क्रेडीट कार्ड देणे रक्कम भरण्यास मुदतवाढ : तुम्ही काय कराल ?
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोव्हीड १९ विषाणू मुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे.
‘आरबीआय’ने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कर्जप्रकारांमध्ये “क्रेडीट कार्ड”च्या बाकी रकमांचाही समावेश होतो. “मोराटोरीयम” म्हणजे मान्य केलेल्या वेळेसाठी एखादी क्रीया, व्यवहार तात्पुरता स्थगित करणे.
कोरोना: ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?…
क्रेडीट कार्ड बाकी रकमेच्या परतफेडीसाठी तुम्ही मोराटोरीयमचा स्वीकार केला तर काय होईल ? (credit card moratorium)
- तुम्हाला क्रेडीट कार्ड कंपनीला किंवा बँकेला कुठलीही रक्कम ३१ ऑगस्ट पर्यंत परतफेड करावी लागणार नाही.
- “मिनिमम अमाउंट ड्यू” म्हणजे “कमीत कमी परतफेड रक्कम” सुद्धा भरावी लागणार नाही.
- बँक तुम्हाला कुठलीही लेट फी, दंड रक्कम आकारणार नाही. वसुलीसाठी मागे लागणार नाही.
- तुम्हाला “डीफोल्टर” सुद्धा ठरवणार नाही. तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही.
- पूर्वीप्रमाणेच ही सवलत ऐच्छिक असून व्याजात कुठलीही सूट नाही.
- बँकेकडून तुमच्या मुद्दल बाकी रकमेवर व्याजाची आकारणी मात्र सुरूच असणार आहे.
- तुम्ही या मोराटोरीयम कालावधीत क्रेडीट कार्डवर अजून खरेदी केली, तर त्या रकमेवरही व्याज आकारले जाणार आहे.
इथपर्यंत सर्व काही छान छान आहे असे तुम्हाला वाटू शकते. क्रेडीट कार्ड बाकी रकमेवर आकारला जाणारा अव्वाच्या सव्वा व्याज दर ही सर्वात मोठी अडचण आहे.
- बँका क्रेडीट कार्ड बाकी रकमेवर वार्षिक ३६% ते ४८% दराने म्हणजे दरमहा ३% ते ४% दराने व्याजाची आकारणी करतात.
- तुम्ही तुमच्याकडील रक्कम बँकेत ठेवली तर मात्र बचत खात्यावर वार्षिक २.७५% दराने व मुदत खात्यावर वार्षिक ३.३०% ते ५% दराने व्याज तुम्हाला उत्पन्न म्हणून मिळू शकेल.
- वरची दोनीही वाक्ये कृपया पुन्हा वाचा. व्याजाचे दर तपासायचे असतील तर तुम्ही गुगलचा वापर करून ऑनलाइन कुठल्याही बँकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
- कष्ट करून आपल्या बचतीची रक्कम बँकेत ठेवल्यास जितके व्याज उत्पन्न म्हणून एका वर्षात मिळू शकेल तितके व्याज क्रेडीट कार्डची रक्कम वेळेवर परतफेड न केल्यास एका महिन्यातच द्यावे लागू शकेल.
- बँकांचा क्रेडीट कार्ड कर्ज देणे हा व्यवसाय आहे. तुम्हाला प्रचंड व्याज दराने परतफेड करायची नसेल तर क्रेडीट कार्डचे कर्ज न घेणे हा एकमेव सर्वोत्तम उपाय आहे. क्रेडीट कार्डवर केलेल्या खरेदी रकमेची परतफेड देय दिनांकाला केल्यास व्याज भरावे लागत नाही.
RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा……
मी नक्की काय करायला हवे ?
क्रेडीट कार्ड बाकी रक्कम भरण्यासाठी तुमच्यापुढे पुढील पर्याय आहेत :
पर्याय क्र. १ : पुरेसे पैसे उपलब्ध असतील तर क्रेडीट कार्डची संपूर्ण बाकी रक्कम भरणे आणि निष्कारण व्याजाचा खर्च टाळणे.
पर्याय क्र. २ : पुरेसे पैसे उपलब्ध नसतील तर क्रेडीट कार्डवर लागू असलेल्या व्याज दरापेक्षा कमी व्याज दराचे कर्ज घेऊन क्रेडीट कार्ड बाकी रक्कम भरणे.
- वैयक्तिक कर्ज, गृह कर्जाचा टॉप अप, मुदत ठेवी तारण कर्ज इ. तुम्ही घेऊ शकता.
- इथे नवीन कर्जाचे प्रेसेसिंग चार्जेस व इतर खर्च, एकूण व्याज हे सर्व क्रेडीट कार्डच्या व्याजापेक्षा कमी आहे का याचा मात्र नक्की विचार करा.
- घाबरून जाऊन घाईघाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. क्रेडीट कार्ड ग्राहक सेवा केंद्राच्या क्रमांकावर कॉल करून व्यवस्थित माहिती घ्या.
कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !………
पर्याय क्र. ३ : पर्याय क्रमांक १ व २ वापरू शकत नसाल तर तुम्ही कुठलीही बाकी रक्कम क्रेडीट कार्ड साठी भरू नका.
- लक्षात ठेवा :
- कोरोना महामारी मुळे आलेली सद्यस्थिती कायम असणार नाही. चांगले दिवस पुढे नक्की येणार आहेत.
- तुमच्या दीर्घकालीन करिअरच्या दृष्टीने हा ६ महिने किंवा वर्षाचा कालावधी फार छोटा आहे.
- तुमच्याकडील गंगाजळी किंवा इमर्जन्सी फंड व्याज वाचवण्यासाठी तुम्ही क्रेडीट कार्ड बाकी रक्कम भरण्यात खर्च केला आणि नंतर पैशाची आवकच झाली नाही तर परिस्थिती आताच्या पेक्षा जास्त बिकट होईल.
- इतर क्षेत्राप्रमाणेच क्रेडीट कार्ड वापरात “फुकट ते पौष्टिक” ही मानसिकता नुकसानकारक आहे. गरज नसताना केवळ क्रेडीट कार्ड खरेदीवर ऑफर्स आहेत, कैशबॅक मिळतंय म्हणून क्रेडीट कार्ड वापरू नका.
- आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यावर पुरेसी अतिरिक्त रक्कम हातात आली असता तुम्ही क्रेडीट कार्ड कर्जात भरणा करू शकता.
- अनावश्यक खर्च टाळून आपला व्यवसाय धंदा किंवा नोकरी बाबत काय सुधारणा करू शकतो याचा अभ्यास करून प्रत्यक्ष कार्यवाही करता येईल का ते बघावे.
रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती……
क्रेडीट कार्ड तुमचा मित्र आहे आणि शत्रू सुद्धा आहे. त्याचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
– सी.ए. अभिजीत कोळपकर
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies