Health Insurance
भारतात कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविमा (Health Insurance) सुविधा पुरवण्याची परंपरा आहे. अलिकडच्या काळात मात्र, नागरिक स्वतःहून कमी वयातच स्वतंत्र आरोग्यविमा उतरवण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. बाजारात सध्या वैयक्तिक आरोग्यविम्याचे बहुविध पर्याय उपलब्ध आहेत.
सर्वसाधारण विमायोजना विविध प्रकार
आरोग्यविमा (Health Insurance):
- भारतातील सरासरी आयुर्मानात वाढ झाली तशीच आरोग्यसेवेसाठी होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
- आरोग्यसेवा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तसेच जीवनशैली आणि गंभीर आजारांमध्येही वाढ झाली.
- नागरिकांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढल्याने नागरिकांचा सर्वोत्तम आरोग्यसुविधेची निवड करण्याकडे कल वाढला आहे. यातूनच अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यसमस्यांमुळे येणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यविमा घेण्याची गरजही भासू लागली.
- भारतात सध्या दोन प्रकारच्या मुख्य आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत. यात वैयक्तिक विमा सुरक्षा कवच आणि कौटुंबिक विमा सुरक्षा कवच हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
Health Insurance: वैयक्तिक आरोग्य विमा योजना –
- वैयक्तिक आरोग्य विमा योजना हा आरोग्य विम्याचा सर्वात सोपा सहज पर्याय आहे. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र विमा संरक्षण निवडता येते.
- वैयक्तिक आरोग्य विमा योजनेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे होणारा खर्च, डॉक्टरांची फी, ॲम्ब्युलन्सचा खर्च, आरोग्यसेवेचे शुल्क, आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी आणि हॉस्पिटलमधून घरी सोडल्यानंतर झालेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश असतो.
- ग्राहकाला जितक्या रकमेचे संरक्षण हवे, त्यानुसार हप्त्याचा दर निश्चित केला जातो. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र आरोग्यविमा उतरवू शकता.
- तुम्ही एकटे असाल, आणि स्वतःसाठीच विमा संरक्षण घेऊ इच्छित असाल आणि तुमच्या आई–वडिलांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
Health Insurance: कुटुंब विमा योजना –
- संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यसेवेसाठी येणारा खर्च सुरक्षित व्हावा यासाठी कुटुंब विमा योजना (फॅमिली फ्लोटर) सादर करण्यात आली आहे. कुटुंब आरोग्य विमा योजनेद्वारे तुम्हाला एकाच योजनेतून संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षण मिळते, त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होतो. तसेच सर्वांसाठी स्वतंत्र विमा उतरवावा लागत नाही आणि त्याची कागदपत्रेही सांभाळावी लागत नाहीत.
- तुमच्यासह आई–वडील, पत्नी व मुले यांच्यासाठी एकच आरोग्य विमा उतरवण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
Health Insurance: ज्येष्ठ नागरिक विमा योजना –
- साठ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा चांगला पर्याय आहे. वाढत्या वयानुसार आरोग्यसमस्या वाढत जातात. त्यामुळे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या वयोगटातील नागरिकांसाठी खास योजना सादर केल्या गेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा उतरवल्यास त्यापोटी प्राप्तिकरातून वजावटही मिळू शकते.
- त्याचबरोबर स्वत:साठी, पत्नी, मुले आणि पालकांसाठी काढलेल्या आरोग्यविम्यासाठीही प्राप्तिकरातून दरवर्षी २५ हजार रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. ही वजावट ६० वर्षांपर्यंतच्या करदात्यांना मिळते.
- एखाद्याने ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्यांच्या आई–वडिलांसाठी आरोग्य विमा योजना घेतली तर त्यासाठी प्राप्तिकरातून ५० हजार रुपयांपर्यंत वजावट मिळते. त्यामुळे साठ वर्षांखालील एका करदात्याचे आई वडील ज्येष्ठ नागरिक असल्यास त्याला किंवा तिला प्राप्तिकर कायद्याच्या ८० डी कलमाअंतर्गत जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांंपर्यंत वजावट मिळवता येते.
- अर्थात ही वजावट मिळवण्यासाठी विम्याचे हप्ते रोखीशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने भरता येतात. वैद्यकीय किंवा संरक्षणात्मक तपासण्यांसाठी रोख रक्कम भरता येते.
यावरून आपल्याला आरोग्य गरजांसाठी सर्वंकष व पुरेसे विमा कवच मिळण्यासाठी आपल्या गरजांची पडताळणी करून त्यानुसारच योग्य त्या आरोग्य विमा पर्यायाची निवड करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी फक्त किंमत आणि हप्ता न पाहता, विम्यामध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी, ग्राहकांना भरावी लागणारी रक्कम (को–पे), विविध आजारांवर किंवा सेवांवर मिळणाऱ्या रकमेची मर्यादा, काही आजारांवरील उपचारांचा खर्च मिळण्यासाठी आवश्यक किमान कालमर्यादा, योजनेत समाविष्ट असलेल्या हॉस्पिटल्सची यादी आदी बाबीदेखील बारकाईने तपासून पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे योजना स्वीकारल्यानंतर क्लेमची वेळ आली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
– भास्कर नेरूरकर
हेड – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम,
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Health insurance policy Marathi Mahiti, Health insurance policy in Marathi, Health insurance policy Marathi, How to choose right Health insurance policy Marathi Mahiti, How to choose right Health insurance policy in Marathi
1 comment