जीएसटीआर-९-ए चे वार्षिक रिटर्न ३१ डिसेंबरपूर्वी भरणे अनिवार्य

Reading Time: 2 minutes

अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, जीएसटीआर-९ए हा कोणता फॉर्म आहे ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटीआर-९ए हा जुलै २०१७ ते मार्च २०१८ वर्षासाठी कंपोझिशन करदात्याद्वारे भरावयाचा वार्षिक रिटर्नचा फॉर्म आहे. यात करदात्याला आर्थिक वर्षात दाखल केलेल्या सर्व त्रैमासिक रिटर्नमधील तपशील द्यावा लागेल.

अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ए कोणाकोणाला दाखल करावा लागेल आणि याची देय तारीख काय आहे?
कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर-९ए हा फॉर्म फक्त कंपोझिशन करदात्याद्वारे दाखल केला जाईल. जीएसटीआर ९ ए हा फॉर्म पुढील आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करावा लागेल. उदा. जर करदात्याला आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जीएसटीआर-९ए दाखल करायचा असेल, तर त्याची देय तारीख ३१ डिसेंबर, २०१८ असेल.

अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ए  मध्ये करदात्याला कोणता तपशील द्यावा लागेल?

कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर-९ए  मध्ये ५ भाग आहेत, त्यात पुढील माहिती द्यावी लागेल.

 • भाग १ – जीएसटीआयएन, करदात्याचे कायदेशीर नाव, व्यापाराचे नाव, मूलभूत तपशील स्वयंनिर्मित होईल.
 • भाग २ – यात त्रैमासिक जीएसटीआर-४ मध्ये दाखल केलेला आवक आणि जावक पुरवठ्याचा तपशील द्यावा लागेल. यात आर्थिक वर्षात दाखल केलेल्या सर्व रिटर्न्सचा सारांश दिला जाईल.
 • भाग ३ – आर्थिक वर्षामध्ये रिटर्न्स मध्ये घोषित केलेल्या कराचा तपशील द्यावा लागेल. यात सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, सीईएसएस, अशा वेगवेगळ्या शिर्षकांतर्गत भरलेल्या कराचा उल्लेख करावा लागेल.
 • भाग ४ – यात आर्थिक वर्षाशी संबंधित काही व्यवहार जर पुढील आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबरमध्ये केलेले असतील, तर त्याचा तपशील द्यावा लागेल. यात मागील वर्षातील सुधारणांचाही समावेश होतो.
 • भाग ५ – यात इतर तपशील द्यावा लागेल जसे की,
  • अ) मागणी आणि परताव्याचा तपशील.
  • ब) रिव्हर्स केलेला किंवा वापर केलेल्या क्रेडिटचा तपशील.
  • क) भरलेली किंवा देय असलेली लेट फी.

अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ए दाखल करण्यास उशीर झाला, तर करदात्याला काही लेट फी भरावी लागेल का?
कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर-९ए देय तारखेपर्यंत दाखल केले नाही, तर रु. १०० सीजीएसटी आणि रु. १०० एसजीएसटी प्रतिदिन अशी लेट फी भरावी लागेल, परंतु लेट फी ही राज्याच्या उलाढालीच्या ०.२५ टक्के मर्यादित असेल.

अर्जुन: कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर-९ए हे रिटर्न रिव्हाइज करता येत नाही. जो तपशील करदात्याने त्रैमासिक रिटर्नमध्ये दाखल केलेला आहे, तोच जीएसटीआर-९ए मध्ये टाकावा लागेल. म्हणजेच आधीच्या रिटर्न्समध्ये त्या सुधारता येणार नाहीत. मग करदात्यांनी वार्षिक रिटर्न दाखल करून काय फायदा?

– सी. ए. उमेश शर्मा

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2BjgkGc )

Leave a Reply

Your email address will not be published.