नामांकनाचे महत्व !

Reading Time: 2 minutes

नामांकन न करण्यामुळे बँकेत हजारो कोटी रुपये बेवारस पडून आहेत, असा एक मध्यंतरी डेटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केला होता. वर्षानुवर्ष मेहनत करायची, पैसे बँकेत जमा करत रहायचे आणि आपल्या नंतर फक्त नामांकन करायचे राहिल्याने ते पैसे कुटुंबाला न मिळता तसेच बँकेत पडून राहतात. 

आपण या लेखात नामांकन म्हणजे काय, त्याचे महत्व आणि ते कसे करायचे. याबद्दल माहिती घेऊया. 

 

नामांकन म्हणजे काय रे भाऊ ?

 • नामांकन ही आर्थिक गोष्टीशी संबधीत असलेली आणि कायद्याने दिलेली एक सुविधा आहे. 
 • बँका, म्युच्युअल फंड यासारख्या वित्तीय संस्था नामांकनाची सुविधा देत असतात आणि त्यांना ही सुविधा देणं बंधनकारक देखील असतं. 
 • बँकेत किंवा इतर वित्तीय संस्थेत खातेधारक असलेला व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर ‘अमुक- अमुक’ व्यक्तीला माझ्या खात्यातील पैसे मिळावेत. म्हणून फॉर्म भरताना त्या- त्या व्यक्तीचे नाव दिले जाते. त्याला नामांकन
  (नॉमिनेशन – Nomination) असे म्हणतात. 

 

नक्की वाचा – Nomination: नॉमिनेशन प्रक्रियेसंदर्भातील काही महत्वाचे नियम व अटी 

 

नामांकन करणे गरजेचे का आहे? 

 • आपल्यातील अनेकांना वाटेल की, नामांकन करणे गरजेचे का आहे? बँकेत गेलं की, भला- मोठा फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरण्याचा कंटाळा  देखील येतो आणि वेळही लागतो. त्या फॉर्म मधून नामांकन काढून टाकलं गेलं तर चार- सहा ओळी कमी भराव्या लागतील. 
 • लक्षात ठेवा, की आपण अमर नाही आहोत. मृत्यू काही सांगून येत नाही. तो कधीही येऊ शकतो. सर्वांनी दीर्घ आयुष्य जगावे, आशीच आपली इच्छा आहे पण ते काही आपल्या हातात नसते. दुर्दैवी अपघातामुळे किंवा इतर कारणामुळे अचानक आपण जगातून निघून गेलो तर आपल्यामागे आपले कुटुंब असते. आपल्यामागे आपल्या कुटुंबाने सुखी जीवन जगावे अशी सर्वांचीच इच्छा असते. 
 • आपण फक्त दोन मिनिटे अधिक वेळ देऊन नामांकन केले नाही तर आपल्या खात्यात पैसे असून देखील ते आपल्याच कुटुंबाला मिळण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींना अनेक त्रास सहन करावे लागतात. कागदपत्रे तर द्यावीच लागतात पण वेळप्रसंगी न्यायालयाची पायरी देखील चढावी लागते. 
 • अशा त्रासातून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आपण नामांकन केलं तर त्या व्यक्तीला बँकेतून पैसे काढणं अतिशय सोपं जातं. 

 

हेही वाचा –  पी. व्ही. सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग- ३ 

 

नामांकन कुणाचे आणि किती जणांचे करता येते ?

 • आता आपण नामांकन करायचे ठरवल्यास पुढचा प्रश्न आपल्याला पडला असेल की, नामांकन कुणाचे करता येते? तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. नॉमिनी म्हणून आपल्या जोडीदाराचे म्हणजे पतीचे किंवा पत्नीचे तसेच आई, वडील, भाऊ, बहिण, आपली मुले किंवा परिचयातील नातेवाईक यांचेही नाव देता येते. आपल्याला ठरवायचे असते की यापैकी कुणाचे नाव द्यायचे आहे. 
 • काही वित्तीय संस्थेत एकच नाव नॉमिनी म्हणून देता येते तर काही वित्तीय संस्थेत एकापेक्षा अधिक व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून देता येतात. उदा. बँकेत एकाच व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून देता येते तर म्युच्युअल फंडात तीन व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून देता येते. यात फक्त तीन व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून देताना त्यांचा किती हिस्सा असेल हे देखील नमूद करावे लागते. हे यासाठी महत्वाचे आहे की, आपल्यानंतर कोण किती हिस्सा घेणार? यावरून तंटा होऊन नये म्हणून…! 
 • नामांकन हे एकप्रकारे मृत्यूपत्रासारखे आहे. आपली संपत्ती कुणाला द्यायची आणि कशी विभागून द्यायची हे जसे ठरवले जाते. त्याच प्रकारे हे नामांकनाचे ठरवायचे आहे. 

 

नक्की वाचा – Gratuity: ग्रॅज्युइटी बद्दल सारे काही 

 

नामांकन करत असताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी – 

नामांकन कुणाचे करू शकतो हे आपण पाहीले. आता ते कसे करायचे ते पाहूया. 

 • नामांकन करत असताना नॉमिनीचे संपूर्ण नाव, त्याचे वय, पत्ता आणि आपल्याशी असलेला संबंध हे व्यवस्थित नमूद करायचे आहे. 
 • आपल्याला भावनिकदृष्ट्या असे वाटू शकते की, पूर्ण कुटुंबालाच ग्रुप म्हणून नॉमिनेट करावे. पण तसे काही करू नका.
 • नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असेल म्हणजे आपल्याला आपल्या मुलाला किंवा मुलीला नॉमिनी करायचे असेल तर एक नियुक्त व्यक्ती म्हणून एका व्यक्तीची प्रमुख नियुक्ती करा. त्या प्रमुख व्यक्तीचे नाव, वय, पत्ता तसेच  नामनिर्देशित व्यक्तीशी असलेला संबंध लिहायला विसरू नका.
 • या काही गोष्टी केल्या की जास्तीत- जास्त पाच मिनिटात आपले नामांकानाचे काम पूर्ण होऊन जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!