१. मतदान करताना कोणती काळजी घ्यायची?
- अनेकदा मतदान यादीच्या गोंधळामुळे आपले नाव भलतीकडल्याच लिस्टमध्ये असते. अशा वेळी संयमाने वागा. आपले नाव शोधून मतदान करून मगच घरी या.
- मतदानासाठी भली मोठी लाईन आहे म्हणून मतदान न करताच परत येऊ नका. जसं देवाच्या देवळात दर्शनाला गेल्यावर गर्दी असली तरी रांगेत उभं राहून दर्शन घेता, तसंच आपल्या देशाच्या/ राज्याच्या/विभागाच्या प्रगतीसाठी मतदानाच्या रांगेत उभं राहा.
- मतदान करताना काही अडचण येत असेल, तर मतदान केंद्रावरील कर्मचार्यांची अवश्य मदत घ्या कारण चुकीची मतदान प्रक्रिया आपले मत अवैध ठरवेल.
- मतदान करताना घाई-गडबड करू नका. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे जाते. त्यामुळे नीट विचार करूनच बटण दाबा. घाई गडबडीत मतदान केल्यामुळे चुकीच्या चिन्हाला मत जाऊ शकते किंवा तुमचे मत अवैध ठरू शकते.
२. भारतात मतदारांचे प्रकार कोणते आहेत?
– भारतात मतदारांचे 3 प्रकार आहेत-
- सामान्य मतदार,
- अनिवासी भारतीय मतदार (NRI)
- सेवा मतदार (सशस्त्र सेना किंवा सैन्य दलाच्या सैनिकांना टपाल मतपत्रिकेद्वारे किंवा त्याच्याद्वारे नियुक्त केलेल्या प्रॉक्सी मतदाराद्वारे मतदान करण्याचे पर्याय आहेत. प्रॉक्सीद्वारे मतदानाची निवड करणार्या मतदाराला सेवा मतदार (Service Voter) म्हणतात.
३. मतदान कोण करू शकतं?
– १८ वर्ष पूर्ण झालेली आणि मतदार म्हणून नोंदणी केलेली कोणतीही भारतीय व्यक्ती मतदान करू शकते.
४. परदेशात स्थायिक असलेली अनिवासी भारतीय व्यक्ती मतदान करू शकते का?
– होय लोकप्रतिनिधी कायदा, कलम २०/ए मधील तरतुदीनुसार, कोणतीही व्यक्ती जी भारताचा नागरिक आहे व त्याने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेतलेले नाही आणि शिक्षण, नोकरी व तत्सम कारणामुळे परदेशात राहत आहे, त्या व्यक्तीस मतदानाचा अधिकार आहे.
मतदान करण्याची ४ महत्वाची कारणे
५. मतदान का करावे?
- मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आणि त्याचबरोबर ते कर्तव्य आहे.
- लोकशाहीच्या सन्मानासाठी मतदान करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक मत हे नेता निवडण्यासाठी महत्वाचे आहे.
६. मतदान करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे का?
– हो. मतदान केंद्रावर तुमचे ओळखपत्र तपासले जाते.
- इलेक्शन कार्ड
- आधारकार्ड
- पासपोर्ट
- पॅनकार्ड
- वाहन परवाना (Driving License)
- बँक पासबुक
यापैकी कोणतेही ओळखपत्र अथवा शासनामार्फत जारी करण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र (उदा. सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, निवृत्तिवेतन दस्तावेज, इत्यादी) ज्यावर तुमचे छायाचित्र असेल.
परंतु, खालील कागदपत्रे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- रेशनकार्ड
- खरेदीखत
- शस्त्र परवाना
७. नोटा (NOTA) म्हणजे काय?
– NOTA म्हणजे “None of the above”. तुमच्या विभागात निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांपैकी, जर कोणताही उमेदवार तुम्हाला पात्र वाटत नसेल, तर सर्व उमेदवारांना नाकारायचा अधिकार म्हणजे नोटा (NOTA).
टिम अर्थसाक्षर प्रगत, जागृत, सामर्थ्यशाली लोकशाहीचा पुरस्कार करते.
सत्ताधारी पक्ष कायम बदलते असतात. बऱ्याचदा त्यांची विचारधारा पण कालानुरूप बदलते. अर्थसाक्षरता हा सरकार किंवा राजकीय पक्षांपेक्षा मोठा आणि खोल विषय आहे. तेव्हा आम्हाला सर्वच पक्ष आवडतात. कुठल्या पक्षाला मतदान करायचे आहे, का करायचे आहे ते तुम्ही ठरवा. कुणालाही मतदान करा पण या मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून पळून जाऊ नका.
“मी मतदान करणारच !” हे वाक्य स्वत:शी किमान ३ वेळा तरी म्हणा आणि मतदानाला जा, इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करा !
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/