यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १
जेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. त्यांनी जमवलेली माया, शून्यातून उभारलेले साम्राज्य हे म्हणजे एखाद्या दंतकथेत शोभावे इतके अचाट वाटतात. त्यांच्या संपत्तीचे आकडे बघितले तरी ते साध्य करणं मध्यमवर्गीयाला अशक्य वाटायला लागतं. पण तरीही त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत.
गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका
यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये –
१. गुंतवणुकीत विविधता आणा
- जोखीम कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे क्रमप्राप्त ठरते.
- शेअर बाजार ही एक दोलायमान संस्था आहे. बऱ्याचदा जेव्हा एखाद्या क्षेत्राचा किंवा संस्थेचा शेअर्सचा बाजारभाव खाली जातो त्याचवेळी इतर एखाद्या क्षेत्राचा किंवा संस्थेच्या शेअरचा बाजारभाव वधारलेला असतो.
- यशस्वी गुंतवणूकदार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो व कालानुरूप एखाद्या क्षेत्र/संस्थेच्या शेअरमध्ये होणार तोटा दुसऱ्या ठिकाणी भरून काढत असतो.
२. आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या निर्णयावर प्रभाव पडू देऊ नका
- सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करता आपल्या आजुबाजुला अनेक बऱ्या-वाईट घटना घडत असतात.
- या घटनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शेअर बाजारावरही प्रभाव पडत असतो.
- यशस्वी गुंतवणूकदार सखोल अभ्यासाअंती निर्णय घेतो व आपल्या गुंतवणुकीवर ठाम राहतो.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी
३. संयम बाळगा
- बऱ्याचदा अशी परिस्थिती उद्भवते की गुंतवणूकदार एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवतो आणि बाजाराच्या स्थितीनुसार त्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते किंवा घसरते.
- अशावेळी नवखे गुंतवणूकदार बऱ्याचदा भावनेच्या आहारी जाऊन विक्री किंवा खरेदीचा निर्णय घेतात आणि कालांतराने जेव्हा बाजार स्थिर होतो तेव्हा मग अपेक्षित परतावा मिळवता येत नाही म्हणून निराश होतात.
- १९८७ मधील द गार्टमन लेटर चे लेखक डेनिस गार्टमन यांच्या मते, “गुंतवणूकदाराने आपल्या winning trades च्या बाबतीत संयम पाळणे फार गरजेचे आहे.”
- आपल्याला प्राप्त संधी पैकी किमान ३०% वेळा जरी आपला अंदाज खरा ठरला तरी शेअर बाजारात बऱ्यापैकी उत्पन्न मिळवता येते. फक्त अशावेळी आपला फायदा जास्त आणि तोटा कमी राहील याची काळजी घ्यावी.
४. एकाचवेळी गुंतवणुकीचे निरनिराळे तर्क वापरू नका
- मराठीत एक म्हण आहे, “अति तेथे माती”. हीच बाब गुंतवणुकीच्या बाबतीतही लागू होते.
- अधिक चांगल्या प्रकारे परतावा मिळू शकेल या उद्देशाने कदाचित आपण एकाचवेळी वेगवेगळ्या गुंतावणीच्या मार्गांचा अवलंब करू, पण इतर सर्वच बाबतीप्रमाणे इथेही एकाच वेळी वेगवेगळी मराहणी आपल्या लक्ष्यापर्यंत जायचा प्रयत्न करणे किचकट आणि गोंधळात टाकणारे ठरू शकते.
- अशा प्रकारच्या गोंधळामुळे यातून फायदा होण्या ऐवजी प्रत्यक्षात नुकसान होण्याचा धोकाच अधिक संभवतो.
- गुंतवणुकीच्या संदर्भात संपूर्ण विचाराअंती आपल्या उद्दिष्टांना अनुरूप असा एक मार्ग निवडावा व त्यावरच कायम रहावे.
बुडणाऱ्या बँकांपासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध
५. पैसा साबणासारखा असतो
- अर्थशास्त्राच्या क्षेत्रात जीन फामा यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या संदर्भात एक वाक्य फार प्रसिद्ध आहे: “पैसा हा साबणासारखा असतो. तुम्ही तो जितका जास्त हाताळाल तितका तो कमी होत जाणार.” आणि ते खरेही आहे.
- पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात बऱ्याचदा शुल्क लागते, कराचा भरणा करावा लागतो किंवा जर योग्य वेळी पैसे हलविले, तर त्याचा वेगळा भुर्दंडही भरावा लागतो.
- गुंतवणूक बाजाराचा अभ्यास केल्यावर बऱ्याचदा असे लक्षात येते की सर्वसामान्य गुंतवणूकदार बऱ्याचदा त्यांच्या क्षमतेइतके कमवू शकत नाहीत कारण त्यांना बऱ्याचदा योग्य वेळ साधता येत नाही.
- ह्या चुका टाळण्यासाठी, याची खातरजमा करावी की जेव्हा तुम्ही पैसे हलवाल तेव्हा ऐनवेळेच्या अनियोजित निर्णयापेक्षा ते कोणत्याही गुंतवणुकीच्या उद्देशाने केलेले असावे.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/