Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ

Reading Time: 4 minutes

Share Market Investment

शेअर बाजार गुंतवणुकीवर (Share Market Investment) आधारित एक उत्कृष्ट लेख गेल्याच आठवड्यात वाचनात आला. एक यशस्वी उद्योजक, समाज माध्यमावरील लोकप्रिय लेखक आणि ‘अलक’ या एका वेगळ्या लघुकथाप्रकाराचे जनक, राजेंद्र वैशंपायन यांचा ‘आयुष्याचं स्टॉकमार्केट’ हा लेख वाचला. गेली 37 वर्षे माझा या बाजाराशी जवळचा संबंध आहे. बाजारातील अनेक गोष्टींचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडून, केवळ याच जन्मात नव्हे तर जन्मोजन्मीचा विचार करून स्टॉकमार्केट विषयी असं काही कुणी लिहिलंय, हे अजूनपर्यंत माझ्या वाचनात आलं नव्हतं. राजेंद्रजीना, “केवळ अप्रतिम!” असा अभिप्राय कळवून मला आवडलेला कोणताही लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने नेहमीच्या सवयीप्रमाणे माझी वॉल आणि विविध व्हाट्सअप्प गृपवरून तो ताबडतोब फॉरवर्ड केला. या लेखाचा सारांश मी इथे देत आहे. 

हे नक्की वाचा: शेअर्स खरेदीचं सूत्र…

Share Market Investment: “आयुष्याचं स्टॉकमार्केट” या लेखातील महत्वाच्या गोष्टी 

 • बिझनेस मॉडेल समजून घेतले पाहिजे,  प्रामुख्याने आर्थिक गुणोत्तर आणि त्याचा बाजारभावावर होणारा परिणाम.
 • आलेख पाहून अंदाज बांधून सर्वांना नियोजन करता येत नाही, मार्केट याहून मोठं आहे.
 • “असं केलं असतं तर अस झालं असतं”, हे केवळ दिवारंजन. व्यवहार पूर्ण  केल्यावर होतो तो नफा  किंवा तोटा, आभासी नफा तोट्याचा काहीही उपयोग नाही.
 • मार्केटमध्ये  नफा नुकसान होत राहणारच याकडे एक खेळ या दृष्टीने तटस्थपणे पहावं. अंदाज खरा ठरला तर फुशारकी नको चुकला तर दुःख नको.
 • दैनंदिन चढउतार दैनिक आलेखावर परिणाम करीत असला दीर्घकालीन परिणामाच्या दृष्टीने तो फक्त एक बिंदूस्वरूपात डेटाच असतो. तेव्हा रोजच्या जीवनात कोणत्याही क्षेत्रात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचा आलेख दिर्घकाळात केवळ एक बिंदूस्वरूपात डेटा म्हणून शिल्लक राहणार असल्याने याकडे खेळ म्हणून पहावं कौशल्य पूर्ण पणाला तटस्थपणे निर्णय घ्यावा.

विशेष लेख: शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

“शीतोष्ण-सुख-दुःखेषु समः सङ्ग-विवर्जितः”

लेखात म्हटल्याप्रमाणे “शीतोष्ण-सुख-दुःखेषु समः सङ्ग-विवर्जितः” अशी मानसिक स्थिती मिळवण्याचा प्रयत्न करायचं कितीही ठरवलं तरी  कुठेतरी एका कोपऱ्यात थोडी सल राहणारच! यावर काय करावं याचे केलेले हे मुक्तचिंतन-

 • आपण शेअरबाजारात का आलो आहोत, बाजारकडून नक्की आपल्या अपेक्षा काय त्या वाजवी आहेत का? मुळात वाजवी म्हणजे टक्केवारीत किती?
 • मागील अनेक लेखात सांगितल्याप्रमाणे शेअरचा बाजारात दिसतो तो भाव. पण हा भाव पाहण्यापेक्षा आपल्याला त्याचे आंतरिक मूल्य ओळखायचे असते. हे ओळखण्याची निश्चित पद्धत नाही. हे जितके लवकर समजेल तितका फायदा अधिक.
 • आपली स्वतःची अशी व्यवहार करण्याची निश्चित अशी काही पद्धत आहे का? किती फायदा म्हणजे आपल्या दृष्टीने योग्य आणि किती नुकसान स्वीकारायची तयारी.
 • नक्की कोणत्या प्रकारचे व्यवहार करणार? का करणार? कशासाठी करणार? याबाबत पुरेशी स्पष्टता.
 • सातत्याने बदल टिपण्याची आणि आत्मसात करण्याची तयारी.
 • आपली मूद्दल न गमावता भांडवलात सातत्याने वाढ कशी होईल या दृष्टीने विचार करणं आवश्यक.
 • चुका ओळखणं आणि त्याच त्याच चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेणं.
 • घेतलेल्या शेअरचा भाव घेतल्या घेतल्या पडणं किंवा विकलेल्या शेअर्सचा भाव विकल्यावर अचानक मोठ्या प्रमाणात वाढणं हा 90% लोकांना येणारा सार्वत्रिक अनुभव आहे. यात नवीन काहीच नाही तुमची इच्छा सर्वात कमी किमतीने स्टॉक घेऊन सर्वाधिक किमतीने विकायची इच्छा असली तरी हा सर्वात कमी भाव व हा सर्वाधिक भाव तुम्ही पकडू शकत नाही हे वास्तव, याचा सर्वप्रथम मनाने स्वीकार करा.
 • अपवादाने ज्या कुणाला सर्वात कमी भावात खरेदी करून सर्वाधिक भाव मिळाला तो योगायोग समजावा. जरी सर्वाधिक भाव मिळाला तरी तोच सर्वाधिक नाही असं असत तर सेन्सेक्स निफ्टी हे निर्देशांक कधीच वाढले नसते. आज ज्याला तुम्ही सर्वाधिक भाव समजता ती भविष्यकाळात किरकोळ किंमत असू शकते. त्याचप्रमाणें ती या शेअर्सची आतापर्यंत असलेली सर्वाधिक किंमत असू शकते.
 • तथाकथित तज्ज्ञ हे अनेकदा एखादी घटना होऊन गेल्यावर ती कशी झाली याचे विश्लेषण करीत असतात. त्यामुळेच एखादी घटना का घडली याचे स्पष्टीकरण जो देऊ शकतो तो म्हणजे बाजारतज्ज्ञ.
 • माझे अंदाज कसे अचूक असतात या भरवशावर राहू नका. लक्षात ठेवा, अंदाज म्हणजे भविष्य नाही. त्याचप्रमाणे तसे झालेच तर मी म्हणालो तसंच झालं ना! याची फुशारकी नको. 
 • कोविड 19 मुळे सन 2020 मध्ये शेअरबाजार इतक्या मोठ्या प्रमाणात खाली येईल, त्याचप्रमाणे तो इतक्या कमी कालावधीत पुन्हा उच्चांक मोडेल याचा कुणालाही अंदाज करता आला नाही.
 • आजही एका विशिष्ठ मर्यादेत बाजार फिरत असताना अनेक जण छातीठोकपणे गेले 3 महीने आता मंदी येणार म्हणून भाकीत करीत असल्याने अनेकजण भाव खाली आले की स्टॉक घेण्याच्या तयारीत आहेत, पण काय सांगावं आज जे भाव जास्त वाटतात तेच बाजारात आणखी तेजी आल्याने भविष्यकाळातील खरेदीयोग्य भावही असू शकतील.
 • कर्ज काढून, उधारी करून आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून यातून फार पैसे मिळतील अशी अपेक्षा बाळगू नका. शक्य असेल तर ब्रोकर्सकडील मार्जिनही न वापरता व्यवहार करा.
 • कोणत्याही व्यवहाराची जोखीम आधी निश्चित करून त्याचा स्टॉपलॉस काय असावा ते ठरवा. डे ट्रेडर्स असाल तर तो तत्परतेने अमलात आणा पॉझिशनल ट्रेडर्स असाल तर त्यात माफक ऍड करा.
 • मनाची शक्ती वाढण्यासाठी, आपल्याकडे असलेले दीर्घकालीन शेअर भावात घट झाल्यावर अल्प प्रमाणात खरेदी करा तर वाढ झाल्यावर अल्प प्रमाणात विक्री करा ज्यायोगे कोणत्याही बाजारात सतत संधी असल्याची जाणीव होऊन मनोबल उंचावेल.
 • ऑपशन्स आणि फ्युचर्सचे व्यवहार याची निर्मिती हेजिंगसाठी करण्यात आली असून आपण केलेला ट्रेड डिलिव्हरीत बदलून घेण्याची क्षमता नसल्यास असे धाडसी ट्रेड करणे आणि अमर्यादित जोखीम स्वीकारणे टाळा. यात डे ट्रेंडिंग करता येत असले तरी योग्य ती काळजी घेऊन आपली लक्ष्मण रेषा कोणती ते ठरवा.
 • सर्वसाधारण व्यवहार, डे ट्रेंडिंग, एफएनओ व्यवहार हे चढत्या क्रमाने धोकादायक असून एकदम अधिक धोकादायक व्यवहार केवळ भरपूर फायदा होऊ शकतो या हेतूने करू नका. 
 • ज्या व्यवहारातून भरपूर फायदा होऊ शकतो असा व्यवहार तुमचे संपूर्ण भांडवल गमावून अजून असेल नसेल ती शिल्लकही संपवू शकतो.
 • आपल्याला कोणीतरी फायदा करून देईल या भरवशावर राहू नका. इथेच काय जगात कुठेही, तुमचा उपयोग संपल्यावर तुमची काहीच ओळख रहात नाही. तेव्हा जे काय करणार ते स्वतः अथवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी सखोल चर्चा करूनच करा.
 • एखादा ट्रेड घेतल्याने आपल्या आरोग्यावर परिमाण होत असेल, उदा रक्तदाब वाढणे, झोप न येणे ई. तर हा बाजार आपल्यासाठी नाही म्हणून त्यास राम राम करा.
 • सर्वसाधारण अल्प जोखीम स्वीकारून, थोडा अभ्यास करून, थांबण्याची तयारी असल्यास भांडवल न गमावता शेअर बाजारातूनच अधिक परतावा कसा मिळवता येईल. आपली एक चूक म्हणजे आर्थिक नुकसानच! याबाबत आवश्यक असल्यास फी आकारून मार्गदर्शन गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करा. आपल्या गरजेनुसार त्याच्याकडून वैयक्तिक योजना बनवण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन मिळेल. येथे फुकट काहीही मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
 • पुरेशी काळजी घेतली तरी कदाचित नुकसान होणारच. ते क्वचितच आणि आपल्या निर्धारित मर्यादेत असेल याची काळजी घ्या. प्रत्येक वेळी जे जे काही मिळाले त्यात आनंद बाळगा.

महत्वाचा लेख: शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

आपलं ज्ञान हीच खरी संपत्ती असून ते वाढवण्याचा प्रयत्न कराच पण शेअर बाजार हा व्यक्ती व्यक्तींच्या पर्यायाने समूहाच्या मानसिकतेचा खेळ असल्याने केवळ ज्ञानच नाही, तर असलेल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर तुम्ही कसा करता त्यावरच यश अवलंबून आहे. सर्वांवर विश्वास दाखवा, पण कुणावरही विश्वास ठेऊ नका हा नव्या युगाचा मंत्र लक्षात ठेवा.

“आयुष्याचं स्टॉकमार्केट” हा मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Share Market Investment Marathi, Share Market Investment in Marathi, Share Market Investment Marathi Mahiti 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.