बऱ्याचदा असं होतं की आपण आयकरातल्या अनेक वजावटींसाठी पात्र असतो पण आपल्याला त्याबद्दल माहितीच नसते. किंवा असंही होतं की आपल्याला कोणत्या वजावटी लागू होतात हे माहिती तर असतं पण, काही कारणांनी त्याचे पुरावे द्यायचे राहून जातात. मग आपण आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या सवलतींसाठी पात्र असूनही आपल्याला अधिक कर भरावा लागतो. साधारण जानेवारी नंतर आपली कंपनी आपल्याला आपल्या गुंतवणुकींचे पुरावे, पावत्या, प्रमाणपत्रं मागायला सुरूवात करते आणि आपण ते वेळेत न दिल्यास आपलंच करपात्र उत्पन्न वाढतं. म्हणजे आपण वजावटीसाठी पात्र असून, कर वाचवू शकत असून आपण ह्या वजावटी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही.
पण, आपण आयकर रिटर्न दाखल केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतानाही आपण ह्या वजावटींचा दावा करू शकतो आणि कर वाचवू शकतो. फक्त हे कसं करावं याची योग्य माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.