पगारच पुरत नाही…बचत कशी करू?
आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत.
जुगल हंसराजने अभिनय केलेलं ‘ये जो थोडेसे है पैसे’ हे गाणं प्रत्येकाला गुणगुणावसं वाटतं.फक्त फरक एवढाच आहे की चित्रपटात नायक आत्मविश्वासाने, तर आपण चिंतायुक्त स्वरात गात असतो.
बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी
बचतीच्या सवयी ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.
१. जेवढे उत्पन्न तेवढा खर्च – “विलासी” जीवनशैली
या प्रकारात मिळणाऱ्या उत्पन्नाचे खर्चात रुपांतर करण्याकडे कल असतो.
उदा.नोकरीत बोनस अथवा व्यवसायात अतिरिक्त नफा झाल्यास चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याची योजना तयार असणे.
२. उत्पन्न कमी परंतु खर्च जास्त – “होऊ दे खर्च” जीवनशैली
या प्रकारात तुलनात्मक वृत्ती झळकत असते.या प्रकारातील लोक कायम कर्जात राहणे पसंत करतात.
उदा.ऐपत नसतांना पत मिरविण्यासाठी पात्रता नसलेल्या मुलांना महागडया शिक्षण संस्थांमधे प्रवेश घेणे.
वरील(१व२) प्रकारच्या सवयी “जो भी होगा देखा जायेगा” या बेफिकीर मानसिक वृत्तीतून तयार होत असतात.नियोजनाच्या अभावामुळे या प्रकारातील लोक लवकर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता जास्त असते.
३. उत्पन्न आणि खर्च यांचा सुयोग्य मेळ – “आर्थिक शिस्तपालन” जीवनशैली
या प्रकारातील लोक मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत बघून खर्चांची आखणी करतात.यांना तणावमुक्त आर्थिक जीवनशैली मान्य असते.
उदा.हॉटेलचा खर्च परवडत नसल्यास भेळ-पाणीपुरी खाऊन तृप्त होतात.
४. उत्पन्नातून बचत करून खर्च करणे – “भविष्याचा वेध घेणारी” जीवनशैली
या प्रकारातील लोक वर्तमानात गरजेपुरता खर्च करून भविष्यात येणाऱ्या ध्येयांबद्दल योजना आखत असतात. याच गटातील लोकांना आपण कंजूष किंवा काटकसरी म्हणून हिणवत असतो. परंतु दीर्घकाळात हाच बचतकर्ता गुंतवणूकदार बनून त्याची “बकेट लिस्ट” पूर्ण करत असतो.
वरील (३ व ४) प्रकारातील लोक “या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे” या जबाबदार मानसिक वृत्तीचे असतात. यांना सुरुवातीला नियोजन अथवा काटकसर करून भविष्यात आनंद घेण्यात रस असतो.
बचतीची तुमची “सवय” कुठली? एकदा पडताळून बघा.
आता आपण मासिक अथवा वार्षिक उत्पन्नाची विभागणी एका आर्थिक अभ्यासानुसार कशी असावी? याबाबत जाणून घेऊ.
यात देखील उत्पन्नाचा विनियोग ४ टप्प्यात केला आहे.
-
घरखर्च – ३०%
-
परतफेड – ३०%
-
गुंतवणूक – ३०%
-
वैयक्तिक – १०%
वरील ४ टप्प्यांचे थोडक्यात विश्लेषण पाहू.
-
जर तुम्हाला दैनंदिन खर्च लिहून ठेवण्याची सवय असेल तर तुम्ही लवकरच “गुंतवणूकदार” बनू शकतात.नसेल तर गृहमंत्र्यांकडेच अर्थखात्याची अतिरिक्त जबाबदारी दया.हि सवय म्हणजे आरशात स्वतःला पाहणे.कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही.या सवयीचा चांगला परिणाम म्हणजे तुम्ही कुठे वायफळ खर्च करत नाहीत ना?हे माहित होण्यास मदत होते.म्हणजेच तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण आणून बचत वाढवू शकतात.
-
वरील सवय प्रामाणिकपणे आत्मसात केल्यास परतफेड किंवा गुंतवणूकीचे नियोजन करणे सोपे होईल.आज तुम्हाला देणी(उदा.कर्ज) असलेली यादी बनवा.त्यावर होत असलेली व्याज आकारणी व परतफेड होणारी रक्कम यांचा आढावा घ्या.शक्य तितक्या लवकर देणी संपवा.या सवयीचा फायदा तुम्हाला आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यास मदत करेल.
-
लहानपणी आपण पळण्याची शर्यत सुरु करण्यापूर्वी १,२ साडे माडे ३ असे म्हणून सुरु करायचो.ज्याचं लक्ष ध्येयाकडे असायचं त्याला सगळ्यात अगोदर ३ ऐकू येत असे.तीच शर्यत पुन्हा सुरु होण्यापूर्वी ३ ऐकण्याची सवय जोपासा.
-
वरील ३ टप्पे पार पाडायचे असतील तर तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.यासाठी नव-नवीन गोष्टी शिका,तुमचे छंद जोपासा,स्वतःच्या मनोरंजनासाठी खर्च करा.कारण तुम्हाला सतत एक नवी ऊर्जा मिळणे गरजेचे आहे.
“गुंतवणूक” करणे किंवा “आर्थिक नियोजन” करणे हे फक्त श्रीमंतांचे काम आहे,हा गैरसमज दूर करा.वरील मुद्दे लक्षात घेऊन स्वतःला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करा.जिथे आवश्यकता असेल तिथे सल्लागार नेमा.कारण “सगळ्याच गोष्टी मला जमतील” असा फुकाचा आत्मविश्वास बाळगू नका. “आर्थिक शिस्त” जोपासणे ही “आर्थिक नियोजनाची” पहिली पायरी आहे.
चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी आपण भारतीय शुभ मुहूर्ताच्या शोधात असतो.शनिवारी सुरु होणाऱ्या नारळी पौर्णिमेला अर्थसाक्षरतेचा “नारळ” वाढवून रविवारच्या रक्षाबंधनाला स्वतःला आर्थिक शिस्तीचे “बंधन” घालू या.
– अतुल प्रकाश कोतकर
आर्थिक सल्लागार
94 23 18 75 98
(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी [email protected] वर संपर्क साधून आपले प्रश्न विचारू शकतात.)
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Saving Habits Marathi Mahiti, Saving in Marathi, How to save? in Marathi, How to Manage Income & expenses Marathi mahiti, Balance of Income & expenses in Marathi, bachat kashi karaychi?