Reading Time: 4 minutes

12. गुंतवणूक संच व्यवस्थापन सुविधा (PMS): मुदत ठेवी, सोने, म्युच्युअल फंड या गुंतवणूक पारंपरिक गुंतवणूक साधनांशिवाय गुंतवणूकदार अन्य मार्गांचा सातत्याने अन्य पर्यायांचा सतत शोध घेत असतात. गुंतवणूक संच व्यवस्थापन हा काहींसाठी उपयुक्त गुंतवणूक पर्याय होऊ शकतो. उच्च मालमत्ता असलेल्या लोकांसाठी हा एक नव्याने उदयास आलेला प्रकार आहे. गुंतवणूकदाराची खास गरज लक्षात घेऊन त्यांना हा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. ही सेवा नेमकी काय आहे तिचे वैशिष्ट्य, प्रकार, उपयुक्तता, फायदे आणि त्यामागील नियामक चौकट समजून घेऊया.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा म्हणजे काय?

ही एक अशी सेवा गुंतवणूक आहे ज्यामध्ये गुंतवणूक व्यवस्थापक गुंतवणूकदारास त्याच्या वैयक्तिक धेय्य आणि गरजेनुसार गुंतवणूक व्यवस्थापित करून देतो. म्युच्युअल फंड योजनेनुसार सर्व गुंतवणूकदारांची गुंतवणूक रक्कम एकत्रित न करता ती स्वतंत्र ठेवली जाते. केलेली गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या नावावरच असते फक्त त्यांनी अधिकार दिलेल्या व्यवसथापककडून तिचे व्यवस्थापन केले जाते. ते करताना गुंतवणूकदाराच्या गरज, कालावधी उद्दिष्टे, जोखीमक्षमता लक्षात घेतली जाते.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापन प्रकार: ही सेवा वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते.

●विवेकी गुंतवणूक (Discretionary): यामध्ये फंड मॅनेजर गुंतवणूकदाराच्यावतीने त्याला वाटेल त्या पद्धतीने गुंतवणूक करू किंवा बदलू शकतो.  त्याला गुंतवणूक कशी, कुठे, किती आणि कधी करावी पूर्ण स्वातंत्र्य असते. या पद्धतीत कोणतेही लागेबांधे नसलेल्या व्यावसायिक व्यवस्थापकाची गरज असते.

●विवेकाधिन गुंतवणूक (Non discretionry): या पद्धतीत फंड मॅनेजर त्याचा सल्ला देतो. त्यावर गुंतवणूकदाराच्या संमतीने गुंतवणूक केली जाते. खरेदी अथवा विक्री या संबंधीचे निर्णय गुंतवणूकदाराच्या परवानगीने घेतले परंतु ते व्यवस्थापकाकडून घेतले जातात. ज्या लोकांना निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीची गरज असते त्याच्यासाठी ही पद्धत योग्य आहे.

●गुंतवणूक सल्ला (Advisory): या पद्धतीत फंड मॅनेजर गुंतवणूक सल्ला देतो. गुंतवणूकदार त्याच्या मतानुसार त्यावर निर्णय घेऊन स्वतः गुंतवणूक करतो. ही पद्धत जाणकार गुंतवणूकदारांना उपयुक्त वाटते. या मध्ये गुंतवणूकदाराचे गुंतवणूकीवर पूर्ण नियंत्रण असते.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापनाची वैशिष्ठ्ये:

●वैयक्तिक सेवा: गुंतवणूकदारास त्याची गरज, उद्दिष्टे आणि जोखीम क्षमतेस अनुसरून सल्ला मिळतो.

●पारदर्शकता: दिलेला सल्ला त्याचे परिणाम याचे नियमित अहवाल दिले जात असल्याने या सेवेत पारदर्शकता आहे.

●मोठ्या किमान गुंतवणूकीची आवश्यकता: सेबीच्या नियमानुसार या सेवेचा लाभ घेण्यासाठी किमान 50 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

●सक्रिय गुंतवणूक: फंड व्यवस्थापक उपलब्ध निधी, बाजारच्या दिशा, उपलब्ध मालमत्ता, उद्दिष्ट, जोखीम याचा विचार करून तत्परतेने गुंतवणूक निर्णय घेत असल्याने ही गुंतवणूक कायम सक्रिय असते.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापनाचे फायदे:

●तज्ज्ञांचा सल्ला: या योजनेचे व्यवस्थापन जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाने होत असल्याने त्यातून अधिक परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते.

●वैयक्तिक सल्ला: व्यवस्थापकास तुमच्या विषयी सर्व माहिती असल्याने त्यास अनुरूप निर्णय तो घेत असतो.

●विविधिकरण: गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली गेल्याने त्यातील जोखीम

कमी होते आणि परतावा अधिक मिळण्याची शक्यता वाढते.

●करप्रभाव: गुंतवणूक करताना आणि काढून घेताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार व्यवस्थापकाकडून केला जातो.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवेचा लाभ घेण्यापूर्वी लक्षात घ्यायच्या गोष्टी:

●व्यवस्थापन फी: म्युच्युअल फंड योजनेच्या तुलनेत अशा योजनांची व्यवस्थापन फी अधिक असते.

●बाजार जोखीम: यातील बहुतेक गुंतवणूक भांडवल बाजाराशी संबंधित असल्याने आणि अनिश्चितता हा बाजाराचा स्थायीभाव असल्याने त्याचा गुंतवणूकीवर प्रभाव पडू शकतो.

●मूल्यमापन: अशी सेवा स्वीकारताना फंड मॅनेजर इतिहास, त्याची गुंतवणूक पद्धती आणि फंड हाऊसचा नावलौकिक या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापनाची नियामक चौकट:

या योजना सेबीच्या नियमनानुसार असल्याने त्या पारदर्शक असाव्यात आणि त्यांचे उत्तरदायित्व कुणाकडे असावे यासंबंधात काही नियम केलेले असून त्याचे पालन करावे लागते. त्यातील महत्त्वाचे नियम असे-

●नोंदणी: ही सेवा देऊ शकणाऱ्या सर्वाना सेबीकडे नोंदणी करणे आणि त्यांच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

●किमान गुंतवणूक: योजनेत भाग घेण्यासाठी गुंतवणूकदाराकडे 50 लाख रुपये अथवा मालमत्ता असणे आवश्यक असते त्यामुळे उच्च मालमत्ता धारण करणारेच त्यात भाग घेऊन त्यासंदर्भात असलेली जोखीम पेलू शकतात.

●जबाबदारी: गुंतवणूकदार आणि नियमकाना वेळोवेळी गुंतवणूक अहवाल देणे, गुंतवणूक दाराला फी ची माहिती आणि जोखीम याची जाणीव करून देणे ही व्यवस्थापकाची जबाबदारी आहे.

●रक्षकाची नियुक्ती( Custodian): केलेली गुंतवणूक संरक्षित राहावी तिचा अन्यत्र वापर केला जाऊ नये यासाठी मालमत्ता रक्षकाची नेमणूक सेवा पुरावठाधारकास करावी लागते.

●नियामक पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती: नियामक नियमांचे पालन आणि देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमणे बंधनकारक आहे.

 

गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवेतील जोखीम: ही सेवा घेण्यापूर्वी त्यासंबंधातील जोखीम धोके गुंतवणूकदारांनी समजून घेणे आवश्यक आहे.

●बाजार जोखीम- बाजार वरखाली होत असल्याने मालमत्ता मूल्य सतत बदलत राहते.

●लक्षवेधी गुंतवणूक- एकाच व्यवसाय  प्रकारात अधिक गुंतवणूक असेल आहे आणि तो व्यवसाय प्रकार न चालल्यास तुमचे गुंतवणूक मूल्य कमी होऊ शकते.

●तरलता: बाजारात तरलतेचा अभाव असल्यास गुंतवणूकीतून पुरेसा परतावा न मिळण्याचा धोका वाढतो.

●व्यवस्थापकीय कौशल्य: मालमत्तेतुन मिळणारा परतावा हा फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावर आधारित असल्याने जर फंड मॅनेजर कमी पडल्यास फंड उत्तम कामगिरी करू शकत नाही.

 

13. पद्धतशीर गुंतवणूक काढून घेण्याची योजना (SWP): ठराविक अंतराने मालमत्ता विकून गुंतवणूक काढून घेण्याची पद्धत हा एक गुंतवणूक नियोजनाचा लोकप्रिय प्रकार आहे. त्यामुळे गुंतवणूक योग्य रीतीने व्यवस्थापित होऊन नियमित उत्पन्न मिळत राहते. गुंतवणूकदारास आपल्याला जणूकाही पगार मिळत असल्याचा भास होतो. ही रक्कम किती आणि कधी मिळत राहावी यावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते.

 

योजनेचे महत्व:

●उत्पन्नात सातत्यता: सतत काहीतरी उत्पन्न मिळत राहणं ही काही गुंतवणूकदारांची गरज असते. विशेषतः निवृत्त लोक त्याची रोकड सुलभता ठीक राहावी म्हणून अशा योजनांची निवड करतात.

●आर्थिक नियोजन: आर्थिक नियोजन करण्याच्या हेतूनेही अनेक गुंतवणूकदार अशा योजना घेतात ज्या योगे त्यांचे पैशांवर नियंत्रण राहते.

●कर नियोजन: भांडवल बाजारातील गुंतवणूकीवर विशेष एकसमान दराने कर आकारणी होत असल्याने कर नियोजनाच्या दृष्टीने या योजना गुंतवणूकदारांना उपयुक्त आहेत.

 

या योजनेची निवड का करावी?

●नियमित उत्पन्नासाठी, रोखता प्रवाह राखला जातो.

●यातून मिळणारा परतावा दिर्घकाळात महागाईवर मात करीत असल्याने एकंदरीत परताव्यात वाढ होते.

●आर्थिक शिस्त लागण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो.

         अशा गुंतवणूकीमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळते, सुरक्षितता लाभते. नियमित उत्पन्न मिळत असल्याने मनशांती लाभत असल्याने त्या लोकप्रिय आहेत.

 

14. मूलभूत सेवा डी मॅट खाते: भांडवल बाजारात  सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने त्यांची गुंतवणूक केलेली मालमत्ता साठवण्यासाठी डी मॅट खात्याची आवश्यकता असते. हा एक डिजिटल लॉकर असून त्यात तुम्ही आपली भांडवल बाजार संबंधित मालमत्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून सुरक्षितपणे ठेऊ शकता. त्यांची खरेदीविक्री करू शकता. मूलभूत सेवा डी मॅट खाते हे किमान खर्चात गुंतवणूकदारांना भांडवल बाजारासंबंधीत सुविधा कमीतकमी खर्चात उपलब्ध करून देते. नवीन गुंतवणूकदारांकडे भांडवल कमी असल्याने  मोठ्या संख्येने ते व्यवहार करू शकत नाही.

 

मूलभूत सेवा डी मॅट खात्याची वैशिष्ठ्ये:

●कमी व्यवस्थापन शुल्क: या खात्याचे व्यवस्थापन शुल्क अगदी कमी किंवा शून्य असते.

●मालमत्तेच्या बाजारमूल्याची मर्यादा: या खात्यात धारण केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ₹ 4 लाखाच्या आत असेल तर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीस कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही त्याहून अधिक पण ₹10 लाखापर्यंत असल्यास ₹100/- शुल्क द्यावे लागेल. हे मूल्य ₹10 लाखावर गेल्यास नियमित खात्याप्रमाणे शुल्क द्यावे लागते.

●प्राथमिक सेवा उपलब्धता: या खात्यात भांडवली मालमत्ता जमा करणे आणि त्यातून त्यांची विक्री करणे एवढेच व्यवहार होतात. त्याहून अधिक विशेष प्रकारचे व्यवहार करता येत नाहीत.

●परिवर्तनीयता: हे खाते नियमित डी मॅट खात्यामध्ये कधीही बदलता येते.

       या खात्याचा हेतू सामान्य गुंतवणूकदाराने भांडवल बाजारात गुंतवणूक करावी हा असल्याने ते किमान खर्चात उपलब्ध झाल्याने सर्वाना परवडेल आणि त्यांची सोय होईल.

 

मूलभूत सेवा डी मॅट खात्यापासून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होणारे फायदे:

●किमान खर्च

●सुलभता

●गुंतवणूक कीस प्रोत्साहन

●सुरक्षितता

         हे खाते नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वरदान आहे.(अपूर्ण)

सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद.

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

 

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.

लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…