Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्ड  हे एक वेगळ्या प्रकारचे कर्जच आहे यामध्ये व्यवहार झाल्यावर विक्रेत्यास ताबडतोब काही रक्कम कापून बहुतेक सर्व रक्कम मिळते त्यामुळे त्याच्या एकूण विक्रीत वाढ होते  तर खरेदीदारास रक्कम चुकती करण्याचे पर्याय मिळतात ते असे –

  • ठराविक मुदतीच्या आत पूर्ण पैसे भरणे
  • किमान रक्कम भरून जमतील तसे व्याजासह पैसे भरणे.
  • व्याजासह किंवा विरहित समान मासिक हप्त्यात (EMI) रक्कम भरणे.

याशिवाय

  • काही मर्यादेत कोणत्याही एटीएममधून रोख रक्कम काढता येते.
  • विविध ऑफर्स, बोनस पॉईंट मिळतात.
  • रोख रक्कम बाळगावी लागत नाही.

आपल्याकडे असे कार्ड असणे किंवा अशी अनेक कार्ड असणे यामुळे आपल्या प्रतिष्ठेत भर पडते अशी अनेकांची भ्रामक समजूत असल्याने आजकाल असे कार्ड असणे ही महत्त्वाची गरज झाले आहे. बँका, नॉन बँकिंग कंपन्या, वित्तीय संस्था तसेच काही नोंदणीकृत कंपन्या रिझर्व बँकेची मान्यता घेऊन कार्ड वितरित करू शकतात त्यामध्ये त्याची किमान मालमत्ता किती असावी यासारख्या अटींची पूर्तता करावी लागते यामध्ये विसा, मास्टरकार्ड यासारख्या आंतरराष्ट्रीय किंवा रूपे सारख्या स्वदेशी पेमेंट गेटवेचा समावेश आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार चुटकीसरशी केले जाऊ शकतात. क्रेडिट कार्डमुळे व्यापाऱ्यांचा माल विकला जाऊन बँक अथवा वित्तीय संस्था यांच्या व्यवसायात वाढ होऊन त्यांना व्याज, दंडव्याज मिळते आणि पेमेंट गेटवे यांना काही किरकोळ कमिशन मिळते. लोकांनी मोठ्या प्रमाणात कार्ड वापरावे यासाठी कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स, सवलतीच्या योजना आणत असतात. हा त्यांच्या मार्केटिंग तंत्राचा भाग आहे बोनस पॉइंटस, रिव्हॉर्ड, व्याज विरहित मासिक हप्ते, वैयक्तिक कर्ज या सारख्या सोई मिळत असल्याने यातून अनेकदा ग्राहकांचा फायदा होऊ शकतो.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे 

★ वापरण्यास सुलभ- कार्ड वापरणे अतिशय सोपे आहे ऑनलाइन व्यवहार करताना कार्ड डिटेल्स, सिविवी आणि ओटीपी टाकून व्यवहार पूर्ण होते. तर प्रत्यक्ष खरेदी करायची असल्यास व्यापाऱ्यांकडे असलेल्या मशीनमध्ये टाकून किंवा स्वाईप करून पिन टाकल्यावर व्यवहार पूर्ण होते. कॉन्टॅक्टलेस पद्धतीच्या मशीनपुढे विशिष्ट अंतरावर कार्ड घरूनही काही मर्यादेत अलीकडे व्यवहार करता येतात.

★ पैसे भरण्यास सवलत- व्यवहार केल्यावर ताबडतोब पैसे द्यावे लागत नाहीत. तसेच एकरकमी बिलाची रक्कम चुकती केल्यास कोणताही आकार द्यावा लागत नाही. आपल्या बिलिंग सायकलनुसार खरेदी केल्यानंतर किमान 22 ते कमाल 60 दिवस झाल्यावर आपणास पैसे द्यावे लागतात. या कालावधीत ते पैसे आपण अन्यत्र वापरू शकतो.

★ पतक्षमता निर्माण होते- आपण जे व्यवहार करतो या माहितीची देवाणघेवाण  सर्व वितीयसंस्था पतमापन संस्थांशी करत असतात. त्यामुळे आपण खरेदी कधी केली, पैसे वेळेत फेडले की नाही, जर किमान रक्कम भरून त्याची पूर्तता करतो की एकरकमी भरतो, वेळेवर भरतो की उशिरा भरतो यावरुन या संस्था आपल्याला कर्जदार म्हणून गुण देत असतात ते 300 ते 900 या संख्येत असतात 750 हुन अधिक गुण मिळवणारी व्यक्ती कर्जदार म्हणून योग्य समजली जाते. आपण भविष्यात कर्ज घेणार असल्यास याद्वारे आपली पत ठरवली जाते.

★ कमी व्याज किंवा व्याजरहित मासिक हप्त्याची सोय- यामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने महागड्या वस्तू कमी व्याजाने अथवा व्याज आकारणी न करता हप्त्याने घेता येतात. अशी ऑफर स्वीकारताना ती वस्तू रोख घेताना व हप्त्यावर घेताना पडणाऱ्या किमतीत नक्की किती फरक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

★ कार्डावर मिळणाऱ्या ऑफर्स सवलती – कार्ड धारकांना कोणत्या ना कोणत्याही निमित्ताने विविध सवलती दिल्या जातात. या सवलती आपण वापरून बऱ्यापैकी बचत करू शकतो. 

★ केलेल्या खर्चाची तपशीलवार माहिती- कार्ड बिलाबरोवर केलेला सर्व खर्च, आकारण्यात आलेला दंड, देणे रक्कम याचा सर्व तपशील दिलेला असतो त्यावरून आपण कोणत्या प्रकारे खर्च करतो. तो आवश्यक की अनावश्यक? याचा मागोवा घेता येतो. त्यानुसार आपल्या खर्च करण्याच्या पद्धतीत बदल करता येतो.

★ सुरक्षा कवच लाभ- या कार्डसोबत काही कंपन्या विमा कवच प्रदान करतात तर काही कार्ड सोबत ते गहाळ होऊन गैरव्यवहार झाल्यास त्यापासून सुरक्षितता मिळावी अशी 

विमायोजना असते. ज्यामुळे आपले संभाव्य नुकसान टळू शकते.

क्रेडिट कार्डचे तोटे –

★ किमान रक्कम भरण्याची सवलत- यामुळे आपण खरेदी करू पैसे सावकाश भरले तरी चालतात असा संदेश मिळत असल्याने आपल्या आर्थिक ताकदीहून अधिक खरेदी केली जाते.

यावरील व्याज हे सर्वाधिक असल्याने ते काही कारणाने वाढल्यास त्याची परतफेड करणे अशक्य होते. आपण कर्जाच्या सापळ्यात अडकतो नंतर या कर्जफेडीसाठी स्त्रियांच्या मंजुळ आवाजात विनंती नंतर पुरुषांकडून विनंती नंतर गुंडांकडून धमक्या देणे चालू होते. यासंबंधी रिजर्व बँकेकडे आलेल्या तक्रारीवरून वसुली एजंट संबंधित नियम कडक केले गेले आहेत.

★ अप्रत्यक्ष खर्चात वाढ- कार्ड व्यवस्थित वापरल्यास सहसा तक्रार उद्भवत नाही परंतू त्यात गडबड झाल्यास लेट फी, दंड, व्याजावर व्याज यासारख्या अनेक अप्रत्यक्ष खर्चात वाढ होते. 

★ अधिक खर्च करण्याचा मोह- कार्ड जवळ असले की सहाजीकच एकंदर अनावश्यक खर्चात वाढ होते.

★ सर्वाधिक व्याजदर- यावर सर्वाधिक म्हणजे 30 ते 48% प्रतिवर्षं दराने असते.

★ हरवण्याचा धोका- यामुळे गैरव्यवहार होऊ शकतात.

म्हणूनच क्रेडिट कार्ड वापरताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  1. कार्ड नियम अटी
  2. कार्ड लिमिटहून अधिक खरेदी टाळावी
  3. या कार्डाचा वापर करून रोख पैसे काढणे टाळावे.
  4. वेळोवेळी कार्ड मर्यादा तपासावी 40% मर्यादेस खर्च करण्यास अयोग्य असा धोक्याचा इशारा मानावा.
  5. मोठ्या खर्चास समान मासिक हप्त्यांचा पर्याय वापरावा.
  6. व्याजरहित मासिक पर्यायातील वस्तूंच्या किमतीची खात्री करून घ्यावी.
  7. आपले बिल वेळेपूर्वी संपूर्ण भरून व्याज दंड टाळावा.
  8. ऑफर्ससाठी खर्च करणे टाळावे, आपली गरज लक्षात घ्यावी.
  9. मर्यादेहून अधिक खर्च झाल्यास ताबडतोब बँकेच्या / वित्तसंस्थेच्या लक्षात आणून देऊन जादा खर्चाची रक्कम व्याजासह कशी परत करायची याची माहिती घेऊन रक्कम भरावी.

सध्या ग्राहकांच्या गरजेनुसार 10 प्रकारची क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत त्यातील प्रमुख अशी- लाईफ टाइम फ्री कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, स्टुडंट क्रेडिट कार्ड, एनआरआय क्रेडिट कार्ड इ. कार्डचा स्मार्ट वापर करून अनेक फायदे मिळवणे शक्य आहे.

©उदय पिंगळे

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…