अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे तयारीची लगबग चालू आहे. एवढ्या गडबडीत सरकारने जीएसटीचे वार्षिक रिटर्नचे फॉर्म आणले आहेत, तर तू याबद्दल काय सांगशील?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, गणपती बाप्पाचे एक नाव विघ्नहर्तापण आहे. तो सर्वांचे विघ्ने, अडचणी दूर करतो. त्याचप्रमाणे, तो आपल्यालासुद्धा जीएसटीचे प्रश्न सोडवायला मदत करेलच. वर्ष २०१७-१८ चे वार्षिक रिटर्न दाखल करावयाचे फॉर्म उशिरा आले आहेत. त्यात सामान्य नोंदणीकृत करदात्यांसाठी जीएसटीआर-९ व कंपोझिशन करदात्यांसाठी जीएसटीआर-९ए असे फॉर्म्स निर्देशित करण्यात आले आहेत. सर्व करदात्यांसाठी वार्षिक रिटर्न दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख असेल. उशिरा का होईना, यातून करदात्याची विघ्न दूर होतील, असे वाटते.
अर्जुन: कृष्णा, करदात्याला वार्षिक रिटर्नमध्ये कोणता तपशील द्यावा लागेल?
कृष्ण: अर्जुना, करदात्याला वार्षिक रिटर्नमध्ये पुढील तपशील द्यावा लागेल,
१) आर्थिक वर्षात (जुलै २०१७ ते मार्च २०१८) घोषित केलेल्या आवक -जावक पुरवठ्याचा संपूर्ण तपशील.
२) सदर आर्थिक वर्षात रिटर्न्समध्ये घोषित केलेला असा जावक पुरवठा, ज्यावर कर देय असा तपशील.
३) पूर्वी दाखल रिटर्न्समध्ये घोषित केलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा तपशील.
४) पूर्वी दाखल रिटर्न्समध्ये घोषित केलेल्या रिव्हर्स इनपुट टॅक्स क्रेडिट आणि अपात्र असलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा तपशील आणि आयटीसीसंबंधी इतर माहिती.
५) आर्थिक वर्षामध्ये रिटर्न्सद्वारे देय केलेल्या रकमेचा तपशील.
६) मागील आर्थिक वर्षातील असे व्यवहार, जे त्या वर्षासाठी वार्षिक रिटर्न दाखल करण्याची देय तारीख किंवा सदर वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्याचे रिटर्न दाखल करणे यापैकी जे आधी असेल, त्यात घोषित केले असेल, तर त्याचा तपशील. म्हणजेच जुलै, २०१७ ते मार्च, २०१८ च्या व्यवहारातील तपशील एप्रिल, २०१८ ते सप्टेंबर, २०१८च्या रिटर्नमध्ये माहिती दिली असल्यास, हा तपशील फार महत्त्वाचा राहील व यात विघ्ने येऊ शकतात.
७) इतर माहिती जसे की, परतावा, एचएसएननुसार आवक आणि जावक पुरवठ्याची माहिती, विलंब शुल्क आणि कंपोझिशन करदात्याकडून केलेला आवक पुरवठा व अप्रूव्हल बेसिसवर पाठविलेल्या वस्तूंचा तपशील.
अर्जुन: कृष्णा, वार्षिक रिटर्न दाखल करताना करदात्याला कोणकोणते विघ्न येऊ शकतात?
कृष्ण: अर्जुना, वार्षिक रिटर्न दाखल करताना करदात्याला पुढील विघ्ने येऊ शकतात.
१) सर्वांत मोठे विघ्न म्हणजे वार्षिक रिटर्न अजूनही करदात्यांसाठी अपलोड साठी उपल्बध झालेले नाही. सप्टेंबर महिना चालू आहे. सर्व करदाते त्यांचे लेखापुस्तके पूर्ण करत आहे. वार्षिक रिटर्न भरण्यास जेवढा उशीर होईल, तेवढ्या जास्त अडचणींना तोंड द्यावे लागेल.
२) वार्षिक रिटर्नमधील काही रक्कम जीएसटीएनद्वारे स्वयंनिर्मित होणार आहे, परंतु या स्वयंनिर्मित कशा होतील, कुठून होतील आणि जर काही रकमेत चूक झाली तर त्याचे काय? याचे उत्तर आणखी मिळालेले नाही.
३) करदात्याला इनपुट टॅक्स क्रेडिटचा तपशील दाखल करताना इनपुट, भांडवली वस्तू आणि इनपुट सेवा अशी विभागणी करून नोंदणीकृत व अनोंदणीकृत व्यक्तीकडून केलेल्या आवक पुरवठ्याचा स्वतंत्र तपशील दाखल करावा लागेल.
४) त्याचप्रमाणे, मागील वर्षातील असे व्यवहार, ज्यांचा तपशील या वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात दाखल केला आहे. त्याचीही माहिती वार्षिक रिटर्नमध्ये द्यावी लागेल. म्हणजेच करदात्याने एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या रिटर्न्समध्ये मागील वर्षातील ज्या सुधारणा केल्या, त्याचीही नोंद करदात्याला आता यापुढे ठेवावी लागेल.
५) कंपोझिशन करदात्याकडून केलेला आवक पुरवठा, नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत व्यक्तीकडून केलेला आवक पुरवठा यांची विभागणी करणेदेखील करदात्याला करणे गरजेचे आहे.
अर्जुन: कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण: अर्जुना, करदात्याने जीएसटीचे रिटर्न दाखल करताना झालेल्या चुकांचे विघ्न जीएसटीच्या वार्षिक रिटर्न रूपाने उशिरा का होईना, विघ्नहर्त्यामुळे दूर होतील, परंतु यासाठी करदात्यांना वार्षिकरूपी रिटर्नची विद्या ग्रहण करावी लागेल, तरच हे विघ्ने दूर होतील. यात जीएसटीएन नेटवर्कची तांत्रिक विघ्ने येऊ नये, हीच श्रीच्या चरणी प्रार्थना.
-सी. ए. उमेश शर्मा
(चित्रसौजन्य- https://bit.ly/2wUYRQO )
Web Title: