथवा अन्य फॉरेन रेमिटन्ससाठी परदेशात पाठवण्यात आलेल्या रु.7 लाखांवरील रकमेवर 1 ऑक्टोबरपासून 5% टीसीएस (tax-collected-at source) कपातीस पात्र असेल.
- जर सदर रकमेवरील टीडीएस कपात आधीच झाली असेल तर टीसीएस कपात करण्यात येणार नाही.
3.. दूरदर्शन संच खरेदी
- ‘आत्मनिभार भारत’चा एक भाग म्हणून, ओपन सेल पॅनेल्ससाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविण्यास सरकार उत्सुक आहे.
- याच कारणास्तव 1 ऑक्टोबरपासून ओपन सेल पॅनेल्सवर 5% आयात शुल्क लागू करण्यात आले आहे.
- यामुळे आयातीला आळा बसण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीस मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: New Rules October, 2020 Marathi mahiti