Reading Time: 3 minutes
काळ कितीही बदलला तरी काही विचार, सल्ले, म्हणी यांचे महत्व काही कमी होत नाही. राजा– महाराज्यांच्या काळात जे विचार, म्हणी महत्वाच्या होत्या, त्या आज लोकशाही, तंत्रज्ञानाच्या काळातही आपल्या जीवनात जशास तश्या लागू होतात. ( अर्थसाक्षरता Lessons in Marathi)
आपले आर्थिक जीवन आनंदमय करणाऱ्या अशा आर्थिक म्हणी आपण पाहणार आहोत, ज्या बाबा आदम जमान्यापासून चालू आहेत पण आजही तितक्याच लागू आहेत. ( Proverbs in Marathi)
१) ऋण काढून सण साजरे करू नका –
- पैसे नसतील तर खर्च करणं हे म्हणजे कर्जाच्या जाळ्यात गुरफटून जाणे आहे. एका अशा चक्रव्युहात अडकणे आहे, ज्यातून सुटका होणार नाही. तुमचा अभिमन्यू झाल्याशिवाय राहणार नाही.
- आजच्या जगात कर्ज हाच जीवनाचा पाया झालेला आहे. हे मान्य आहे पण यासाठी काही गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज इ. घ्या. पण अनावश्यक गोष्टीसाठी कर्ज काढून खर्च करू नका. शेजारच्याने नवी ब्रान्डेड कोरी करकरीत कार घेतली म्हणून घरात कार असताना देखील दुसरे कर्ज काढून नवी कार घेऊ नका… ते कर्ज उद्या तुमच्याच डोक्यावर बसणार आहे. (Arthsaksharta)
हेही नक्की वाचा – कर्जामुळे निर्माण होणाऱ्या ९ समस्या
२) पैसा पाण्यासारखा जातो आणि कासवाच्या गतीने येत असतो –
- आजच्या गतिमान तंत्रज्ञानाच्या जगात पैसा खर्च करणे, ही काही सेकंदाची गोष्ट झालेली आहे. तुम्ही घरी बसून एका क्लिकवर आणि एका सेकंदात तुमच्या आयुष्यभराची कमाई खर्च करू शकता.
- तेव्हा लक्षात ठेवा की, पैसा किती कमी वेळात खर्चिला जाऊ शकतो हे महत्वाचं नाही तर तो पैसा कमावण्यासाठी किती वेळ लागतो, हे महत्वाचे आहे.
३) मूर्ख व्यक्तीकडे पैसा टिकत नाही-
- A fool and his money are soon parted. – Dr. John Bridges
- या वाक्याला शब्दशः घेऊ नका. शहाण्या व्यक्तीकडेही पैसा राहत नाही. या वाक्याचा अर्थ एवढाच आहे की, आर्थिक शहाणपण अंगी बाळगा. तुम्ही खात्री देऊ शकत नाही की, सदैव तुमच्याकडे पैसा राहील. यामुळे तुमच्याकडे जो पैसा आहे, त्याबद्दलचे कसे योग्य निर्णय घेता येईल? याचा विचार करा.
- आर्थिक निर्णय घेण्यासाठी स्वतः ला अर्थसाक्षर बनवा. आर्थिक व्यवहाराचे, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्या. तुम्ही काहीही विचार न करता, अभ्यास न करता आर्थिक निर्णय घ्याल तर तुमच्या वाट्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही येणार नाही.
४) आपल्यावरच्या कर्जाची माहिती ही आपल्यापेक्षा सावकाराला अधिक असते.
- Creditors have better memories than debtors.– Ben Franklin
- याचा अर्थ हा आहे की, आपण आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवत नाही. आपण कोण- कोणत्या व्यक्तीकडून, संस्थाकडून किती- किती कर्जे घेतले. याची बारीकसारीक माहिती आपल्याकडे हवी. ती तुमच्याकडे नसेल तर सावकार ठेवणारच आहे पण त्याची किंमत मात्र तुम्हाला चुकवावी लागेल.
- आपण आपल्या आर्थिक जीवनात अनेक बरे- वाईट निर्णय घेत असतो. त्याचा लेखा- जोखा आपल्याकडे हवा. आपला आर्थिक इतिहास आपल्याकडे असेल तर त्यानुसार आपल्याला भविष्यात आर्थिक निर्णय घेण्यास खूप मोलाची मदत होत असते.
हे पण तुम्हाला वाचायला आवडेल – कर्ज देणाऱ्या ‘सावकारी ॲप’ पासून सावधान
५) आज गरज नसलेल्या वस्तूवर खर्च कराल तर भविष्यात त्याची किंमत चुकवाल –
- If you buy what you don’t need, you steal from yourself. – Swedish Proverb
- कोणत्याही कारणाने आज तुमच्याकडे पैसा आला असेल तर लगेच तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टीवर पैसे उडवू नका. कारण तुमच्याकडे निरंतरपणे पैसा येत राहील याची कोणतीही खात्री देता नाही. हे अनिश्चिततेचे जग आहे. या जगात काहीही होऊ शकतं. तेव्हा तुम्ही आज अनावश्यक गोष्टीवर खर्च केल्यात तर तो भविष्यात संकटाच्या वेळी मदतीला येणारा पैसा तुमच्याकडे नसेल.
- लॉटरी लागलेल्या लोकांबाबत एक अभ्यास झाला होता. तो अभ्यास असं सांगतो की, लॉटरी लागलेल्या लोकांनी सर्व पैसे काही दिवसात खर्च करून टाकले. त्यात त्यांनी बहुतांश खर्च हा अनावश्यक गोष्टीवर केला. ना कुठे गुंतवणूक केली, ना काही स्टार्ट अप केलं. आज त्या लोकांना पश्चाताप होतो आहे. यामुळे पैशाच्या बाबतीत निर्णय घेत असताना सावध रहा.
६) संकटकालीन स्थिती हाताळण्यासाठी बचत करा –
- बचतीच्या मंत्रात फार मोठी ताकद आहे, त्याला कमी लेखू नका. कोणतेही संकट सांगून येत नाही, ते अचानक येत असते. जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपली तारांबळ उडून जाते. अशावेळी बचत आपली कामी येते. आपल्या संकटापुढे ती ढाल म्हणून उभी राहते.
- बचत फक्त संकटात मदतीला येत नाही तर नवीन संधी देखील घेऊन येत असते. सध्या स्टार्ट अपचा जमाना आहे. यासाठी सरकारच्या अनेक सवलती आहेत, योजना आहेत. याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःची काही बचत हवी. तेव्हा बचती संधीच्या प्रवेशद्वार असतात, हे विसरता कामा नये. तेव्हा, लक्षात ठेवा, आज बचत कराल तर उद्या मोठे व्हाल.
७) मित्र गमवायचे असतील तर त्यांच्यासोबत उधारीचे व्यवहार करा-
- चांगले मित्र किंवा नातेसंबंध निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष द्यावी लागतात. पण गमावण्यासाठी काही वेळ पुरेसा असतो. तुम्ही मित्र किंवा नातेवाइकासोबत उधारीचे देण्या- घेण्याचे व्यवहार केले आणि त्यात अडचणी आल्या तर अनेक ताण- तणाव निर्माण होतात. अशावेळी ती मैत्री किंवा नातेसंबंध तुटायला वेळ लागत नाही.
- या कारणामुळे असे व्यवहार बँकेशी करा. तुम्ही बँकेला कितीही दूषणे दिली तरी व्यक्तिगत नाते संबंधांवर परिणाम होणार नाही.
वरील सात म्हणी आपण आपल्या आयुष्यात लागू केल्या तर आर्थिक संकटांची कसलीही भीती राहणार नाही. लक्ष्यात ठेवा, या नुसत्या म्हणी नाहीत तर आर्थिक अडचणी विरोधात लढण्याची सात शस्त्रे आहेत. जोपर्यंत ही शस्त्रे तुमच्याजवळ आहेत, तोपर्यंत कोणतेही आर्थिक संकट तुम्हाला अडचणीत टाकू शकत नाही.
Share this article on :